कपिल सिब्बल यांनी बोलावलेली डिनर डिप्लोमसी राहुल गांधींच्यासाठी चिंतेची बाब ठरतेय..

कॉंग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी सोमवारी रात्री जन्मदिवसाच्या पूर्वसंध्येला मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. त्याला १५ विरोधी पक्षातील ४५ नेते सामील झाले होते. मात्र यात मुख्य म्हणजे गांधी परिवारातील एकही सदस्य सामील नव्हता. त्यामुळे या मेजवानीच्या आमंत्रणावरून राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

कॉंग्रेस मधील जी-२३ मुळे यापुर्वीही वाद निर्माण झाला होता. कॉंग्रेस मधील ज्येष्ठ नेत्यांचा एक गट गेल्या काही दिवसापासून कॉंग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष देण्याची मागणी करत आहे. त्या गटात कपिल सिब्बल, गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, मनीष तिवारी, शशी थरूर, संदीप दीक्षित यांचा समावेश आहे.

कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून कॉंग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष बरोबर इतरही  मागण्या केल्या होता. त्यावरून मोठा वाद झाला होता.

कॉंग्रेसच्या ब्रेकफास्ट मिटींग अनुपस्थित राहणारे शरद पवार सोमवारी उपस्थित होते.

काही दिवसापूर्वी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी विरोधी पक्ष नेत्यांसाठी ब्रेकफास्ट मिटींग आयोजित केली होती. त्यावेळी मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष अनुपस्थित होते. मात्र सोमवारी रात्री कपिल सिब्बल यांनी आयोजित केलेल्या मेजवानीला मात्र ते आवर्जून उपस्थित होते. तसेच शिवसेना खासदार संजय राऊत, तृणमूलचे डेरेक ओ’ब्रायन, ओमर अब्दुला, सीताराम येचुरी सारखे मोठे नेते सामील झाले होते.

लालू प्रसाद यादव यांची उपस्थिती

जेल मधून बाहेर पडल्या नंतर पहिल्यांदा लालू प्रसाद यादव यांनी अशा प्रकारे सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग घेतला होता. त्यावेळी त्यांनी विरोधी पक्षांनी एकजूट असायला हवे असे बोलून दाखविले आहे. तसेच त्यांनी कॉंग्रेस आठवण करून दिली की, कपिल सिब्बल सारख्या नेत्याच्या अनुभवाचा फायदा कॉंग्रेसने घ्यायला हवा. याचा अर्थ कॉंग्रेस मध्ये ज्येष्ठ नेत्यांना डावलण्यात येत असल्याची भावना इतर पक्षातील नेते बोलून दाखवत आहेत.

डिनर डिप्लोमसी कशासाठी

पुढच्या वर्षी  होणाऱ्या पंजाब आणि उत्तरप्रदेश मधील होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन दिल्लीतील राजकारण तापले आहे. विरोधी पक्ष आता पासून तयारीला लागले आहेत. विरोधकांमध्ये एकजूट करण्यासाठी कॉंग्रेसकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. यानिम्मित कपिल सिब्बल यांनी देशभरातील ज्येष्ठ विरोधी पक्ष नेत्यांना आपल्या घरी जेवणासाठी बोलाविले होते.

मात्र त्याला गांधी परिवारातील एकही सदस्य उपस्थित नव्हता. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी कपिल सिब्बल यांनी सांगितले की, भाजप विरोधात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याची भावना बोलून दाखविली आहे.

राहुल गांधी सध्या सरकारला घेरण्यासाठी विरोधी पक्षांना एकत्र आण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहे. ब्रेकफास्ट मिटिंग, दिल्लीत सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाला विरोधी नेत्यांना घेऊन भेट घेतली होती. मात्र सोमवारी कपिल सिब्बल यांच्या घरी जमलेल्या विरोधी पक्ष नेत्या मध्ये ते नसल्याने सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.  

तर पक्षाकडून राहुल गांधी हे सध्या काश्मिर दौऱ्यावर आहेत तर प्रियंका गांधी या परदेशात असल्याचे सांगण्यात येत आहे.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.