महापूरावेळी त्या बारा जणांनी मिळून दोन दिवसात अडीच हजार लोकांना वाचवलं.

कृष्णा पंचगंगा नद्यांच्या खोऱ्यात वसलेला शिरोळ तालुका. सुपीक शेतीचा प्रदेश. पण दरवर्षी पावसाळ्यात पुराचा फटका पाचवीला पुजलेला. पण मागच्या वर्षीचा पाऊस काही तरी अघटीत घडवणारा असणार आहे याची कोणाला पुसटशी देखील कल्पना नव्हती.

हीच गोष्ट कनवाड गावची.

हे गाव आहे कोल्हापूर जिल्हा आणि सांगली जिल्ह्याची सीमारेषा आहे कृष्णा नदी. नदीच्या पलीकडे कोल्हापूर जिल्ह्यात कनवाड आणि तर अलीकडे सांगली जिल्ह्यात म्हैसाळ. या दोन्ही गावांना जोडणारा रस्ता गेल्या पंधरा दिवसापासून पाण्याखालीचं आहे. आज ना उद्या हे पाणी ओसरेल याच भरवश्यावर गावकरी होते.

पण यावेळचा मुसळधार पाऊस थांबतच नव्हता आणि बघता बघता अख्ख्या गावाला पुराने वेढून टाकले. शिरोळ , म्हैसाळ अशा गावांना जोडलेले रस्ते पाण्याखाली गेले. अनेक दिवस हे कनवाड पाण्यातच होतं.

आमचे भिडू वाचक संग्राम गायकवाड हे म्हैसाळ या गावचे रहिवाशी आहेत. त्यांनी आपल्या शेजारच्या या कनवाडची भीषण परिस्थिती आम्हाला कळवली. त्यांनी सांगितलं की अडगळीत पडलेल्या या गावाकडे मदत पाठवायचं कोणाच्या लक्षातच आलं नाही. 

गेले दोन तीन दिवस झालं या गावकऱ्यांनी प्रशासनाच्या भरवश्यावर न राहता स्वतःची मदत स्वतःच करायचं ठरवलं.  

तिथल्या दहा-बारा तरुणांनी ग्रामपंचायतीच्या एका जुन्या नावेतून पूरग्रस्तांना शेजारच्या म्हैसाळमध्ये सोडायचं ठरवलं. दिवसभर ही मूले ती होडी वल्हवून महापुराच्या प्रवाहाला तोडत होती आणि गावकर्यांना या कचाट्यातून सुखरूप बाहेर काढत होती.

तीन दिवस झाले त्यांचा हाच दिनक्रम चालू होता. सुरवातीला गावकरी गाव सोडायला तयार नव्हते पण शेवटी जड अंतकरणाने आपल्या आपल्या मुलांप्रमाणे जपलेल्या जनावरांची दाव सोडून, आपला संसार मागे ठेवून नावेत बसू लागले.  नावेतून उतरताना लोकांना जमीन दिसली तरी अश्रू थांबत नव्हते.

संग्राम गायकवाड यांनी सांगितल की,

म्हैसाळकरांनी या लोकांच्या राहण्याची सोय केली आहे.  येथील शिवराज मित्रमंडळ आणि ग्रामस्थ जी लोक अजूनही कनवाडमध्ये अडकली आहेत त्यांच्यासाठी त्याच नावेतून जेवण, औषधे इतर मदत पाठवत  आहेत.

IMG 20190809 WA0149

ही नाव हाकणाऱ्या मध्ये बाबासाहेब कोळी(हे नावेच सुकाणू पकडतात), अभिजित कोळी, मेहबूब बारगीर, यासीन जामदार, सुधाकर कोळी, प्रभाकर कांबळे, राजू कुपवडे, नूर इनामदार, बाळासो हिंगमिरे, बाबासो पाटील, दादासाहेब कोळी, राजू कोळी यांचा समावेश होता.

जवळपास अडीच हजार लोकांना या कणवाडच्या मुलांनी वाचवल. नाव हाकून या मुलांच्या हाताला फोडी आल्या. हा सगळा प्रकार जीवाशी खेळच होता. तरीही प्रशासनाची मदत या गावापर्यंत पोहचली नव्हती.

बोल भिडूच्या माध्यमातून आपण या घटनेला वाचा फोडली. जनतेच्या दबावानंतर उशिरा का होईना प्रशासनाचे लक्ष या गावाकडे गेले. लष्करी मदत पोहचवली गेली. 

२०१९ चा सांगली-कोल्हापूर येथे आलेला महापूर माणुसकीचे दर्शन घडवणारा ठरला. एकमेकाला मदत केली तर कोणत्याही प्रलयाला तोंड देता येते हे यातून सिद्ध झाले.

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Kedarpatil says

    Bhayanak paristhiti aahe

Leave A Reply

Your email address will not be published.