त्यादिवशी चंद्रचूडसिंगने करण जोहरला घरी बोलवून नकार दिला आणि त्याचवेळी तो गंडला !!

करण जोहर. भारतातला सध्याचा सर्वात मोठा फिल्ममेकर. त्याने अनेक जणांना संधी दिली, अनेकांना सुपरस्टार बनवलं. मिडास टच म्हणतात ते हेच. आजही कित्येक बड्या बापाची पोरं त्याने चान्स द्यावा म्हणून काहीही करायला तयार असतात.

असा हा कंगना रानवतच्या भाषेत म्हणायचं झाल तर बॉलीवूड बिगी फ्लॅगबेअरर ऑफ नेपोटीजम 

पण एक काळ होता जेव्हा त्याला आपल्या सिनेमात अभिनय करा म्हणून सांगायला नको नको त्यांचे पाय धरावे लागले होते.

गोष्ट आहे कुछ कुछ होता है च्या निर्मितीवेळची. करणचे वडील हे फिल्म इंडस्ट्रीचे मोठे प्रोड्युसर. यश चोप्राचे जिजाजी. अमिताभचा अग्निपथ त्यांनीच बनवला होता. करण त्यांचा एकुलता एक मुलगा. यशराजशी असलेल्या नात्यामुळे त्याला दिलवाले दुल्हनिया ले जायेंगेचा असिस्टंट म्हणून काम करायला मिळाल होतं. तिथच त्याची शाहरुखशी खास मैत्री जुळली.

शाहरुखने करणला पिक्चरची स्टोरी लिहायला लावली. नाव ठरलं,”कुछ कुछ होता है”

शाहरुख करणचा जिगरी होता म्हणजे या सिनेमाचा हिरो तोच असणार हे फायनल होतं आणि हिरोईन म्हणून काजोल. पण हे सोडून आणखी पण करेक्टर होते. एक म्हणजे शाहरुखच्या बायकोचा टीनाचा रोल जी पहिल्याच सीन मध्ये मरते आणि दुसरा काजोलच्या होणार्या नवऱ्याचा रोल अमन मेहरा.

पण दुर्दैवाने या दोन्हीसाठी करणला एकही कलाकार मिळत नव्हता. करणने टीना हे करेक्टर आपली वर्गमैत्रीण ट्विंकल खन्नावर इन्स्पायर होऊन बनवल होतं. तीच हा रोल करेल याची त्याला खात्री होती. पण तिने नकार दिला. पुढे तब्बल ८ अभिनेत्रींनी करण जोहरला नकार दिला. अखेर शाहरुख आणि आदित्य चोप्राच्या सांगण्यावरून त्याने काजोलच्या बहिणीला म्हणजेच राणी मुखर्जीला फायनल केले.

आता प्रश्न उरला अमनच्या रोलचा.    

यासाठी सुद्धा करण जोहरने सैफ अली खान, आमीर खान कित्येकजणांना विचारलं. शाहरुख नंतरचा दोन नंबरचा रोल करायला आमीर तयार झाला नाही. अखेर करण जोहरच्या समोर एक नाव आल.

चंद्रचूड सिंग.

चंद्रचूड सिंगची तेव्हा हवा होती. सगळ्यात महत्वाच कारण त्याला खुद्द अमिताभ बच्चन यांनी लॉंच केलेलं. तेरे मेरे सपनेतून एंट्री करणारा चन्द्रचूड गुलजारनी स्वतः दिग्दर्शित केलेल्या माचीस मध्ये त्याला तगडा रोल करताना दिसला होता. त्यासाठी त्याच कौतुक सुद्धा झालं होतं आणि फिल्मफेअर सारखा पुरस्कार देखील मिळाला होता.

एकंदरीत चंद्रचूड सिंग बॉलीवूडचा अपकमिंग स्टार होता आणि इंडस्ट्रीचा नियम आहे की उगवत्या देवाला नमस्कार.

नवोदित करण जोहरने चंद्रचूड सिंगला आपल्या सिनेमात काम करणार का हे विचारायला फोन केला. चन्द्रचूडने त्याला आपल्या घरी येईन सिनेमाची कथा ऐकवायला सांगितलं. करण जोहरने पत्ता विचारला. चंद्रचूड म्हणाला,”फोर बंगलो”

मलबार हिलच्या अलिशान फ्लटमध्ये सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या करण जोहरला माहिती नव्हते की फोर बंगलो नावाचा मुंबईत एक भाग आहे. तो वारंवार विचारत होता की

 “फोर बंगलो पैकी नेमका कोणता बंगला?”

