कपूर घराण्याची बंडखोर राजकन्या !

आलिया भट आणि रणबीर कपूर हे आई बाबा झाले आहे. आलियाने मुलीला जन्म दिला आहे. या बातमीनंतर कपूर कुटुंबात जल्लोषाचे वातावरण आहे. यानंतर अनेकांकडून कपूर कुटुंबियांबद्दल बोललं जात आहे. बॉलिवूड मधील त्यांच योगदान अशी सगळी चर्चा रंगली आहे. 

बॉलीवूड मध्ये कपूर घराण्याची मोठी लीगसी आहे. फिल्म इंडस्ट्रीमधल्या सगळ्यात मोठ्या घराण्यातील मुलीला सिनेमात येण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला होता.

करिष्मा कपूर

पेशावरहुन सिनेमात काम करायचं म्हणून आलेल्या पृथ्वीराज कपूर यांची ही पणती. आजोबा राज कपूर, शशी कपूर, शम्मी कपूर, वडील रणधीर, काका ऋषी, राजीव असे ढीगभर हिरो या कपूर घराण्यात जन्माला आले. यातले अनेकजण सुपरस्टार देखील होते.

पण विशेष म्हणजे यात एकही हिरॉईन नव्हती.

म्हणजे कपूर घराण्यात टॅलेंट फक्त पुरुषांच्या रक्तातून वाहत होता की काय?

नाही म्हणायला रणधीरची बायको बबिता आणि ऋषीची बायको नितु सिंग या एकेकाळच्या हिरॉईन पण लग्नानंतर त्यांनी सिनेमात काम करणं सोडलं होतं.

क्योंकी कपूर खानदान की बहु बेटी फिल्मों मे काम नहीं करते!

जवळजवळ चार पिढ्या ही प्रथा चालत आलेली. राज कपूरचा वारसा आता ऋषीचा मुलगा चालवणार हे सगळ्यांनी त्याच्या पाळण्यातच घोषित केले होतं.

स्वतः राज कपूर मेरा नाम जोकर, सत्यम शिवम सुंदरम, राम तेरी गंगा मैली सारखे काळाच्या पुढचे सिनेमे बनवत होते मात्र त्यांच्या घरची परिस्थिती कल आज और कल अशी बंधनात अडकली होती.

हे सगळं मोडलं त्यांच्या सर्वात मोठ्या नातीने करिष्माने.

तिची आई बबिता कपूर स्वतः महत्वाकांक्षी होती. तिने जितेंद्र, राजेश कुमार, शम्मी कपूर अशा त्या काळच्या दिग्गज फिल्मस्टारबरोबर काम केलं होतं. पण अचानक रणधीर कपूरने घरच्या परंपरेपायी तिचं सिनेमात काम करणं बंद केलं.

बबिता आणि रणधीरच्या संसार वृक्षाला करिष्मा आणि करिना ही दोन गोड फळे लागली. पण दिवसेंदिवस रणधीर आणि बबिता यांच्यातील मतभेद वाढतच गेले.

बबिता आपल्या मुलींना घेऊन कपूर घराण्याचा राजमहाल सोडून बाहेर पडली.

आपण नाही तर कमीतकमी आपल्या मुलीला नंबर वन हिरॉईन बनवायचं हे तिचं स्वप्न होतं. तिने करिष्माच्या डोक्यात हे लहानपणापासून फिट बसवलं. घरातून बाहेर पडल्यावर बबिता समोर अनेक प्रश्न निर्माण झाले, मुख्य प्रश्न पैशाचा होता.

करिष्मा करिना हे मुंबईच्या टॉपच्या शाळेत शिकत होते. त्यांचा खर्च, डान्स वगैरे क्लासेस चा खर्च, लाइफस्टाइल या सगळ्याचा भार बबिताच्या एकटीच्या खांद्यावर येऊन पडला होता. वेगवेगळ्या नोकऱ्या करून तो खर्च ती भागवत होती.

राज कपूर आपल्या भारत पाकिस्तान मैत्री वर हिना नावाच्या मुव्हीची तयारी करत होते

पण त्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. बबीताची इच्छा होती की करिष्माला या सिनेमात हिरॉईन म्हणून लॉंच केलं पाहिजे.

पण लोलो हे विचित्र नाव सोडलं तर क्लुर घराण्याचा कोणताही वारसा करिश्माला मिळाला नव्हता.

पण रणधीर कपूर तयार झाला नाही. तोच या सिनेमाचा दिगदर्शक होता, त्याने बबिताला सांगितलं की करिष्माचे काका ऋषी सिनेमाचा हिरो आहे, त्याच्या सोबत सिनेमाच्या पडद्यावर रोमान्स करणे शोभणार नाही.

