फॅन्स तुफान दगडफेक करत होते पण कप्तान कपिल देव आपल्या जागेवर ठामपणे बसून राहिले…

भारतीय माणसाला तीन गोष्टींचं वेड आहे असं म्हणतात. एक म्हणजे राजकारण, दुसरं म्हणजे बॉलिवूड आणि तिसरं म्हणजे क्रिकेट. लोक या तिन्ही गोष्टींच्या बाबतीत प्रचंड पझेसिव्ह असतात. एकवेळ देव म्हणून डोक्यावर नाचतील नाही तर थेट जमिनीवर नेऊन आदळतील सांगता येत नाही.

विशेषतः क्रिकेटमध्ये हा अनुभव खूप वेळा येतो. भारतात गावस्कर, कपिल, सचिन, गांगुली, धोनी आणि आता विराट कोहली असे कित्येक सुपरस्टार होऊन गेले. फॅन्स त्यांच्यासाठी जीव ओवाळून टाकताना दिसतात पण एखाद्या मॅचमध्ये परफॉर्मन्स गंडला तर त्याची त्यांना मोठी किंमत चुकवावी लागते.

असच घडलं होतं कपिल देव सोबत.

कपिल देव निखंज. गेल्या शतकातला सर्वोत्तम भारतीय खेळाडू. बेस्ट आॅल राऊंडर. भारताचा खऱ्या अर्थाने पहिला फास्ट बॉलर. त्याच्या आधी भारतात फक्त मध्यमगती गोलंदाज असायचे ज्यांच काम स्पिनर येईपर्यंत बॉल जुना करायचं. कपिल आल्यावर सगळ बदलून गेलं.

त्याने भारतीय क्रिकेट संघात आक्रमकता आणली. फक्त बॉलिंगमध्येच नाही तर संघाच्या एकंदर ऍटिट्यूड मध्ये कपिल मुळे ऍग्रेसिव्हनेस आले. याच त्याच्या आक्रमकतेमुळे १९८३ साली भारताला पहिल्यांदा वर्ल्डकप मिळाला. जेव्हा कोणाला वाटलं देखील नव्हतं तेव्हा अपेक्षा नसताना भारत विश्वविजेता बनला याच सगळं श्रेय कपिललाच देण्यात आलं.

भारताने अनपेक्षितपणे वेस्ट इंडिजला हरवून वर्ल्डकप जिंकला त्याच्या अगदीच काही दिवसांनी त्यांची टीम भारत दौऱ्यावर आली.

वेस्ट इंडिज तेव्हा जगातली सर्वोत्तम टीम समजली जायची. क्लाइव्ह लॉइड, विच रिचर्ड्स, गॉर्डन ग्रिनिच,माल्कम मार्शल, मायकल होल्डिंग असे दिग्गज खेळाडू या संघात होते. तरीही भारतासारख्या फुटकळ संघाने आपल्याला हरवलं याचा वेस्ट इंडिजला प्रचंड राग होता. वर्ल्ड कपचा बदला घ्यायचा म्हणूनच त्यांची टीम प्रचंड तयारीने भारतात आली.

पण जगज्जेता झालेल्या भारतीय संघाला त्यांना म्हणावे तसे उत्तर देणे जमले नाही. ६ कसोटीच्या या सिरीजमध्ये आपल्या खेळाडूंचा वेस्ट इंडिजने चांगलाच वचपा काढला. प्रेक्षकांचा प्रत्येक सामना गणिक आपल्या टीम बद्दलचा अभिमान ढासळत गेला.

याचा कडेलोट झाला होता चौथ्या कसोटीत. हि कसोटी कलकत्त्याच्या ईडन गार्डनवर खेळवण्यात आली.

तस बघितलं तर ईडनच पब्लिक पहिल्यापासून खुंखार समजलं जातं. छोटीशी झालेली चूक देखील ते खपवून घेत नाहीत. यापूर्वी देखील कित्येकदा ईडन गार्डनवर दंगलीचा अनुभव आला आहे. अनेकदा प्रेक्षकांनी तिथल्या खुर्च्या जाळल्या आहेत, खेळाडूंवर देखील हल्ला झाला.

त्या मॅचमध्ये तसंच घडलं. 

