कपिल सिब्बल यांनी राजकारणात येऊ नये म्हणून त्यांचा मुलगा उपोषणाला बसला होता..

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल सध्या चांगलेच चर्चेत आहेत. काँग्रेस अध्यक्षपदाबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेस कार्यकर्ते त्यांच्या विरुद्ध चांगलेच आक्रमक झाले. संतप्त कार्यकर्त्यांनी आज त्यांच्या नवी दिल्लीतील घराबाहेर निदर्शनं केली आहेत. तसेच त्यांच्या घरावर हल्ला करत तोडफोड देखील केली.

आपल्या रोकठोक आणि स्पष्ट बोलण्यासाठी सिब्बल ओळखले जातात. मागच्या काही काळात त्यांनी काँग्रेसमधील विविध अंतर्गत मुद्द्यांवर आवाज उठवला आहे. पक्ष सोडून जाणारे नेते आणि त्यामुळे होणारे पक्षाचे नुकसान याबाबत त्यांनी अनेकदा काळजी व्यक्त केली आहे. मध्यंतरी डिनर डिप्लोमसीमुळे देखील सिब्बल वादात सापडले होते.

एकूणच काय तर मागच्या अनेक दिवसांपासून कपिल सिब्बल राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत.

पण याच सिब्बल यांनी राजकारणात येऊ नये म्हणून एकेकाळी त्यांचाच मुलगा त्यांच्या विरोधात उपोषणाला बसला होता…

कपिल सिब्बल यांचा जन्म १९४८ साली जालंधरच्या पंजाबमधील. त्यांचे वडील हिरालाल सिब्बल एकेकाळचे देशातील नामांकित आणि प्रथितयश वकील होते. त्यांना २००६ मध्ये पद्म भूषणने देखील सन्मानित करण्यात आलं आहे.

तर घराची परिस्थिती चांगली आणि शाळेपासूनच हुशार असल्याने सिब्बल साधारण १९६४ साली शिक्षणासाठी दिल्लीला आले. इथं त्यांनी सेंट स्टीफंस कॉलेजमधून एमए पूर्ण केले. त्यानंतर दिल्ली विद्यापीठामधून एलएलबी आणि १९७७ साली हार्वर्ड लॉ स्कूलमधून एलएलएम पास झाले.

या दरम्यानच्या काळात सिब्बल यांनी १९७२-७३ साली केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि आयएएससाठी त्यांची निवड झाली.

मात्र त्यांनी ते क्षेत्र न निवडता वकिली हेच आपलं क्षेत्र निवडले. आणि अशा रीतीने १९७२ साली सिब्बल वकिली व्यवसायात आले.

त्यांनी बार असोसिएशन जॉईन केले आणि अवघ्या १० वर्षात ते आपल्या कामाच्या जोरावर वरिष्ठ  अधिवक्ता पदापर्यंत पोहोचले. सोबतच देशातील सगळ्यात यशस्वी आणि महागड्या वकिलांच्या यादीत त्यांची गिनती होऊ लागली. १९८९ आणि १९९० च्या दरम्यान सिब्बल यांनी भारताचे अतिरिक्त महान्यायवादी म्हणून जबाबदारी संभाळली.

याच काळात सिब्बल काँग्रेसच्या देखील जवळ पोहोचले.

ते सगळ्यात पहिल्यांदा पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव आणि देशाच्या नजरेत आले ते संसदेत एका न्यायाधीशांच्या बचावदरम्यान. मे १९९३ मध्ये पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश वी. रामास्वामी यांच्यावर महाभियोग चालवण्यात आला होता. त्यावेळी वरिष्ठ अधिवक्ता म्हणून सिब्बल यांनी लोकसभेमध्ये रामास्वामी यांची बाजू मांडली होती. 

काँग्रेस आणि मित्र पक्षांचे खासदार मतदानादिवशी अनुपस्थित राहिल्याने हा प्रस्ताव फेटाळण्यात आला मात्र त्यावेळी सिब्बल नरसिंहराव यांच्या नजरेत आले. तिथून दोघांची चांगली ओळख देखील झाली.

