रेल्वेखाली आलेल्या आजोबांना वाचवण्यासाठी कर्जतच्या केतननं चालत्या रेल्वेतून उडी घेतली…

सोशल मीडिया वापरतायेत आणि त्यात तुम्हाला मदत, दानधर्म, दया, माणुसकी या विषयांवरच्या पोस्ट दिसणार नाही, हे अशक्यच आहे. फेसबुकवर तर त्यातल्या त्यात अशा घटना खूप जास्त दिसतात. याव्यतिरिक्त मेनस्ट्रीममध्ये सुद्धा या बातम्या आवर्जून दाखवल्या जातात कारण प्रेक्षकांना अशा घटना जाणून घेण्याची इच्छा असते.

त्यातही एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवणं ही गोष्ट खूप मोठी मानली जाते. अशीच एक घटना सध्या खूप व्हायरल होत आहे. घटना आहे कर्जतची. एका २७ वर्षीय तरुणाने ६० वर्षांच्या आजोबांचा जीव वाचवल्याची.

काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. केतन थोरवे नावाचा मुलगा कर्जतच्या रेल्वे स्थानकावर पोहोचला. रोजच्या दिनक्रमानुसार त्याला त्याच्या कामाच्या ठिकाणी पोहोचायचं होतं. हिंदुस्थान टाइम्सच्या वृत्तानुसार, केतन खोपोलीतील एका इलेक्ट्रॉनिक शोरूममध्ये काम करतो. तर टाइम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार केतन कबड्डीपटू देखील आहे.

तो दररोज त्याच्या कामासाठी एकतर लोकल ट्रेन किंवा स्वतःच्या बाईकचा वापर करत असतो. त्या दिवशी तो लोकलने जाण्यासाठी स्टेशनवर आला. सकाळी १०:४० च्या सुमारास फलाट क्रमांक ३ वरून त्याने ट्रेन पकडली. तो रेल्वेच्या दारातच उभा होता.

अचानक केतनची नजर एक वृद्ध आजोबांकडे गेली. साठीच्या आसपास असलेले एक आजोबा लोकलमध्ये सॅन्डविच विकण्याचं काम करतात. त्यांच्या एका हातात सँडविच ट्रे होता आणि दुसऱ्या हाताने ट्रेनच्या दरवाजाचं हँडल पकडून ते आजोबा ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यांचा तोल गेला आणि ते ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये असलेल्या गॅपमध्ये पडले. 

हे बघताच कोणताही विचार न करता केतनच्या हातून एक कृती झाली. 

त्या आजोबांना गॅपमध्ये पडताना केतनने बघितलं तसं त्याने ट्रेनमधून बाहेर उडी घेतली. आजोबांचं डोकं प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमधल्या गॅपमध्ये आलं होतं. ट्रेन सुरु झाली होती. अशा परिस्थितीत केतनने त्या आजोबांना गॅपच्या बाहेर खेचलं आणि परत उडी मारत त्याच्या पूर्ववत जागी आला म्हणजे पुन्हा ट्रेनमध्ये चढला.

या घटनेतील केतनची कृती इतकी क्षणिक होती की स्वतः केतनला समजलं नाही की नक्की कसं – काय झालं?

मात्र त्याच्या सोबत त्याचा मित्र होता ज्याच्या कॅमेऱ्यात हा घटनाक्रम कैद झाला आणि त्यानेच तो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला, असं केतन सांगतो.

ट्रेनमध्ये परत चढल्यावर ट्रेनने लगेच गती पकडली होती. त्यानंतर केतनने मागे वळून त्या आजोबांकडे बघितलं तेव्हा रेल्वे कर्मचारी त्या सँडविच विक्रेत्या आजोबांपर्यंत पोहोचले होते, असंही केतनने सांगितलं.

या घटनेवर कर्जत जीआरपीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी यादव यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. 

एका प्रवाशाने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दुसऱ्या माणसाचा जीव वाचवला आहे. ही खरोखर खूप धाडसी कृती आहे. मात्र, या घटनेची नोंद आमच्याकडे झाली नाही. तरी आम्ही मदत करणाऱ्या प्रवाशाने केलेल्या कामाचं कौतुक करतो आणि जीव वाचवल्याबद्दल केतन थोरवेचा सत्कार करण्यात येईल” 

अशा धाडसी कामांची नोंद घेऊन त्या लोकांना नेहमीच प्रशासन गौरवान्वित करत असल्याचं दिसून आलं आहे.

फेब्रुवारी २०२२ मध्ये एक वृत्त खूप व्हायरल झालं होतं. गंभीर आजारी असलेल्या एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याचा जीव वाचवल्याबद्दल एका डिलिव्हरी बॉयचा संरक्षण खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सत्कार करण्यात आला होता. 

घटना होती मुंबईची. २५ डिसेंबर २०२१ रोजी कर्नल मनमोहन मलिक नावाचे निवृत्त आर्मी ऑफिसर यांची तब्येत खालावली होती. म्हणून त्यांच्या मुलाने त्वरित त्यांना लीलावती रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. मात्र मुंबईच्या ट्राफिकमध्ये ते अडकले. त्यांच्या मुलाने अनेक दुचाची चालकांना मदत मागितली कारण ते गर्दीतून वेगाने प्रवास करू शकतात पण कुणीच थांबलं नाही, असं मलिक यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये सांगितलं होतं. 

असा परिस्थितीत एका स्विगी डिलिव्हरी बॉयने मदत केली. मृणाल किर्दत असं त्या व्यक्तीचं नाव. त्याने जोरजोरात ओरडत इतर गाडीचालकांना रस्ता देण्यास सांगितलं ज्यामुळे कर्नल हॉस्पिटलला पोहोचू शकले. तिथे पोहोचल्यावर मृणालने पळत जाऊन हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना बोलावलं आणि लवकरात लवकर कर्नल मलिक यांच्यावर उपचार करण्याची विनंती केली होती. 

मृणालच्या या कृत्यासाठी त्याला महाराष्ट्र गुजरात आणि गोवा परिसरातील जीओसी लेफ्टनंट जनरल एच. एस. केहलोन यांनी त्याचा सत्कार केला होता.

सोशल माडियामुळे या घटना समोर येत आहेत. म्हणून चांगल्या कामांसाठी या माध्यमाचा कसा वापर करावा हे तर आपल्याला दिसत आहेच मात्र सोबतच सामाजिक आयुष्यात सजगता किती गरजेची आहे, हे देखील यातून स्पष्ट होतंय.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.