अखेर त्याला कोणीतरी समजावून सांगितलं मग करण जोहरला लक्षात आलं.

दुसऱ्या दिवशी तो फोर बंगलोला गेला. त्याकाळात मलबार हिलमधून फोर बंगलोला जायला कमीतकमी दोन तास लागायचे. एवढा प्रवास करून करण तिथे पोहचला. त्याने चंद्रचूडला दोन तास बसून स्टोरीच नरेशन दिल. त्यानंतर परत दोन तासाचा प्रवास करून घरी परत आला.

रात्री चंद्रचूड साहेबाना त्याने फोन करून विचारलं की स्टोरी कशी वाटली? तर त्याने त्याला परत घरी बोलावलं.

करण जोहर तिसऱ्या दिवशी परत त्याच्या घरी गेला. दोन तासाचा प्रवास करून आलेल्या करण जोहरला चन्द्रचूडने आपण सिनेमात काम करणार नसल्याच सांगितल. करण ला राग आला. कमीत कमी नकार द्यायचा होता तर तो फोन वर देखील देता आला असता. पण चंद्रचूडला आपल्या स्टार असण्याचा शो ऑफ करायची हौस होती.

काही जण या किस्स्या बद्दल असही सांगतात की करणला चंद्रचूडने वाट पाहायला लावली आणि घरात निवांत दोन तास झोपून गेला. आता त्याच्या बेडरूम मध्ये जे काही घडल ते खरंखोट त्या दोघांनाच माहित. पण करण आयुष्यभर ही गोष्ट विसरला नाही.

आता आपला सिनेमा बनणार की नाही या टेन्शनमध्ये करण जोहरला डिप्रेशन आलं. त्याच रात्री चंकी पांडेच्या घरी एका पार्टीला गेला. या पार्टीमध्ये त्याची भेट सलमान खानशी झाली. सलमानची आणि त्याची फॅमिली खूप आधी पासून एकदम जवळचे होते. सलमानने रात्री दारूच्या नशेत त्याला सांगितलं,

“तुम्हारी फिल्म कोई नही करेगा सिर्फ मै करुंगा.”

करणला वाटलं तो चेष्टा करतोय. पण तरीही तो दुसऱ्या दिवशी त्याच्या घरी स्टोरी सांगायला गेला. त्याने सलमान ला निम्मी स्टोरी सांगितली आणि ती ऐकूनच  म्हणाला,

“आगे सुनाने जरुरत नही. I am doing your movie.”

करणला आश्चर्य वाटलं कारण सलमानचा रोल सेकंड हाफ मध्ये होता आणि त्याने  त्यारोलबद्दल अजून काही सांगितलच नव्हत. पण सलमान सलमान होता. त्याला स्टोरीशी आपल्या रोलशी काही मतलब नव्हता. तो करण जोहरच्या वडिलांच्यासाठी तो कुछ कुछ होता है करण्यासाठी तयार झाला.

  कुछ कुछ होता है रिलीज झाला आणि सुपरहिट झाला. 

चंद्रचूड सिंगच्या हातातून एक चांगला सिनेमा गेला. पुढे त्याच्या सिनेमाच्या चोईस चुकत गेल्या. दाग द फायर, शाहरुख ऐश्वर्यासोबतचा जोश, प्रीती झिंटा सोबतचा कज्या केहना सोडले तर काही लक्षात राहणारे सिनेमे त्याच्या नावे नाहीत.

त्यानंतर तर तो मोठ्या पडद्यावरून गायबच झाला. काही वर्षापूर्वी संजय दत्तचा जिला गाझियाबाद, गोविंदाचा आ गया हिरो अशा सिनेमातून त्याने कमबक केले. मात्र या सुपरफ्लॉप सिनेमाप्रमाणे त्याच करीयर देखील संपून गेलं. म्हणूनच आजही अनेकांना प्रश्न पडतो करण जोहरला नकार देणारा चंद्रचूड सध्या काय करतो ?

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.