फवाद खानच्या एका सीनवरून करण जोहर गोत्यात आला होता…

बॉलिवूड म्हणल्यावर जितकं फेम, ग्लॅमर जास्त तितक्या कॉन्ट्रोव्हर्सिही जास्त. म्हणजे पार्टीत दारू पिऊन राडा घालणारे सेलिब्रिटी असू दे किंवा मीडियावाल्यांना चोपणारे सेलिब्रिटी असू दे, किंवा दिग्दर्शकाचं एखाद्या पॉलिटिकल पक्षाला नडणं असू दे, सगळीकडे बॉलिवुड सावध व्हायला पाहत असतं, पण राडे होतातच. असाच एक राडा झाला आणि त्यामुळं करण जोहर गोत्यात आलेला, त्याबद्दलचा हा किस्सा.

भारतात आधीपासूनच पाकिस्तानी कलाकारांबाबत वाद होत असतात, आपल्याच अभिनेत्यांना कामं नाहीत आणि आपले लोकं पाकिस्तानी कलाकारांना काम देतात, बॉलिवुड पाकिस्तानी होत चाललंय अशा अनेक बातम्या, गप्पा, आर्टिकल आपण वाचत असतो. माहिरा खान,अदनान सामी, अतिफ अस्लम या कलाकारांच्या बाबतीत कॉन्ट्रोव्हर्सि टिपेला पोहचली होती.

पण सगळ्यात हाईट विषय म्हणजे ए दिल हे मुश्किल या सिनेमातला फवाद खानचा सीन ज्यामुळे करण जोहरची पळापळ झाली होती.

अभिनेता फवाद खान दिग्दर्शक करण जोहरसाठी संकट ठरला होता, जेव्हा त्याचा चित्रपट ‘ए दिल है मुश्किल’ मध्ये फवादला कास्ट करण्यात आलं होतं. अनेक संघटना आणि राजकीय पक्षांनी फवादला चित्रपटातून काढून टाकावे किंवा चित्रपटाचे प्रदर्शन थांबवावे अशी मागणी केली होती. मात्र चित्रपटाचे शूटिंग मोठ्या प्रमाणात पूर्ण झाले असल्याने करणला तसे करणे शक्य नव्हते.

मात्र, अखेर हे आणि असे अनेक वाद संपुष्टात आले आणि चित्रपट रिलीज करण्याची परवानगी मिळाली होती. हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. भारतात प्रचंड फॅन फॉलोइंग असणाऱ्या फवादच्या फॅन्समध्ये बहुतांश मुली आहेत आणि फिमेल फॅन्सकडून त्याच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक होत असतं. आपण जरा एकूण फवाद खानच्या विशेष बाबींवर लक्ष टाकू.

फवादच्या पत्नीचे नाव सदफ आहे, सदफ आणि फवाद 1998 मध्ये भेटले होते, जेव्हा तो 17 वर्षांचा होता. सात वर्षांच्या अफेअरनंतर दोघांनी लग्न केले. बहुतेक लोक फवादला त्याच्या लूकमुळे आणि अभिनय कौशल्यामुळे ओळखतात, पण फवाद गाण्यातही तितकाच चांगला आहे. फवाद ‘एंटिटी पॅराडाइम’ नावाच्या बँडचा एक भाग होता. 2003 मध्ये त्याने पहिला अल्बम रिलीज केला होता.

अजूनही फवाद पत्नीसोबत कपड्यांची कंपनीही चालवतो. त्यांची कंपनी रेशीम बाजारात खूप प्रसिद्ध आहे. ए दिल है मुश्कीलनंतर तो भारतात पुढचा चित्रपट करणार की नाही याबद्दल बऱ्याच शंका कुशंका निर्माण झाल्या पण फवादला भारतात परत आणण्यामागे आणि बॉलिवुडमध्ये कास्ट करण्यासाठी व्यावसायिक गणितं आणि फॅन्स यांचा विचार करता कोणती कारणे आहेत तेसुद्धा महत्वाचं आहे.

फवाद खानने जेव्हा बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवले तेव्हा बहुतेक बॉलीवूड स्टार स्वतःला अधिक आकर्षक दिसण्यासाठी सिक्स पॅक अॅब्स आणि फिट पर्सनॅलिटीची मदत घेत होते. त्यावेळी फवादने हे सिद्ध करून दाखवले की मस्क्युलर फिजीकशिवाय तुम्ही तुमच्या कामाच्या आणि चेहऱ्याच्या जोरावर स्वतःला सिद्ध करू शकता आणि बॉडीबिडी बनवण्याच्या नादी न लागता त्यानं अभिनयाच्या बळावर मार्केट तयार केलं.

फवाद अशा काही स्टार्सपैकी एक आहे ज्यांचे डोळे खूप काही बोलतात. फवादच्या क्लोज-अप शॉट्सवरून स्पष्टपणे दिसून येते की तो त्याच्या चेहऱ्यावरील भाव आणि डोळ्यांचा किती सुंदर वापर करतो. फवाद त्याचं पात्र अतिशय काळजीपूर्वक निवडतो आणि त्याच्या कामाला पूर्ण न्याय देतो. हे त्यांच्या अभिनयातून स्पष्टपणे दिसून येते. कपूर अँड सन्स या चित्रपटात त्याने ज्या प्रकारे समलैंगिक व्यक्तीची भूमिका साकारली होती ती खरोखरच जबरदस्त होती. हमसफर सिनेमात फवादने केलेलं काम हे त्याच्या कारकिर्दीतील सगळ्यात भारी काम मानलं जातं.

ए दिल है मुश्कील चित्रपटातील फवादचे पात्र फारसे मोठे नव्हते. ट्रेलरमध्येही त्याला फक्त एका शॉटची जागा देण्यात आली होती. पण असे असूनही, चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून ते थिएटरमधून बाहेर येईपर्यंत प्रेक्षकांना जे लक्षात राहिले, तो फवाद खानचा अभिनय. करण जोहरला ए दिल है मुश्किलच्या वेळी फवाद खानमुळे खरंच मुश्किल झाली होती.

खूबसुरत सिनेमात फवाद खान सोनम कपूरबरोबर दिसला होता पण ए दिल है मुश्किलने त्याला बॉलिवूडमध्ये परत एकदा मानपान दिला, फक्त छोटा रोल असूनही राजकीय पक्ष आणि काही लोकांनी पाकिस्तानी कलाकारांना संधी दिली म्हणून भयंकर ट्रोल केलं होतं, त्याच्या एका सिननं करण जोहरची झोप उडवली होती, हे मात्र खरं.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.