फक्त दोन चपात्यांसाठी कपिलला मुंबईत आंदोलन करावं लागलं होतं..

कपिल देव निखंज. गेल्या शतकातला सर्वोत्तम भारतीय खेळाडू. बेस्ट आॅल राऊंडर. भारताचा खऱ्या अर्थाने पहिला फास्ट बॉलर. त्याच्या आधी भारतात फक्त मध्यमगती गोलंदाज असायचे ज्यांच काम स्पिनर येईपर्यंत बॉल जुना करायचं. कपिल आल्यावर सगळ बदलून गेलं.

कपिलचे आईवडील दोघेही आज पाकिस्तानमध्ये असलेल्या पंजाबचे. त्यांच कुटुंब फाळणीनंतर चंडीगड मध्ये येऊन वसलं. कपिल सात मुलांपैकी सहावा. रामलाल निखंज हे मुळचे जाट शेतकरी. चंडीगडमध्ये आल्यावर त्यांनी लाकडाचा व्यवसाय केला. तो चांगला चालला.

कपिल शेंडेफळ असल्यामुळे त्याचे भरपूर लाड झाले. त्याला लहापणापासून क्रिकेटची आवड होती. जेव्हा त्यान आपल्या घरी मुझे क्रिकेट खेलना है असं सांगितलं तेव्हा विशेष असा काही विरोध झाला नाही.

रामलाल निखंज यांना तर क्रिकेट हा खेळच माहित नव्हता. त्यांना वाटलं कुस्तीसारखा काही तरी खेळ आहे. लगेचच पोराला दुधासाठी घरात म्हैस आणून बांधली. 

हे दूधदुभतं आणि अस्सल जाट खाण्याचा परिणाम अगदी कमी वयात कपिल एक तगडा बॉलर म्हणून नावारूपास आला. शाळेच्या क्रिकेटमध्ये त्याच्या बॉलिंग समोर अनेक खेळाडू जखमी होऊन हॉस्पिटलमध्ये जमा होऊ लागले. त्याची नावाची चर्चा हरयाणा रणजी टीम मध्ये होऊ लागली.

त्याकाळी निरनिराळ्या ठिकाणी प्रशिक्षण शिबिरे चालायची. अंडर १९ च्या खेळाडूंना या शिबिरातून घडवलं जायचं. अशाच एका मुंबईला होणाऱ्या शिबिरासाठी कपिलची निवड झाली. तो तेव्हा फक्त १५ वर्षांचा होता.

कपिलच्या करियरच्या दृष्टीने हे महत्वाचे शिबीर होते. संधीची अनेक दारे मुंबईच्या शिबिरात उघडली जाणार होती. त्याला तिकडे जाण्याची खूप इच्छा होती. पण एका छोट्या मुलाला इतक्या दूर एकटं सोडण्यास घरचे तयार नव्हते. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्याचे वडील तयार नव्हते.

कपिलची रात्री ट्रेन होती आणि वडील लवकर झोपी गेले होते. त्यांना उठवण्याचा धाडस कोणाकडेही नव्हतं. कपिलला आपलं क्रिकेट खेळण्याचं स्वप्न कायमचं संपलं असच वाटलं. त्याची ती अवस्था बघून अगदी शेवटच्या क्षणी त्याच्या आईने कसबस रामलाल यांना तयार केलं.

वडिलांनी त्याला हजार रुपये दिले. कपिलने धावत पळत ट्रेन पकडली. स्वप्ननगरी मुंबईकडे त्याचा प्रवास सुरु झाला.

मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर क्रिकेट क्लब ऑफ इंडिया तर्फे हे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. संपूर्ण देशभरातून १९ वर्षाखालील मुले या शिबिरात हजर झाली होती. त्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था शिबीरातच केली होती. मुंबईचे एक्सपर्ट कोच त्यांना प्रशिक्षण देत होते. याशिवाय माजी खेळाडूंना खास टिप्स देण्यासाठी बोलवले जात होते.

दिवसभर मैदानाच्या फेऱ्या मारणे, व्यायाम, नेटप्रॅक्टिस, शिवाय मॅच प्रॅक्टिस यात सगळ्या खेळाडूंचा दम निघत होता. ही सगळी वाढत्या वयातली मुलं जेव्हा रात्री दमून भागून यायची तेव्हा जेवणावर तुटून पडायची. पण या प्रशिक्षण शिबिराचे प्रमुख केकी तारापोर यांनी जेवणात फक्त दोनच चपात्या देण्याचे ऑर्डर सोडले होते.

