कराचीमध्ये शाळेला मराठी माणसाचे नाव आहे पण पाकिस्तानने ते बदलले नाही

सध्या मुंबईत कराची बेकरी प्रकरण तापलय. मनसे आणि शिवसेनेच्या नेत्यांनी कराची बेकरी, कराची स्वीट, कराची स्कूल ही नावे बदलण्यासाठी दुकानदारांना अल्टीमेटम दिलंय.

फाळणीनंतर कराची सोडून भारतात याव्या लागलेल्या सिंधी लोकांनी आपल्या जन्मगावाची आठवण म्हणून हे नाव दिलं होतं. पण आता साठ वर्षानंतर त्यांना ते बदलावं लागणार आहे.

मात्र गंमतीची गोष्ट म्हणजे कराची या शहराशी फक्त सिंधी लोकांच्या नाहीत तर मराठी माणसाच्याही आठवणी जोडलेल्या आहेत.

आज जरी पाकिस्तानात गेले असले तरी कराची हा एकेकाळी भारताचा भाग होता. तिथे हिंदूंची संख्या मोठी होती, आजही आहे. आजही तिथे मराठी माणसे राहतात. फाळणीपूर्वी तर हे प्रमाण दहा हजार इतके मोठे होते. विशेषतः कोकणातून अनेक चाकरमाने कराचीला कामधंद्याच्या निमित्ताने जाऊन राहिले होते.

तसं बघायला गेलं तर कराचीचा इतिहास खूप जुना नाही.

अठराव्या शतकात हे कलाचीकून नावाचे एक छोटे बंदर होते. १८४३ मध्ये ब्रिटिशांनी सिंध प्रांत जिंकला, तेव्हा सर चार्ल्‌स नेपिअरच्या प्रयत्नाने या बंदराची झपाट्याने वाढ झाली. इंग्रजांनी अपभ्रंश करून या बंदराचे नाव कराची असे केले.

१८६५ च्या अमेरिकेतील यादवी युद्धाने तिकडील कापूस इंग्लंडला मिळणे दुरापास्त झाल्याने भारतीय कापूस मुंबई व कराची बंदरांतून लँकाशरला निर्यात होऊ लागला व कराची बंदराचे महत्त्व वाढले.

नेपियरनंतर गव्हर्नर बनलेल्या सर बार्टल फ्रिअरने या गावाचा मोठा विकास घडवून आणला. बार्टल फ्रियरने स्थानिकांचा राज्यकारभारात उपयोग करून घेता यावा यासाठी कराचीमध्ये आधुनिक शिक्षणाला प्रोत्साहन दिले.

१८५१ मध्ये त्याने, सरकारी कर्मचाऱ्यांनी स्थानिक सिंधी भाषा कागदोपत्री कारभारासाठी अवगत करावी, असा आदेश काढला.

पण त्याकाळात सिंधी भाषेला तिची स्वत:ची अशी खास लिपी नव्हती. सिंधमधील व्यापारी आठ वेगवेगळ्या लिपींमध्ये सिंधी भाषा लिहीत असत. अखेर यातून मार्ग काढला नारायण जगन्नाथ वैद्य यांनी.

नारायण जगन्नाथ वैद्य हे ईस्ट इंडिया कंपनीने सिंधमध्ये नेमलेले पहिले डेप्युटी एज्युकेशन इन्स्पेक्टर होते.

१८६८ मध्ये ब्रिटिशांनी त्यांची सिंधी भाषेतल्या खुदाबादी लिपीतील त्रुटी सुधारण्यासाठी नेमणूक केली होती. नारायण वैद्य यांनी प्रयत्नपूर्वक सुचवलेल्या सुधारणा मान्य करण्यात आल्या व त्या अंमलात देखील आणल्या जाऊ लागल्या.

१८६९ मध्ये कराची येथील बंदर रोड येथे हिंदू सिंधी शाळा स्थापन झाली. सर बार्टल फ्रिअर यांनी स्थापन केलेल्या या शाळेत सुरुवातीस ६८ विद्यार्थी होते. नारायण वैद्य यांनी सुचविलेल्या सुधारणा केलेल्या खुदाबादी लिपीतून शाळेत शिक्षणास सुरुवात झाली. यामुळे सिंधी व्यापारी कुटुंबांतील मुले शाळेत येण्यास प्रवृत्त झाली.

नारायण जगन्नाथ वैद्य यांच्या काळात कराचीमधल्या मराठी भाषिक लोकांसाठी दोन मराठी शाळा देखील सुरू करण्यात आल्या होत्या, पण ही शाळा ती नव्हे. ही शाळा सिंधी व इंग्रजी माध्यमाची होती.

जवळपास दहा पंधरा वर्षे नारायण वैद्य कराची मध्ये होते. त्यांच्या प्रयत्नातून कराचीचे शैक्षणिक रुपडंच पालटून गेलं. त्यांच्याच काळात परीक्षा पध्दतीमध्ये बदल करण्यात आले.

नारायण वैद्य यांच्या कार्याच्या स्मरणार्थ कराचीमधल्या पहिल्या सरकारी शाळेचे नाव नारायण जगन्नाथ असे ठेवण्यात आले. त्यांना रावसाहेब ही उपाधी देण्यात आली.

पुढे १८७९ रोजी वैद्य यांची पुण्याला बदली झाली. त्यांची नेमणूक मुंबई प्रेसिडेन्सीमध्ये शालेय पुस्तकांची तपासणी करणाऱ्या समितीवर झाली होती. तिथून त्यांना एज्युकेशन इन्स्पेक्टर म्हणून प्रमोशन मिळाले व त्यांची बदली म्हैसूर मध्ये झाली.

इंग्रजांच्या काळातले ते पहिले भारतीय शिक्षणाधिकारी ठरले.

२२ मार्च १८८४ रोजी मुंबईत त्यांचा सेवाकालातच ज्वरामुळे मृत्यू झाला. १९३९ मध्ये मुंबईतील बॅ. सी. डी. वैद्य या त्यांच्या नातवाच्या विनंतीवरून शाळेचे नाव ‘नारायण जगन्नाथ वैद्य हायस्कूल’ असे केले गेले. आज कराचीमध्ये ही शाळा ‘एन. जे. व्ही.’ या नावाने ओळखली जाते.

कराचीमधल्या शिक्षण क्षेत्रात या शाळेचे प्रचंड मोठे योगदान आहे. कराची शहराचे पहिले महापौर जमशेद नुसरवानजी मेहता आणि सिंधी भाषेतील सुप्रसिद्ध कथाकार अमर जलील हे या शाळेचे माजी विद्यार्थी होते.

पाकिस्तानातील सर्वात जुन्या सिंधी विद्यापीठाची या शाळेच्या तळमजल्यावर स्थापना झाली होती. एवढेच काय तर सिंध मधील विधानसभा देखील काही काळ याच शाळेत भरत होती.

आजही ही शाळा कराचीमध्ये कार्यरत आहे. तिच्या नावाचे शॉर्टफॉर्म केले पण शाळेचे नाव बदलले नाही, आजही शाळेत नारायण जगन्नाथ वैद्य यांचा फोटो लावलेला आढळतो.

संदर्भ- कराचीस्थित नारायण जगन्नाथ वैद्य हायस्कूल लोकसत्ता डॉ.रुपाली मोकाशी

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.