नरेंद्र मोदींनी दिलेले १ कोटी रुपये हेमंत करकरे यांच्या पत्नीने का नाकारले होते?

२६ नोव्हेंबर २००८.  साधारण रात्री आठ वाजता बातमी आली मुंबईच्या सीएसटी परिसरात गोळीबार सुरु आहे. नंतर कळाल पाकिस्तानवरून समुद्रमार्गे आलेल्या दहा अतिरेक्यांनी हा क्रूर हल्ला केला आहे.  देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर झालेला हा हल्ला अत्यंत अनपेक्षित होता. सुरवातीला कोणालाच काही कळत नव्हते की काय झालंय. रस्त्यारस्त्यांवर दहशतीचे वातावरण सुरु होते. गोळ्यांचे आवाज येत होते.

अशातच रात्री बातमी आली की महाराष्ट्राचे एटीएस चीफ हेमंत करकरे हे अशोक कामटे, विजय साळसकर या आपल्या सोबत्यासमवेत अतिरेक्यांचा सामना करताना शहीद झाले. 

हे तिन्ही जांबाज अधिकारी आपल्या शौर्यासाठी ओळखले जात होते. काही तासभरापूर्वी टीव्हीवरच्या एका फुटेजमध्ये हेमंत करकरे अंगावर लाईफ जॅकेट घालताना दिसले होते. असे असूनही त्यांना अतिरेक्यांनी मारले हा पूर्ण देशभरासाठी धक्का होता. त्यांच्या जाण्याच्या उलट सुलट चर्चा सुरु झाल्या.

देशाचे शूर कमांडो जवान ताज, ओबेरॉय अशा हॉटेलमध्ये लपलेल्या अतिरेक्यांना शोधून त्यांना मारायच्या प्रयत्नात होते. देशाची मिडिया याचे लाइव्ह चित्रीकरण टीव्हीवर दाखवण्यात मग्न होती. प्रत्येकाने या घटनेतून आपला फायदा कसा होईल हे पाहण्याचा प्रयत्न सुरु ठेवला होता.  इकडे अजून दहशतवादी हल्ला थांबला नव्हता. 

अशातच मुंबईमध्ये आगमन झालं तेव्हाचे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचं. त्यांनी मुंबईमध्येचं ताज हॉटेल जवळ पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी त्यावेळच्या सरकारवर टीका केली. पाकिस्तानवर घणाघात केला आणि शहीद अधिकाऱ्यांच्या पत्नीनां गुजरात तर्फे सन्मान राशी म्हणून १ कोटी रुपये प्रत्येकी देणारं असल्याचे जाहीर केले.

नरेंद्र मोदी यांच्या अधिकाऱ्यांनी तीन वेळा शहीद करकरे यांच्या पत्नीची भेट मागितली पण कविता यांनी कोणत्याही राजकीय व्यक्तीला भेटण्यास नकार दिला होता. शिवाय त्यांनी हे एक कोटी रुपये स्वीकारण्यास नकार कळवला होता. मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना सुद्धा करकरे कुटुंबीयांनी भेटण्यास नकार दिला होता.

द टेलिग्राफ या वृत्तपत्रामध्ये दिलेल्या मुलाखती मध्ये हेमंत करकरे यांच्या वहिनी अमृता करकरे म्हणाल्या, कविता यांची तब्येत सध्या चांगली नाही आणि कोणत्याही राजकीय नेत्याची भेट घेण्याची त्यांची इच्छा नाही आहे.

अखेर नरेंद्र मोदी करकरे यांच्या घरी न कळवताचं धडकले. कविता यांनी त्यांची भेट घेतली. मोदींना एव्हाना कविता करकरे यांचा या एक कोटीच्या सन्मानाला विरोध आहे हे लक्षात आले होते म्हणून त्यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलेल्या घोषणेचा उल्लेख ही केला नाही.  

पण कविता करकरे यांनी नरेंद्र मोदी यांनी देऊ केलेला सन्मान न स्वीकारण्यामागे विशेष कारण आहे अशी चर्चा होती.

झालं काय होत काही महिन्यापूर्वी हेमंत करकरे यांनी मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याच्या आरोपातून साध्वी प्रज्ञासिंग यांची अटक केली होती. यामुळे चिडलेल्या हिंदुत्ववादी संघटनानी त्यांच्यावर टीकेचा जोरदार हल्ला केला होता. त्यांच्या देशभक्तीवर, कार्यक्षमतेवर शंका घेण्यात आली होती. या टीकेला पाठींबा देणारे वक्तव्य नरेंद्र मोदी यांनी दिले होते.

एकेकाळी करकरे यांच्या वर टीका करणारे नरेंद्र मोदी आज शहिदांच्या मृत्यूवर राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत असाही आरोप केला गेला. देशाचे जवान परकीय शत्रूंशी लढत असताना त्यावर राजकारण करण्यास शहिदांच्या पत्नींनी नकार दिला होता. मोदींना मोकळे हाती गुजरात मध्ये परतावं लागलं. 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.