बबिता या नकारामुळे प्रचंड चिडली. तिने त्याच वर्षी करिष्माला लॉन्च करायची तयारी सुरू केली.

करिष्मा तेव्हा अवघ्या १५ वर्षांची होती. बबिताला वाटलं की कपूर घराण्याची नात म्हणून तिला लगेच चान्स मिळेल पण तसं घडलं नाही.

उलट रणधीर आणि तिच्यातील तणावाची कल्पना असल्यामुळे सगळ्या मोठ्या बॅनरनी करिश्माला संधी देण्यास नकार दिला.

आज आपण पाहतो की चंकी पांडेच्या मुलीची देखील दणक्यात एन्ट्री होते,

पण कपूर घराण्याच्या करिश्माला घेण्यासाठी एकही प्रोड्युसर तयार नव्हता.

अखेर बबिताने एक दक्षिणेकडचा प्रोड्युसर शोधून आणला. त्याने करिष्माला साइन केले. पिक्चरच नाव होतं,

प्रेम कैदी.

हा दक्षिणेतल्याच सिनेमाचा रिमेक होता. हिरो पण तिकडचाच कोवळा हरीश कुमार. ही एक टीनेज मसाला लव्ह स्टोरी होती.

पण टिपिकल साऊथच्या मुव्ही प्रमाणे हिरॉईन हिरोच्या मागे लागते,काही सेंशुअल सीन, डान्सवाली गाणी, थोडी फार फायटींग वगैरे प्रकार यात होता. करिष्मा आणि हरीशची जोडी तशी छान जमली पण अभिनयाच्या बाबतीत दोघांचाही रामराम होता.

१५-१६ वर्षांच्या करिष्माला यात बिकिनी सिन सुद्धा द्यावा लागला होता ज्यात ती एखाद्या छोट्या बाहुली सारखी दिसत होती.

एकंदरीत सिनेमा बऱ्यापैकी ठीकठाक चालला.

बाकी काही नाही पण कपूर घराण्याची बंडखोर नात म्हणून करिष्माला बघण्यासाठी लोक थिएटर ला जाऊन आले. अवॉर्ड वगैरे तर लांबची गोष्ट.

पण या सिनेमासाठी करिष्माने आपलं शिक्षण सोडलं ते सोडलंच.

घर चालवायचा, पैसे कमावण्याचा भार तिच्या खांद्यावर येऊन पडला.

पण गंमत म्हणजे इथून पुढे तिचे ओळीने पाच सिनेमे फ्लॉप झाले.

एक तर चांगल्या सिनेमाची तिला ऑफर येत नव्हती. तिच्या दिसण्यावरून विशेषतः तिच्या जाडजूड भुवया, अति गोरा रंग, शिडशिडीत अंग काठी, टॉमबॉय लूक यावरून चेष्टा होत होती.

करिष्मावर फ्लॉप चा शिक्का बसला होता.

मोठया बॅनरचे चांगले सिनेमे तर तिच्या आसपास नव्हते. साऊथचे दिगदर्शक आणि दुसऱ्या किंवा तिसऱ्या फळीतले प्रोड्युसर तिला सिनेमात घेत होते.

या पिक्चर मध्ये बऱ्याचदा अति बोल्ड सिन द्यावे लागत होते.

काहीजण कुत्सितपणे राज कपूरने केलेली पाप त्याची नात फेडत आहे असे देखील म्हणत होते. कोणी याचा गैरफायदा देखील घेण्याचा प्रयत्न केला.

कितीही खालच्या थराला जाणारी टीका झाली तरी करिश्मा या सगळ्यात पुरून उरली.

ही लढाई आपण जिंकायची आहे हे ठरवूनच ती आली होती.

तिचा पहिला हिट सिनेमा होता अनाडी. हा पण साऊथचा सिनेमा होता. पण यातली गाणी सुपरहिट झाली. फुलोंसा चेहरा तेरा वगैरे गाण्यात खरंच करिष्मा शोभत होती. करिष्माच्या खात्यावर एक यश जमा झाल.

पुढे मुकाबला या सिनेमापासून तिची गोविंदा बरोबर जोडी जमली.

राजा बाबू, दुलारा वगैरे नी करिश्माला नवंसंजीवनी दिली. पण राजा बाबू मधलं सरकायल्यो खटीया किंवा अनिल कपूर सोबतचा अंदाज हे बोल्ड पेक्षा अश्लीलते कडे झुकणारे होते म्हणून तिच्यावर टीका झाली.

