कराडचे दोन दिग्गज चव्हाण दिल्लीपर्यंत गाजले मात्र एकमेकांच्या वाटे आड कधी आले नाहीत…
सातारा जिल्ह्यातील कराड म्हणजे कृष्णा कोयनेच्या पवित्र प्रीतिसंगमाचे ठिकाण. या नद्यांच्या पाण्यामुळे इथली शेती बहरली, इथला उसपट्टा भागातल्या शेतकऱ्यांना समृद्ध करून गेला. कराडच्या भूमीला मोठा सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा लाभला आहे. फक्त इतकंच नाही तर स्वातंत्र्यलढ्याची अनेक नररत्ने या मातीत तयार झाली. याच आंदोलनाने महाराष्ट्राचं देशाचं भावी नेतृत्व घडवलं.
कराडच्या राजकीय वारशामध्ये सर्वात मोठं नाव येत महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचं.
यशवंतरावांचं जन्मगाव जरी देवराष्ट्रे असले तरी त्यांची कर्मभूमी कराड हीच होती. अगदी तरुण वयात त्यांनी प्रतिसरकारच्या आंदोलनात त्यांनी उडी घेतली. पुढे काँग्रेसच्या माध्यमातून ते राजकारणात सक्रिय झाले, मोरारजी देसाईंच्या मंत्रिमंडळात सहभागी झाले, द्विभाषिक राज्याचा मुख्यमंत्री, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी चांगलीच छाप पाडली.
म्हणूनच जेव्हा चीन युद्धात भारताचा पराभव झाला तेव्हा नेहरूंसारख्या हिमालयाने यशवंतराव रुपी सह्याद्रीच्या काळ्या पथ्थराला दिल्लीला बोलावून घेतले आणि देशाचा संरक्षण मंत्री बनवले.
यशवंतराव चव्हाणांच्या भल्या मोठ्या राजकीय कारकीर्दीमध्ये त्यांनी एकदाही निवडणुकीत पराभव पहिला नाही. अगदी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात काँग्रेस विरोधी लाट असूनही ते कराडातून आमदारकीला निवडून आले. पुढे ते जेव्हा राष्ट्रीय राजकारणात गेले तेव्हा मात्र त्यांनी कधी कराडला लोकसभा मतदारसंघ असूनही तिथे खासदारकी लढवली नाही.
यशवंतराव एकदा नाशिकमधून आणि नंतर तीन चार वेळा सातारामधून खासदार बनले. अनेकांना प्रश्न पडतो यशवंतरावांच्या सारखा दिग्गज नेता आपल्या घरच्या मतदारसंघातून निवडणूक का लढवत नसावा ?
याच उत्तर आहे आनंदराव उर्फ दाजीसाहेब चव्हाण
मूळचे पाटणमधल्या कुंभारगावचे असलेल्या आनंदराव चव्हाण यांचा जन्म एका शेतकरी कुटूंबात झाला. हुशार असलेल्या आनंदरावांमध्ये शिक्षणाबद्दल मोठी जिद्द होती. पदवीपर्यंतच शिक्षण कोल्हापूरला राजाराम कॉलेज येथे झालं. मुंबईला वकिलीच्या शिक्षणासाठी गेले. आनंदराव चव्हाण हे त्याकाळी एलएलएममध्ये उत्तीर्ण होणारे मुंबई विद्यापीठातील एकमेव विद्यार्थी होते.
चव्हाणांची बुद्धिमत्ता पाहून इंदूर संस्थांनमधील सरदार घराण्यातल्या मालोजीराव जगदाळे यांनी त्यांच्या मुलीशी म्हणजेच प्रेमलाताईंशी आनंदरावांचा विवाह करून दिला. आनंदराव चव्हाण इंदूरच्या होळकर संस्थानचे दिवाण बनले.
हा स्वातंत्र्यलढ्याचा काळ. गांधीजींच्या नेतृत्वाखालील सत्याग्रहाच्या चळवळीमुळे ग्रामीण भागातील अनेक तरुण काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र येत होते. आनंदराव चव्हाणांनी देखील काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय सहभाग घेतला. सातारा जिल्ह्यात त्याकाळी काँग्रेसमध्ये दोन गट होते. एक होता उद्योगपती धनजीशा कूपर यांचा आणि दुसरा ग्रामीण भागाशी संबंधित असलेल्या तरुण कार्यकर्त्यांचा. दुसऱ्या गटाचं नेतृत्व नाना पाटील, यशवंतराव चव्हाण असे नेते करत होते.
धनजी कूपर काही काळ मुंबई प्रांताच्या हंगामी प्रधानमंत्रीपदी देखील राहिले होते. दोन्ही गटांनी मिळून सातारा जिल्हयाच्या लोकल बोर्डाची निवडणूक जिंकली. आता अध्यक्षपदाचा प्रश्न उभा राहिला. दोन्ही गटातून दोन नावे पुढे आली. दोघेही तरुण व हुशार वकील होते.
एक होते पाटणचे दौलतराव उर्फ बाळासाहेब देसाई आणि दुसरे होते आनंदराव चव्हाण.
