शरीरावर एकही कपडा नव्हता, पाय तुटून पडलेले… नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दिल्लीच्या रस्त्यावर तरुणीचा मृतदेह

महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या बाबतीत दिल्ली हे सगळ्यात आघाडीवर असलेलं शहर आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी हे पुन्हा  एकदा सिद्ध झालंय. दिल्ली मधली ही घटना काळजाला चर्रर्र…  करून जाते.

चाकाखाली अडकलेल्या मुलीला कारनं ४ किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं आणि तिचा मृत्यू झाला.

ही घटना थर्टी फर्स्टच्या रात्री घडलीये. रात्री ती मुलगी स्कुटीवर होती. त्यावेळी कारमधून जात असलेल्या युवकांनी तिच्या स्कुटीला धडक दिली. त्यानंतर ती मुलगी रस्त्यावर पडली. रस्त्यावर पडलेली मुलगी त्याच कारच्या चाकाखाली आली आणि त्यानंतर गाडीतल्या युवकांनी ती गाडी तशीच ४ किलोमीटरपर्यंत चालवली.

नेमका घटनाक्रम काय होता ते पाहुया:

मुलगी संध्याकाळी ६ च्या सुमारास घरातून निघाली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार ३१ डिसेंबरच्या संध्याकाळी ही २०-२२ वर्षीय मुलगी घरातून बाहेर निघाली. ही मुलगी इव्हेंट कंपनीमध्ये नोकरी करत होती. इव्हेंटशी निगडीतच काही काम आहे असं सांगून ती अमन विहार भागात असलेल्या घरातून बाहेर पडली.

९ वाजता तिने घरी फोन केला होता.

रात्री ९ वाजताच्या आसपास मुलीने घरी फोन केला होता. त्यावेळी तिने मी रात्री १० वाजेपर्यंत घरी येतेय असं सांगितलं होतं. तिने असं सांगितल्यामुळे घरचेही चिंतामुक्त होते.

१० वाजता घरच्यांनी तिला फोन केला.

१० वाजेपर्यंत घरी येते असं म्हणालेली मुलगी वेळेत घरी पोहोचली नाही म्हणून घरच्यांची चिंता वाढली. काळजीने घरातल्या लोकांनी तिला फोन केला होता, पण तिचा फोन बंद लागला.

रात्री त्या मुलीचा अपघात झाला.

मुलीचा अपघात झाला ती नक्की वेळ सांगता येणार नाही. पण, स्कुटीवरून जात असलेल्या मुलीला कारने धक्का मारला. हा धक्का लागल्यानंतर मुलगी स्कुटीवरून खाली पडली आणि गाडीच्या चाकात अडकली.

खरा निर्दयीपणा हा अपघातानंतर सुरू झाला.

मुलीच्या स्कुटीला आपण धडक दिलीये, ती गाडीच्या चाकात अडकलीये या सगळयाकडे दुर्लक्ष करून ही मुलं गाडी सुरूच ठेऊन प्रवास करत राहिले. ती मुलगी तशीच गाडीच्या चाकासोबत फरफटत होती.

पहाटे सव्वा तीन वाजता एका नागरिकाने ही कार पाहिली.

दुध वितरणाच्या गाडीटी वाट बघत असलेल्या दीपक यांनी ही गाडी बघितली. त्यांच्या म्हणण्यानुसार एक कार त्यांना येताना दिसली आणि या गाडीच्या मागच्या चाकांमधून मोठा आवाज येत होता. ही घटना पहाटे ,सव्वा तीनच्या आसपास घडली.

पोलिसांनी तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा दीपक यांचा आरोप.

ज्यांनी ती गाडी पाहिली होती त्या दीपक यांनी पीसीआर म्हणजे पोलिस कंट्रोल रूमच्या वॅनला संपर्क करून घटनेची माहिती देण्याचा प्रयत्न केला होता. पीसीआर वॅनमधले पोलिस मात्र, शुद्धीत नव्हते आणि त्यामुळे त्यांनी माझं काहीच ऐकून घेतलं नाही असा आरोप केलाय.

पोलिसांना या गाडीविषयी सांगण्यासाठी फोन आला होता.

पोलिसांना या गाडीविषयी सांगण्यासाठी फोन आला होता. हा फोन आल्या आल्या ड्युटीवर असलेल्या पोलिसांना लगेच सतर्क करण्यात आलं होतं. फोनवरच्या व्यक्तीने, “एक करड्या रंगाची गाडी कुतूबगडच्या दिशेने जातेय. या गाडीला मृतदेह लटकवलाय” असं पोलिसांना सांगितलं होतं. पोलिसांच्या म्हणण्यानुसार लगेचच ड्यूटीवर असलेल्या पोलिसांनी या गाडीचा शोध सुरू केला होता.

पोलिसांना स्कुटी सापडली.

पोलिसांच्या पीसीआर वॅनचा राऊंड अप सुरू असताना त्यांना त्या मुलीची दुर्घटनाग्रस्त स्कुटी सापडली, पण मुलगी काही सापडली नाही. त्यानंतरही पोलिसांची शोध मोहिम सुरूच होती.

पोलिसांना फोन आला आणि मुलीचा मृतदेह सापडला.

भर रस्त्यावर एका मुलीचा मृतदेह आहे असा पोलिसांना फोन आला होता. त्यानंतर, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला त्यावेळी त्या मुलीच्या अंगावरचे सगळे कपडे गळून पडले होते, शरीरावर असंख्य लहान-मोठ्या जखमा होत्या, तिच्या शरीराचं जवळपास प्रत्येक हाड तुटलं होतं आणि तिचे पाय अक्षरश: शरीरापासून वेगळे झाले होते.

दरम्यान दिल्ली महिला आयोगाने या घटनेची तात्काळ दखल घेत पोलिसांना सखोल चौकशीचे निर्देशही दिलेत.

पाचही आरोपी युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याची माहिती घटना ज्या भागात घडली त्या भागाचे डीसीपी हरेंद्र सिंह यांनी दिलीये. याशिवाय त्यांनी बोलताना, “ज्या युवकांकडून ही घटना घडली त्यांना आपल्या गाडीखाली कुणी आहे हे माहितीच नसल्याचं सांगितलंय.” याशिवाय, “युवकांचा तपास सुरू आहे आणि ज्यावेळी हा प्रकार घडला त्यावेळी ते युवक नशेत होते का हे पाहण्यासाठी त्यांच्या रक्ताचे सॅम्पल्स घेतले आहेत.” असंही डीसीपी हरेंद्र सिंह यांनी स्पष्ट केलंय.

नवं वर्ष उजाडत असताना एका तरुण मुलीच अश्याप्रकारे अंत होणं ही पुन्हा एकदा दिल्लीतल्या महिला सुरक्षिततेबद्दल प्रश्न चिन्ह उपस्थित करतेय.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.