म्हणून जेधे घराण्याला शिवरायांच्या दरबारात पहिल्या तलवारीचा मान होता.

शिवपूर्व काळात महाराष्ट्रासकट दक्षिण भारतावर सुल्तानशाहीचे राज्य होते. या सुलतानांनी जात्याच पराक्रमी असणाऱ्या मराठ्यांना सोबत घेऊन आपल्या सत्ता बळकट केल्या. आदिलशाही राजवटीमधे भोर तालुक्याची भरभराट करणार्या आपल्या चाकरमानी सरदार नाईकजी जेधे यांना कारी व आंबवडे ही दोन गावे इनाम मिळाली. त्यामुळे ते तेथील वतनदार झाले.

शूर, परंपरेने संरक्षणासाठी पदरी फौज फाटा बाळगून असलेल्या जेधे घराण्याला मुलखात राजा असे संबोधले जाई. 

नाईकजी यांचे सुपुत्र कान्होजी जेधे यांचा जन्म भोरजवळच्या कारीगावी झाला. त्यांच्या जन्मापूर्वी त्यांच्या वडिलांची हत्या झाली. आईबापच छत्र न कळत्या वयात डोक्यावरून हटलं पण जेध्यांचे चाकरीत असलेले इमानी स्वामीनिष्ठ देवजी महाल्यानी तान्ह्या कान्होजीचे प्राण बचावले. रानावनांत फिरत त्यानी कान्होजीचा सांभाळ केला.

पुढे पासलकर देशमुखांनी त्यांची देखभाल केली. त्यांच्या निगराणीखाली कान्होजी मुत्सद्दी, राजकारणी बनले. येथेच त्यांनी युद्धतंत्राचेही परिपूर्ण शिक्षण घेतले. कान्होजी मूळ कारी गावी आले. त्यांनी आपल्या मातापिताच्या बलिदानाचा सुड मिळवून कारी-अंबवडे गावासह त्यांनी रोहिड खोऱ्याची देशमुखी चालवली.

पुणे प्रांतातील सर्व बारा मावळामध्ये कान्होजींनी आपल्या पराक्रमाने व सचोटीने आपला दरारा बसविला होता.

त्यांची किर्ती निजामशहाच्या वजिराला म्हणजेच मलिक अंबरपर्यंत पसरली. कान्होजींचा गनिमी कावावर पकड होती. ते कितीही अवघड किल्ला असला तरी ते आपल्या खास तंत्राने गडावर शिड्या लावून मावळे वर चदवत आणि किल्ला जिंकत असत. मलिक अंबरने आपल्या अनेक लढायांमध्ये कान्होजींचा उपयोग करून घेतला. 

निजामशाहीच्या अनेक पत्रांमध्ये त्यांचा उल्लेख कान्होजी राजे जेधे असा आढळतो.

मलिक अंबरच्या नंतर निजामशाही मोडकळीस आली. कान्होजी आदिलशाहचा सेनापती रणदुल्लाखान याला जाऊन मिळाले. याच काळात शहाजी महाराज देखील निजामशाहीतून आदिलशाहीकडे आले होते. दोघे एकमकेकांचे विश्वासू मित्र बनले. अगदी जिंजी येथे  नजर कैदेत देखील दोघे एकत्र होते.

जेव्हा जिजामातांच्या सोबत छत्रपती शिवाजी महाराज पुण्याला आले व तेव्हा त्यांना जहागीर सांभाळायला मदतीसाठी दादोजी कोंडदेव यांची नियुक्ती केली होती. बाल शिवाजी महाराज बारा मावळात फिरून सवंगडी गोळा करत होते आणि त्यांनी स्वराज्याची स्थापना करण्याच्या हालचाली सुरु केल्या होत्या.

