गुटखा मॅन म्हणतोय, ‘मी गुटखा नाय सुपारी खात होतो’

सध्या भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामना सुरू आहे. आपल्या कोवळ्या शुभमन गिलनं पहिल्याच दिवशी फिफ्टी केली, पहिली टेस्ट मॅच खेळणाऱ्या श्रेयस अय्यरनं कडकमध्ये सेंच्युरी केली, अक्षरबाप्पू पटेलनं पाच विकेट्स घेतल्या. पण सोशल मीडियामध्ये सगळ्यात जास्त मार्केट कुणाला मिळालं, तर गुटखा मॅनला.

टेस्ट मॅचच्या पहिल्याच दिवशी स्टॅंडमध्ये बसून निवांत गुटखा चघळणाऱ्या कार्यकर्त्याचा फोटो व्हायरल झाला. भावानं पद्धतशीर तोबरा भरला होता, शेजारी एक कार्यकर्ती बसली होती आणि भावाचं फोनवर बोलणं सुरू होतं.

सोशल मीडियावर लोकांना लय प्रश्न पडले, कुणी म्हणलं की, हा कार्यकर्ता थुंकणार कुठं? शेजारी बसलेली कोण आहे? ग्राऊंडमध्ये गुटखा खाणं अलाऊड आहे का? यातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं काय मिळाली नाहीत. पण काही खुंखार कार्यकर्त्यांनी भावाला शोधलंच आणि काही प्रश्नांची उत्तरं मिळवलीच.

हा गुटखा मॅन कोणाय?

तर कानपूरमध्ये राहणाऱ्या या भिडूचं नाव आहे, शोभित पांडे. कानपूरमधल्या कमला टॉवरच्या जवळ शोभित राहतो. कपड्यांचा वापरी असलेला शोभित क्रिकेटचा फॅन आहे. तो कसोटीच्या पहिल्या दोन्ही दिवशी मॅच बघायला आला होता.

तो खरंच गुटखा खात होता का?

एका पत्रकारानं शोभितला विचारलं की, त्या व्हिडीओमध्ये तू दिसतोय, तू खरंच गुटखा खात होतास का? शोभित त्यावर म्हणतोय, ‘नाय भावा, मी तर गोड सुपारी खात होतो, गुटखा बिटखा काय नाय.’

बरं तो म्हणतोय मिठी सुपारी, तर मिठी सुपारी. पण मग त्याच्यासोबतची मुलगी कोण होती?

आता शोभित म्हणतोय, माझ्यासोबत माझी बहीण होती. आता एवढं बोलतोय, तर बहीण असेल. पण एक गोष्ट कळली नाय भिडू. घरी साधं पान खाऊन आलो, तरी बहीण हाणती आणि हा इथं बहीण सोबत असताना गुटखा किंवा सुपारी खातोय? कसं शक्यय? आता हे त्याला विचारायला गेलं तर तो म्हणणार, “भावा हे कानपूर हाय, इथं असंच असतं.”

भावानं फोन कुणाला लावला होता?

स्टेडियममध्ये कानाला फोन लावलेला माणूस म्हणलं की, दाऊदचा फोटो फिक्स आठवतो. त्यामुळं या भावानं कुणाला फोन लावला होता, याची लय डेंजर चर्चा सुरू झाली. पण त्यानं याचं पण स्पष्टीकरण दिलंय. तो म्हणतो, ‘माझा एक मित्र दुसऱ्या गेटला थांबला होता, मी त्याच्याशी फोनवर बोलत होतो.’ आता कार्यकर्ता किती खरं बोलत होता आणि किती खोटं हे त्यालाच माहिती.

पण एक आहे दुसऱ्या दिवशी गड्यानं हातात बोर्ड धरून फोटो काढला. ज्याच्यावर लिहिलं होतं, गुटखा खाना गलत बात है!

तो मिठी सुपारी खात होता, याच्यावर विश्वास ठेवायचं ठरवलं की त्याचे दात दिसतात आणि मनातला डाउट पक्का होतोय. आता त्यानं काय खावं आणि काय नाय हा त्याचा प्रश्नय. पण जरा आडोशाला खावं की, खरं आता ती न्यूझीलंडची लोकं काय म्हणाली असतील?

व्हायरल व्हिडीओमुळं एक वांदा झालाय, या भावाला पुढं जाऊन स्थळ वैगरे आलंच तर घरच्यांना हे पण सांगता येणार नाही की, ‘आमच्या पोराला सुपारीचंबी व्यसन नाही…’

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.