धनजीशा कूपर यांचा आनंदराव चव्हाणांना पाठिंबा होता तर यशवंतराव चव्हाणांनी बाळासाहेब देसाईंच्या पाठीशी राहायचं ठरवलं. हि निवडणूक मोठी अटीतटीची झाली. यशवंतरावांनी केलेल्या प्रचारामुळे बाळासाहेब देसाई सातारा लोकल बोर्डाच्या अध्यक्षपदी निवडून आले. आनंदराव चव्हाणांचा पराभव झाला. या निवडणुकीपासून बाळासाहेब देसाई आणि यशवंतराव चव्हाण एकमेकांच्या जवळ आले तर आनंदराव चव्हाण निष्कारण दुखावले गेले.
पुढे स्वातंत्र्यलढा झाला, यशवंतराव चव्हाणांना प्रतिसरकारच्या चळवळीत काम करत असल्यामुळे कारावास देखील झाला. तिथून सुटका झाल्यावर ते मोरारजी देसाई यांचे संसदीय सेक्रेटरी म्हणून नेमले गेले. त्यानंतर त्यांनी आपला राजकीय प्रवास काँग्रेस बरोबरच केला.
दुसऱ्या बाजूला आनंदराव उर्फ दाजीसाहेब चव्हाण मात्र काँग्रेसमधून डाव्या विचारांच्या बहुजनवादी शेतकरी कामगार पक्षाबरोबर गेले. १९५२ साली झालेल्या पहिल्या निवडणुकीत त्यांनी शेकापकडून विधानसभा लढवली. मात्र या निवडणुकीत दुर्दैवाने आनंदराव चव्हाण यांचा पराभव झाला.
मात्र पुढे १९५७ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र त्यांनी बाजी मारली. काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कराडमध्ये ते शेकापकडून निवडून आले.
नेमके याच काळात यशवंतराव चव्हाण काँग्रेसमध्ये राज्याच्या मुख्यमंत्री पदी पोहचले. यशवंतराव आपल्या बेरजेच्या राजकारणासाठी ओळखले जायचे. त्यांनी काँग्रेसमधून शेकापमध्ये गेलेल्या जुन्या साथीदारांना परत पक्षात आणायचा प्रयत्न सुरु केला.
दरम्यानच्या काळात लोकसभेमध्ये आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांमुळे दाजीसाहेब चव्हाणांनी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना प्रभावित केले होते. नेहरूंची त्यांना काँग्रेस मध्ये घेण्याची इच्छा होती. यशवंतराव चव्हाणांनी देखील आपल्यातील मतभेद बाजूला ठेवून आनंदराव चव्हाणांना काँग्रेसमध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले.
अखेर १९६० साली आनंदराव चव्हाण काँग्रेसमध्ये परतले. पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांना आपल्या मंत्रिमंडळात संरक्षण राज्यमंत्री बनवलं. पंतप्रधानांच्या विश्वासातले मंत्री म्हणून दाजीसाहेबांची दिल्लीत ओळख निर्माण झाली होती. पुढे यशवंतराव चव्हाण देखील केंद्रात आले. कराडच्या या दोन्ही चव्हाणांनी भारताच्या संरक्षणमंत्रीपदाची जबादारी सक्षमपणे सांभाळली.
यशवंतराव चव्हाण आणि आनंदराव चव्हाण हे दूरदृष्टी असणारे नेते होते. एकेमकांवर कुरघोडी करण्याचं राजकारण केलं तर त्याचा आपल्या जनतेवर , भागातल्या विकासावर वाईट परिणाम होईल याची त्यांना जाणीव होती. म्हणूनच त्यांनी कधी आपल्यातले मतभेद सार्वजनिकपातळीवर येऊ दिले नाहीत. यशवंतरावांनी देखील कराडच्या लोकसभा मतदारसंघावर आपला अधिकार सांगितला नाही.
आनंदराव चव्हाण यांनी लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात देखील महत्वाचं मंत्रिपद भूषवलं.
त्यांचे नेहरूंच्या नंतर इंदिरा गांधींशी देखील चांगले संबंध राहले. १९७३ साली झालेल्या दाजीसाहेबांच्या आकस्मित मृत्यूनंतर त्यांच्या पत्नींना म्हणजेच प्रेमला काकी चव्हाण यांना काँग्रेसचं तिकीट देण्यात आलं. त्यांनी अनेक वर्ष खासदार म्हणून कराडचे नेतृत्व केलं.
पुढे त्यांचे सुपुत्र अमेरिकेत इंजिनियरिंग करणारे पृथ्वीराज चव्हाण हे राजीव गांधींच्या आग्रहामुळे राजकारणात आले, खासदार झाले, पुढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील बनले. आनंदराव चव्हाण प्रेमलाकाकी चव्हाण यांचा राजकीय वारसा पृथ्वीराज बाबांनी सक्षमपणे सांभाळला.
यशवंतराव आनंदराव प्रेमला काकी यांच्या पासून चालत आलेला हा कराडच्या राजकारणातला सुसंस्कृतपणा आजही संपूर्ण देशासाठी आदर्श म्हणून ओळखला जातोय.
हे ही वाच भिडू.
- संगणकावर मराठी भाषा आणण्यात इंजिनियर पृथ्वीराज चव्हाणांचा सिंहाचा वाटा आहे.
- यशवंतराव चव्हाण कॉंग्रेसमध्ये परत यावेत यासाठी इंग्लंडच्या पंतप्रधानांनी मध्यस्थी केली होती ?
- फक्त चांगुलपणा पायी यशवंतराव चव्हाणांनी दोन वेळा पंतप्रधान होण्याची संधी गमावली.
- अजातशत्रू व्यक्तीमत्व असणाऱ्या यशवंतराव चव्हाणांवर खूनी हल्ला झाला होता.