भल्याभल्यांची विकेट काढणाऱ्या कपिल देवची विकेट अभिनेत्री सारिकाने काढली होती

आपल्या भारतीयांमध्ये क्रिकेट आणि बॉलीवूड याबद्दलचं विलक्षण प्रेम आहे. त्यांच्या प्रेमाचा तिसरा विषय आहे राजकारण. या तिन्ही गटातील व्यक्तींना देखील परस्परांविषयी खूप आकर्षण असते. त्यामुळेच यांच्यातील मधुर संबंधाची कायमच चर्चा होत असते.

क्रिकेट आणि बॉलीवूड यांच्यातील नाते खूप जुने आहे.

सत्तर च्या दशकाच्या सुरुवातीला अभिनेत्री अंजू महेंद्रा आणि वेस्टइंडीज चा कर्णधार गॅरी सोबर्स यांच्यामध्ये प्रेम प्रकरण चांगले रंगले होते. अभिनेत्री पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहसीन खान याच्याशी लग्न करून पाकिस्तानात निघून गेली होती. अशा अनेक जोड्या आहेत.

अलीकडच्या काळातील गाजलेली जोडी म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा. उमद्या क्रिकेटपटूंवर तरुणी कायमच फिदा असायच्या.

१९७५ साली वानखेडे स्टेडीयम वर वेस्ट इंडीज सोबत आपला कसोटी सामना चालू होता. त्यावेळी फलंदाज ब्रिजेश पटेल याने अर्ध शतक ठोकल्यानंतर प्रेक्षकातून एक तरुणी पळत पळत येऊन तिने ब्रिजेश पटेलला मैदानातच ‘किस’ केले होते. हि वीस सेकंदाची व्हिडीओ क्लिप मध्यंतरी खूप व्हायरल झाली होती. एका सुप्रसिध्द चॉकलेट कंपनी ने आपली जाहिरात याच सिच्युएशन वर बनवली होती.

सत्तरच्या दशकात भारतीय क्रिकेट संघामध्ये कपिल देव निखंज यांचे आगमन झाले.

भारताच्या या जलदगती गोलंदाजाने आपल्या देशाला वर्ल्डकप मध्ये घवघवीत यश मिळवून दिले होते. २५ जून १९८३ रोजी भारताने क्रिकेटच्या पंढरीत आयसीसी वर्ल्ड कप जिंकला होता. त्यावेळी घरोघर कपिल देव चे नाव पोहोचले होते.

भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील ही ऐतिहासिक घटना तर होतीच पण तो संस्मरणीय क्षण होता. याच घटनेवर या वर्षी ‘८३’ नावाचा एक चित्रपट देखील प्रदर्शित झाला होता. ज्यात कपिलदेवची भूमिका रणवीर सिंग यांनी केली होती. चारशे बळी आणि पाच हजारहून अधिक धावा हा विक्रम कपिल देव यांच्या नावावर आहे.

कपिल देव यांचे एका बॉलीवूडच्या नायिके सोबतच्या मैत्री च्या बातम्यानी सत्तरच्या दशकाच्या अखेरीस वर्तमानपत्राच्या हेडलाईन्स रंगल्या होत्या. १९७५ सालच्या ‘गीत गाता चल’ या चित्रपटापासून नायिका बनलेल्या सारिका सोबत कपिल देवच्या प्रेमप्रकरणाची चर्चा रंगली होती.

सारिकाच्या मधाळ नजरेने कपिल देव पार क्लीन बोल्ड झाला होता.

अभिनेते मनोज कुमार यांच्या पत्नीने कपिल देव आणि सारिका यांची एका पार्टीमध्ये ओळख करून दिली होती. पहिल्याच भेटीत दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. मग अनेक पार्टीच्या ठिकाणी . हॉटेलमध्ये ते दिसू लागले. त्या काळात वर्तमानपत्रात यांच्या भेटीच्या अनेक बातम्या तिखट मीठ लावून छापल्या जाऊ लागल्या.

कपिल देवने सारिकाला पंजाब मध्ये आपल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी पाठवले होते. त्यांच्याकडून देखील या नात्याला काहीच हरकत नव्हती. कपिल देव पुरता सारिकाच्या प्रेमात बुडाला होता. सारिकाचे बॉलीवूड करिअर फारसे काही यशस्वी झाले नाही. हे दोघे लग्न करणार हे जवळपास निश्चित झालं होतं. पण अचानक माशी शिंकली!

कपिल देव याचा क्रिकेटपटू मित्र सुनील भाटिया याने एकदा रोमी भाटिया या तरुणीची कपिल सोबत ओळख करून दिली. कपिलला रोमी पहिल्या भेटीतच खूप आवडली आणि साहजिकच त्याचा सारिका मधील इंटरेस्ट कमी झाला.

सारिकासाठी हा धक्का खूप मोठा होता कारण तिने खरोखरच मनापासून कपिल देव वर प्रेम केले होते. पण कपिल तिला आता टाळत होता. हळू हळू तिच्या ते लक्षात येवू लागले. आणि त्यांच्यात एक दिवशी ब्रेक अप झाले. सारिका सोबत कपिलचे अफेअर फार तर वर्षभर चालले.

वेस्टइंडीज सोबत जानेवारी १९७९ मध्ये दिल्ली च्या फिरोज शहा कोटलावर टेस्ट मॅच होती. कपिलने रोमी भाटियाला बोलावले होते. त्या सामन्यात कपिलने पहिले शतक झळकावले होते.(नाबाद १२६) हा शुभ शकुन रोमीच्या उपस्थितीचा आहे असे त्याला वाटले.

पुढे रोमी कपिल देवला भेटण्यासाठी मुंबईत आली. मुंबईला या दोघांनी लोकल मधून प्रवास केला. स्ट्रीट शॉपिंग केली. याच मुंबईच्या प्रवासात लोकलमध्ये कपिलने रोमिला प्रपोज केले. अशा पद्धतीने कपिल सारिकाच्या प्रेम कहाणीचा अंत झाला आणि कपिल देवने १६ जानेवारी १९८० रोजी रोमी भाटिया सोबत लग्न केले. पण सारिका सोबतची त्याची प्रेम कहाणी अधुरीच राहिली.

-भिडू धनंजय कुलकर्णी 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.