अस्सल जाट परिवारातून आलेल्या कपिलचा डाएट मोठा होता. आईच्या हातच्या सरसो का साग मक्के दि रोटी ताणून देणाऱ्या कपिलला या दोन छोट्या छोट्या चपात्या कुठे पुरणार होत्या.

पहिले दोन दिवस गप्प बसला पण तिसऱ्या दिवशी मात्र त्याला भूक आवरली नाही. त्याने मला चपात्या जास्त हव्या आहेत म्हणून मागणी केली.

त्याच्या बरोबर आणखी मुले पण आम्हाला जेवण पुरत नाही म्हणून मागणी करू लागले. जेवणाच्या ठिकाणी गोंधळ सुरु झाला. आम्हाला वरून ऑर्डर आहेत तेवढंच आम्ही वाढणार असं वाढपी सांगत होते. कपिल मग धरण्यावर बसला. जेवणवाढवून मिळत नाही तो पर्यंत त्याला शिवणार देखील नाही असा खेळाडूंनी स्टॅन्ड घेतला होता.

परिस्थिती आटोक्याबाहेर जात असलेलं पाहून केकी तारापोर यांना बोलवण्यात आले. तारापोर म्हणजे भारदस्त व्यक्तिमत्व. एकेकाळी त्यांनी भारताकडून कसोटी खेळली होती.सीसीआयचे ते सेक्रेटरी होते आणि बीसीसीआय मध्ये देखील त्यांचं मोठं वजन होतं. एवढ्या मोठ्या माणसासमोर ही छोटी मुलं सत्याग्रहावर बसली होती. त्यांचा पारा चढला. या खेळाडूंचा म्होरक्या असलेल्या कपिलला बोलावून घेतलं.

कपिल जेव्हा त्यांच्या ऑफिस मध्ये आला तेव्हा ते भडकून म्हणाले,

“तू शिबिरात काय करत आहेस?”

तो म्हणाला,” मी फास्टर बॉलर आहे आणि बॉलिंग सुधारावी म्हणून ट्रेनिंग घेत आहे. मला जास्त मेहनत घ्यावी लागते. हे जेवण पुरत नाही.”

यावर तारापोर फटकळपणे म्हणाले,

“कैसे पॉसिबल है ? भई, इंडिया में तो फास्ट बॉलर होते ही नहीं हैं.

भूल जाओ ये सब. तुम्हारे लिए अलग से कुछ भी नहीं होगा. मैं तेज़ गेंदबाज़ों को शक्ल से ही पहचान जाता हूँ “

त्यांचं बोलणं ऐकून कपिलला धक्काच बसला. एवढ्या तज्ज्ञ व्यक्तीने आपला पाणउतारा करावा हे त्याला कळतच नव्हते. तस बघायला गेलं तर हि परिस्थिती खरीच होती. भारतात आजवर एकही क्वालिटी फास्ट बॉलर झाला नव्हता. होते ते सगळे मेडीयम पेसर. फास्टर बॉलरना भारतीय पिचवर तरी किंमत नव्हती.

कपिलने त्या दिवशी मनाशी बजावलं की केकी तारापोर यांचे शब्द खोटे करून दाखवायचे.

त्यांनी त्याला एकप्रकारे आव्हानच दिलं होतं. त्या दिवसानंतर कपिलच आयुष्य बदलून गेलं. आधी पेक्षा तो प्रचंड मेहनत घेऊ लागला. मोठमोठ्या खेळाडूंना बघून त्याने स्वतःची स्टाईल तयार केली. तुफान वेग, खास मेहनतीने शिकलेले इनस्विंग हे त्याचे वैशिष्ट्य ठरले,

पुढच्या काहीच वर्षात त्याने भारतीय टीम मध्ये जागा मिळवली. कपिल तब्बल १३१ कसोटी खेळला व त्याने चारशे हुन अधिक विकेट्स कमावला. भारताचा गेल्या शतकातला सर्वात महान खेळाडू ही उपाधी कमावली. पण मुंबईमध्ये घडलेली ती घटना तो कधीच विसरला नाही.

रिटायरमेंट नंतर एकदा कपिलला मुंबईत सीसीआयमध्ये सत्कारासाठी बोलवण्यात आले होते. त्यावेळी त्याने ही मनाला खोलवर जखम केलेली आठवण सांगितली आणि तिथल्या अधिकाऱ्यांना विचारलं की आज तरी मला हव्या तेवढ्या रोटी खाऊ द्याल की नाही. त्यांनी खाली मान घातली.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.