बॅटिंगमध्ये सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, मोहिंदर अमरनाथ असे दिग्गज सपशेल फेल ठरले. एकट्या कपिलने काढलेल्या ६९ धावांच्या जोरावर भारताने पहिल्या डावात २५० धावा काढल्या. त्याला उत्तर देताना वेस्ट इंडिजची सुरवात देखील रडत खडतच झाली. कपिलच्या तुफानी बॉलिंग पुढे रिचर्ड्स आणि हेन्स इतर मंडळी अगदी स्वस्तात पव्हेलियन मध्ये परतली.

त्यांच्या सात विकेट आउट होऊन १७४ धावा झाल्या होत्या. एकूण सामना भारताच्या बाजूने झुकलेला होता. फक्त क्लाइव्ह लॉइड आपला खुंटा गाडून क्रीझवर उभे होते. त्यांना साथ द्यायला आलेल्या माल्कम मार्शलला अजून बॉल चा अंदाज येत नव्हता.

अशातच मोहिंदर अमरनाथचा मध्यमगती चेंडू माल्कम मार्शलच्या मागच्या पायावर आदळला. एखाद्या फलंदाजाच्या मागच्या पायावर चेंडू आदळला की तो पायचित झाला असे समजावे हा क्रिक्रेटमधला नियम. तरीही भारतीय अंपायरनी मार्शलला नाबाद ठरविले. पुढे मार्शलने क्लाईव्ह लॉईडला अशी काही साथ दिली की त्या कसोटी सामन्याचा सारा रंगच बदलून गेला. 

कपिल देव आपल्या आत्मचरित्रात सांगतो की,

भारतीय पंचांचा निर्णय निखालस चुकीचा होता आणि त्यातून तो अशा वेळी दिला गेला की भारताच्या धावसंख्येला तोंड देताना प्रतिस्पर्धी संघाच्या ७ बाद १७२ धावा झालेल्या होत्या. पंचाच्या मनातील तथाकथित संशयाचा फायदा घेऊन वेस्ट इंडीजने ३७७ धावा फटकावल्या आणि आम्हाला एका डावाचा पराभव पत्करावा लागला.

दुसऱ्या डावात भारतीय संघाचा डाव तर ९० धावतच आटोपला होता. आपल्या टीमची हि अवस्था बघून कलकत्त्याच्या प्रेक्षक प्रचंड नाराज झाले.

मॅच संपल्यावर भारतीय टीम ईडन गार्डन्स येथून बसमधून जायला निघाली असताना त्यांच्या बसवर दगडांचा तुफान वर्षाव सुरु झाला. चार सामन्यांपैकी तीन मध्ये ते हरले होते आणि एक अजून खेळायचा बाकी होता. सगळे खेळाडू दगडफेकीला घाबरून सीटच्या खाली लपले होते.

कपिल देव म्हणतात,

बसच्या खिडक्यांच्या काचांवर दगड येऊ लागल्यावरही खाली पडून राहणे मला पसंत पडले नाही. मी पूर्वीसारखाच बसून राहिलो. माझे बहुतेक सहकारी आडवे झालेले होते. त्या पराभवाने मी खचून गेलो हे खरे, परंतु त्यामुळे मला तो प्रश्न टाळायचा नव्हता. तसेच लोकांच्या तात्पुरत्या संतापाचीही फिकीर करायची नव्हती. एका भारतीय पंचाच्या निर्णयामुळे हे असे घडले याची त्यांच्यापैकी किती जणांना कल्पना असणार ? भारतीय पंचाने वेस्ट इंडीजला संशयाचा फायदा दिला नसता तर हा सामना आम्ही कदाचित जिंकूही शकलो असतो.

क्रिक्रेटपटूच्या जीवनामध्ये प्रशंसेला जसे स्थान असते तसच त्याला अवमानही सहन करावे लागतात. 

गेल्या काही दिवसांपूर्वी वर्ल्ड कप जिंकलेल्या कपिल आणि टीमला उघड्या बसमध्ये लोक हार तुरे घालून स्वागत झालं होतं. पण तेच प्रेक्षक आज टीमवर दगडफेक करत होते. कपिल म्हणतो,

त्या पराभवाने मी खचून गेलो हे खरे, परंतु त्यामुळे मला तो प्रश्न टाळायचा नव्हता. तसेच लोकांच्या तात्पुरत्या संतापाचीही फिकीर करायची नव्हती. एका भारतीय पंचाच्या निर्णयामुळे हे असे घडले याची त्यांच्यापैकी किती जणांना कल्पना असणार ? भारतीय पंचाने वेस्ट इंडीजला संशयाचा फायदा दिला नसता तर हा सामना आम्ही कदाचित जिंकूही शकलो असतो.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.