वाजपेयींनी दिलेली राष्ट्रपती पदाची ऑफर कांशीराम यांनी का नाकारली…?

‘मान्यवर’ या नावाने ओळखले जाणारे कांशीराम हे दलित समाजातून येणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतरचे निर्विवादपणे सर्वात मोठे नेते होते. उत्तर प्रदेशातील बहुजन राजकारणावर त्यांचा किती प्रभाव होता याचा अंदाज केवळ यावरूनच लावता येईल की कॉंग्रेस आणि भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षांशी युती करूनही अनेकवेळा उत्तर प्रदेशचं राजकारण आपल्याभोवती आणि पर्यायाने बसपाभोवती कसं फिरत राहील याची त्यांनी व्यवस्थित काळजी घेतली होती. १९९५ साली उत्तर प्रदेशात भाजपच्या सहकार्याने सरकार स्थापन करून मायावती यांना मुख्यमंत्रीपदी बसविणे, ही राजकीय कृती त्याचीच निदर्शक.

KANSHIRAM 1

काल जाहीर झालेल्या उत्तर प्रदेशातील गोरखपूर आणि फुलपूर लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालात समाजवादी पार्टीने बहुजन समाजवादी पार्टीच्या पाठींब्याने भाजपकडून दोन्ही  जागा खेचून आणल्या असल्या तरी असा प्रयोग यापूर्वीच कांशीराम यांनी १९९३  मध्ये केला होता. ज्याला अनेक राजकीय अभ्यासक कांशीराम यांचा ‘मास्टरस्ट्रोक’ मानतात. १९९३ च्या विधानसभा निवडणुका सपा-बसपा यांनी सोबत लढल्या आणि भाजपचा पराभव केला. बाबरी मशिदीच्या पतनानंतरचा तो काळ होता आणि हिंदुत्ववादाचं राजकारण जोर धरत होतं. अशावेळी भाजपला पराभूत करणं केवळ अशक्य वाटत असताना ‘कांशीराम-मुलायम’ जोडगोळीने हा कारनामा घडवून आणला होता. २०१८ मधली परिस्थितीही काही फारशी वेगळी नाही. ४ वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत या दोन्हीही जागांवर भाजपने मोठा विजय मिळवला होता. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या या जागांवर भाजपची मजबूत पकड होती. पण बहुजन समाज पक्षाच्या पाठींब्याने अखिलेश यादव यांच्या नेत्वृत्वाखालील समाजवादी पक्षाने भाजपला पराभवाचा झटका दिला.

एक किस्सा तर असाही आहे की भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी कांशीराम यांना राष्ट्रपती पदाची ऑफर दिली होती, पण कांशीराम यांनी आपल्याला देशाचा पंतप्रधान व्हायचं  आहे असं सांगून ही ऑफर नाकारली होती. अर्थात ही ऑफर देण्यामागे वाजपेयींची स्वतःची वेगळी राजकीय गणितं होती. कांशीराम यांना राष्ट्रपतीपदी बसवून  उत्तर प्रदेशातील राजकीय स्पेस भाजपला मिळवून देण्यासाठी खेळण्यात आलेली ही राजकीय चाल होती, जी कांशीराम यांना समजली नसती तर नवलंच.

१९८४ साली बहुजन समाजवादी पक्षाची स्थापना केलेल्या कांशीराम यांची राजकीय फिलॉसफी खूप सरळ होती. बहुजन समाजाला त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी, ते सत्तेला साधन मानत असत. बहुजन समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय  प्रगतीसाठी सत्तेची सूत्र या समाजाने आपल्या हाती घेतली पाहिजेत असं ते म्हणत. एका अर्थाने डॉ. आंबेडकरांनी बहुजन समाजाला शासनकर्ती जमात बनण्याचा जो मार्ग सांगितला होता, तेच मॉडेल कांशीराम सांगत होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.