आमिर-सलमान बरोबरचा अंदाज अपना अपना त्याकाळी फ्लॉप झाला आणि शिवाय करिश्माला ना त्यात चांगले सिन होते ना तिची काही छाप पडली.

गोविंदा बरोबर साजन चले ससुराल, कुली नंबर वन सारख्या सिनेमांनी करिष्माला पहिल्या फळीच्या अभिनेत्री कडे घेऊन चाललं होतं. अक्षय कुमार सोबतचे मारधाड सिनेमे पण यशस्वी होत होते. बाकीच्या हिरॉईनच्या गर्दीत करिष्मा चा चेहरा उठून दिसु लागला होता.

अशातच एक सिनेमा आला ज्यामुळे करिश्माच आयुष्य बदलून गेलं,

राजा हिंदुस्थानी.

धर्मेश दर्शन या दिगदर्शकाला त्या काळी सगळेजण करिष्माला साइन केलं म्हणू वेड्यात काढत होते. पण करिश्माने सगळ्यांना खोटं ठरवलं. आमिरखान सारख्या तगड्या हिरो पुढे ती उभी राहिली आणि त्याच्यापेक्षही काकनभर सरस अभिनय केला.

या सिनेमातली परदेसी सारखी गाणी रेकॉर्ड ब्रेक हिट झाली, पिक्चर देखील गाजला, त्याहून ही फेमस आमिर करिष्माचा लॉंग किस गाजला.

पण या पिक्चरच्या निमित्ताने करिश्माचे मेक ओव्हर झाले.

सुप्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा याने करिश्माच सुरवंटातून फुलपाखरामध्ये रूपांतर केलं. तिला पहिला फिल्मफेअर राजा हिंदुस्थानी साठी मिळाला.

तिचे डोळे निळे आहेत हे नव्याने समजलं. पब्लिक करिश्माला साठी वेडी झाली होती.

पुढच्या वर्षी यशराज बॅनर मध्ये करिष्माला संधी मिळाली. पण यात मेख म्हणजे शाहरुख आणि माधुरी यांची में जोडी होती तर करिष्मा साईड रोल मध्ये होती. शिवाय हा म्युजिकल डान्स मुव्ही होता त्यात माधुरी समोर डान्स करावे लागणार म्हणून अनेकांनी नकार दिला होता.

करिष्मा तयार झाली, आणि माधुरीपेक्षाही भारी डान्स करू दाखवलं.

दिल तो पागल है सुद्धा सुपरहिट झाला, राजश्रीचा हम साथ साथ है सुद्धा सुपरहिट झाला. परत करिष्मावर अवॉर्डसची बरसात झाली.

सोबत डेव्हिड धवन चे जुडवा, हिरो नंबर वन, बीबी नंबर वन, हसीना मान जायेगी हे आउट अँड आउट कॉमेडी सिनेमे धुमाकूळ घालत होते.

करिश्माला विनोदाचं आणि हिटच टायमिंग सापडलं होतं.

आता कपूर फॅमिलीला त्यासाठी ओळखलं जातं त्या अभिनयाच्या शिक्कामोर्तबाची आवश्यकता होती. फिझा, झुबेदा या सिनेमात तिने केलेल्या जबरदस्त अभिनयाने ती सुद्धा पूर्ण झाली.

या सगळ्या प्रवासात करिष्मा कुठल्या कुठे येऊन पोहचली होती. कोणाचीही मदत न घेता आपल्या मेहनतीने तिने स्वतःच स्थान बनवलं होत. तिच्या मुळेच तिच्या लहान बहिणीला करिणाला अगदी सहज एन्ट्री करता आली.

ज्या रणधीर कपूरने करिश्माला सिनेमात जाण्यापासून रोखलं होत त्यालाच आपल्या मुलीचा त्यांच्या कामाचा प्रचंड अभिमान वाटला.

करिनाला घराणेशाहीचा वारसा कपूर खानदानाचा नाही तर करिष्मा कपूरचा मिळाला.

करिनाला जे सहज मिळालं ते करिश्माला भांडून मिळवावे लागले होते. करिनाच्या आगमनानंतर करिष्माला मिळणारे सिनेमे आटत गेले.

वैयक्तिक आयुष्यातही अभिषेक बच्चन बरोबर मोडलेला साखरपुडा, संजय कपूर नावाच्या बेताल माणसा सोबत झालेलं आणि दोन मुलींच्या जन्मानंतर मोडलेल लग्न अशा अनेक गोष्टी सहन कराव्या लागल्या.

पण आजही करिष्मा कपूर स्वतःच वलय राखून आहे. हे वलय कपूर खानदानच नाही तर स्वतःच्या मेहनतीचं आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.