याची कुणकुण शहाजी महाराजांपर्यंत येऊन पोहचली. आदिलशाहला हे कळले तर स्वराज्य निर्माण होण्यापूर्वीच त्याला नख लागले जाईल हे शहाजी महाराजांना लक्षात आले होते. शिवरायांच्या सोबतीला कान्होजींच्या सारखा मावळावर वर्चस्व असणारा वीर असावा हे त्यांच्या मनात होते. त्यांनी कान्होजींना विनंती केली,

“कान्होजी ! तुम्ही आता माझ्या शिवबाची चाकरी करावी. स्वराज्याला तुमची गरज आहे. आपण शूर लढवय्ये आहात. अनुभवी आहात. बाजी पासालकारांच्या निधनाने बारा मावळ खोऱ्यात आता तुम्हीच वडीलधारे आपल्या मायेचे छत्र शिवबावर धरा.”

शहाजीराजांच्या सांगण्यावरून कान्होजी छ.शिवाजी महाराजांचेकडे आले. ते त्यांचे सहा पुत्र स्वराज्याच्या कार्यात सामील झाले. कान्होजींच्या आगमनांमुळे शिवरायांची बाजू मजबूत झाली. त्यांच्या साहायाने महाराजांनी जावळीच्या मोरेंना शासन करून अख्खे जावळी खोरे स्वराज्यात सामील करून घेतले. कान्होजी व त्याचे समर्थक बांदल, शिळीमकर, वगैरे देशमुखानी या मोहिमेत शिवरायांच्या सोबत सामील होते.

कान्होजींनीच जावळीच्या मोऱ्यांचा रायरी हा किल्ला जिंकला, तोच पुढे जाऊन स्वराज्याची राजधानी दुर्गदुर्गेश्वर रायगड बनला.

जरी कान्होजी असे स्वराज्याच्या कामी छत्रपती शिवाजी महाराजांना सहाय्य करीत होते. तरीही ते आदिलशाहीच्या सेवेत होते. वतनवाडीचे देखील आदिलशहाने त्यांना अधिकार बहाल केलेले होते. वतनवाडीची कोणतीही लालसा ना ठेवता कान्होजी स्वराज्याच्या कार्यात मोठे सहाय्य करत होते.

आदिलशाहीचा मोठा मुलुख व काही किल्ले शिवाजीराजांनी स्वराज्यात दाखल करून घेतले होते. त्यामुळे भडकलेल्या आदिलशहाने शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्याचा विडा अफझलखानाला दिला. शिवाजी महाराजांना चढ्या घोड्यानिशी जिवंत अथवा मारून  घेऊन येतो अशी घोर प्रतिज्ञा करून खान महाराष्ट्रात आला.

आपल्या पदरी असलेल्या सर्व देशमुखांनी शिवरायांच्या विरोधातील मोहिमेत अफझलखानाला मदत करावी असे फर्मान आदिलशहाने काढले. १६ जून १६५९ कान्हीजी यांना आदिलशहाने पाठविलेले ल्या पत्रात तो म्हणतो,

 “शिवाजी अविचारीने व अज्ञानाने निजामशाहीत. कोंकणातील मुसलमानांना त्रास देऊन लुट करून पातशाही मुलखातील कित्येक किल्ले हस्तगत केले आहेत. शिवरायांना पराभव करून निर्मूळ फडशा करावा. शिवरायांचे निसवतीचे लोकास आश्रय न देता ठार मारून या दौलतीचे कल्याण इच्छिणे. खानाच्या सांगण्यावरून, तुमची योग्यता वाढविली जाईल. त्याचे सांगण्याप्रमाणे वागावे, तसे न केल्यास परिणाम चांगला होणार नाही.”

हे खरमरीत पत्र मिळाल्यावर कान्होजी तडक शिवरायांच्याकडे आपले सैन्य आणि मुलांना घेऊन गेले. महाराजांना ते म्हणाले,

“या पुढे खस्त होऊ तेव्हा आमचे वतन कोण खावे, आम्ही इमानानी अंतर करणार नाही असे म्हणून बेल भंडार उचलून शपथ घेतली. आपल्या वतनावर पाणी सोडले”

असं म्हणत त्यांनीच खरच पाण्याचा तांब्या उजव्या हातात घेवून डाव्या हाताने राजांच्या पायांवर पाणी सोडले व आपल्या निष्ठेची व प्रामाणिकपणाची राजांना जाणीव करून दिली. छत्रपति शिवाजी महाराज व दरबारातील सर्व मंडळी कान्होजींच्या या कृत्याने भारावून गेली यावेळी राजांनी कान्होजीस हुकूम केला की,

“तुमचे व तुमच्या वंशाचे आम्ही चालवावे व आमच्या वंशाचे तुमच्या वंशाचे चालवावे.”