त्यानंतर १९९६ च्या निवडणुकीवेळी दक्षिण दिल्लीचे तत्कालीन खासदार आर.के.धवन यांचं हवाला घोटाळ्यात नाव आल्याने ऐनवेळी कोणाला उभं करायचं असा प्रश्न काँग्रेसपुढे होता. त्यावेळी राव यांना सिब्बल यांची आठवण आली. त्यांनी सिब्बल यांना बोलावून घेतलं आणि दक्षिण दिल्लीमधून उभं राहण्यास सांगितले. मात्र त्याच वेळी त्यांनी त्यासाठी नकार दिला. आणि सांगितले,

मी फक्त एक वकील आहे, मला उभं राहण्याची इच्छा नाही. आणि उभं राहिलो तर नक्कीच पराभूत होईन.

पण तरीही नरसिंहरावांनी आग्रह केला, यावर सिब्बल यांनी विचार करून कळवतो असं सांगितले. जेव्हा सिब्बल यांनी घरी याबाबत विषय काढला तेव्हा त्यांच्या मुलाने तात्काळ यासाठी नकार दर्शवला. सिब्बल यांच्या मुलाचं मत होत कि ज्या प्रमाणे इंदिरा गांधी यांना मारण्यात आलं तसं सिब्बल यांच्या देखील जीवाला धोका आहे.

पण सिब्बल यांनी बराच विचार केल्यानंतर रावांना होकार कळवला. मात्र जशी हि गोष्ट नकार देणाऱ्या सिब्बल यांच्या मुलाला समजली तेव्हा त्यांनी रागाने सिब्बल यांना पुन्हा विरोध केला. पण जेव्हा ऐकले नाही तेव्हा तो आपल्याच वडिलांच्या विरोधात थेट उपोषणालाच बसला.

मात्र अखेरीस हो-नाही म्हणत सिब्बल दक्षिण दिल्लीतून निवडणूक लढवायला उतरले आणि तब्बल १ लाख मतांनी पराभूत झाले. १९९८ साली पुन्हा एकदा लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका जाहीर झाल्या. तेव्हा सिब्बल यांनी पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांनी हरियाणा मधील सुरक्षित मतदारसंघ शोधला.

याच दरम्यान लालू प्रसाद यादव यांच्या चार घोटाळ्याची केस सुरु होती आणि यात सिब्बल लालू यादव यांची बाजू मांडत होते. त्यावेळी लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधीच लालूंनी सिब्बल यांना बोलावून घेत राज्यसभेवर पाठवण्याची ऑफर दिली. सिब्बल त्यांना म्हणाले मी हरियाणा मधून लढण्याचे आधीच फिक्स केले आहे.

आणि जर निवडणूक लढवायची झालीच तर मी कोणत्याही परिस्थितीमध्ये काँग्रेसमधूनच उभं राहणार. तेव्हा लालूंनी कपिल सिब्बल यांना राष्ट्रीय जनता दलाच्या पाठिंब्यावर काँग्रेसच्याच तिकिटावर निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला. त्यासाठी राष्ट्रीय जनता दलाने काँग्रेससाठी अतिरिक्त जागा सोडण्याची देखील तयारी दाखवली. 

सिब्बल लालूंच्या या प्रस्तावासह सोनिया  गांधींना भेटण्यासाठी गेले आणि गांधींनी देखील त्यांना हिरवा कंदील दाखवला. अशा रीतीने सिब्बल यांच्या संसदीय राजकारणाला १९९८ मध्ये सुरुवात झाली. त्यानंतर २००४ साली ते दिल्लीच्या चांदणी चौक मतदार संघातून लोकसभेवर निवडून गेले. पुढे ते  २०१४ पर्यंत इथूनच निवडून येत गेले. या दरम्यान ते १० वर्ष मनमोहनसिंग यांच्या मंत्रिमंडळात मंत्री देखील झाले.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.