कान्होजी यांची कृती बारा मावळात गाजली. स्वराज्यावरील हे सर्वात मोठे संकट घोंगावत होते. अनेक देशमुखांच्या मनात द्विधा मनस्थिती निर्माण झाली होती. कान्होजी सर्वत्र फिरून देशमुख वतनदारांची भेट घेतली. ते सांगत होते,

“स्वामींच्या पायासी इमान धरून वतनास देखील पाणी सोडीले आम्ही व आपले लोक देखील राजश्री स्वामीपुढे खस्त होतो ऐसा आमचा दृढ विचार आहे. अफजलखान बेईमान आहे. कार्य जालियावर नस्ते निमित्य ठेऊन नाश करील. हे ‘मऱ्हाष्ट्र राज्य’ आहे. अवधियांनी हिंमत धरून, जमाव घेवून, राजश्री स्वामीसंनिध राहोन, येक निष्ठेने सेवा करावी.”

कान्होजी जेधे यांच्या बरोबर सर्व देशमुख मंडळी एकमुखाने संमती दिली. कान्होजी जेधे आपलं वतन सोडून शिवरायांच्या पाठीशी उभा राहत आहे हे पाहून इतर या सर्वांनी आदिलशाहीच्या फर्मानाला जुमानायला नकार दिला.

प्रतापगडच्या पायथ्याशी जेव्हा शिवरायांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला तेव्हा जावळीच्या जंगलात त्याच्या अख्ख्या सेनेचा फडशा पाडण्यात कान्होजी जेधे व त्यांचे सुपुत्र आघाडीवर होते. अफझलखानाचा वध हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची ग्वाही दिल्ली पर्यंत पोहचवण्यास कारणीभूत ठरला.

स्वराज्याच्या निर्मितीत हे सर्वात मोठे पाऊल पडले होते. आपल्या सर्व शत्रुंना जरब बसवण्यात छत्रपती शिवाजी महाराज यशस्वी ठरले होते. या कार्यात कान्होजी जेधे यांचा सिंहाचा वाटा होता. कान्होजी यांनी नि:स्वार्थी बुद्धीने स्वराज्यासाठी केलेल्या सेवेबद्दल शिवाजी महाराजांनी त्यांना तलवारीचे मानाचे प्रथम पान दिले होते.

याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराजांची कोणतीही मोहीम निर्माण झाली तर तर त्याचे पहिले पत्र जेधे घराण्याला पाठवले जात असे.

पुढे पावनखिंडीच्या लढाईत बाजी प्रभू देशपांडे आणि त्यांच्या सोबत बांदल सैनिकांनी मोठा पराक्रम गाजवला तेव्हा कान्होजी यांनी आपला  तलवारीचा मान कृष्णाजी बांदल यांना दिला. ते शिवरायांना म्हणाले,

“महाराज, केवळ बांदलाच्या पराक्रमामुळेच आज तुमचे पाय आम्हाला दिसत आहेत. तेव्हा आम्ही आनंदाने पहिल्या पानाचा मान सोडतो. आपल्या पुढे आमच्या मानाची काय पत्रास ?”

आजही ‘कारी’गावात असलेली त्यांचा वाडा त्यांच्या पराक्रमाची साक्ष देते आहे. आजही कान्होजी जेधेंनी स्वराज्यासाठी गाजवलेली मानाची तलवार बाळासाहेब जेधे व त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी प्राणपणाने जपून ठेवलेली आहे.

सन्दर्भ- अमोल (बाजी) जेधे

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.