मराठ्यांच्या ९६ कुळांना समोर ठेवून करमाळ्यात ९६ कुळी कमलाभवानी मातेचं मंदिर बांधण्यात आलं.

सोलापूर जिल्ह्यातला करमाळा. भीमा नदीच्या खोऱ्यातला हा तालुका म्हणजे रावरंभा निंबाळकर यांची एकेकाळची जहागीर. याच करमाळा गावामध्ये आहे कमलादेवीचे वैशिष्ट्यपूर्ण ९६ कुळी मंदिर.

या मंदिराचा इतिहास पहायचा झाला तर आपल्याला सतराव्या शतकात जावं लागेल.

फलटणचे महादजी नाईक निंबाळकर म्हणजे साक्षात शिवरायांचे जावई. संभाजी महाराजांची बहीण सखुबाई या त्यांच्या पत्नी. याच महादजीचा नातू म्हणजे रंभाजी निंबाळकर. औरस, अनौरस या वादामुळे रंभाजीच्या जन्माचा इतिहास ज्ञात नसला तरी रंभाजीची कारकीर्द हैदराबादच्या निजामशाहीत खूपच गाजली. 

१७०७ साली औरंगजेबाच्या निधनानंतर स्वराज्याच्या गादी वर हक्क कोणाचा यावरून वाद झाले आणि शाहू महाराजाचा सातारा व ताराराणी बाईसाहेब यांचे कोल्हापूर अशा दोन गाद्या निर्माण झाल्या.

मराठा सरदार या दोन्ही गाद्यांच्या वादात विभागले गेले. काही अंतर्गत वादाला कंटाळून हैद्राबादच्या निजामाला जाऊन मिळाले यात होते रंभाजी निंबाळकर. हैद्राबादच्या निजामाचा महाराष्ट्रातला मुख्य आधार म्हणजे हे निंबाळकर घराणे. त्यांच्या पराक्रमाने खुश होऊन निजामाने त्यांना रावरंभा ही पदवी आणि करमाळा भूम बारामती तुळजापूर इथली जहागिरी दिली .

या रावरंभा घराण्यातले रंभाजी, जानोजी, आनंदराव, बाजीराव, खंडेराव यांच्या सारखे पराक्रमी पुरुष शेवटपर्यंत निजामशाहीत राहिले. या घराण्यात युद्धकले बरोबरच साहित्य कला सौंदर्यदृष्टी याचही वरदान होत. 

शिवाजी महाराजांचे कुलदैवत म्हणजे तुळजापूरची आईभवानी. रंभाजी निंबाळकर हे बरेच वर्ष तुळजापूर येथे वास्तव्यास होते. या काळात त्यांनी तुळजाभवानी मातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. म्हणून आजही तुळजाभवानीच्या मुख्य प्रवेशद्वाराला सरदार निंबाळकर दरवाजा म्हणतात.

रावरंभा रंभाजी निंबाळकर देवीचे उपासक बनले. तुळजापूरनंतर त्यांनी माढय़ाचे माढेश्वरी व त्यानंतर करमाळ्याचे कमळादेवी मंदिर बांधले. तुळजापूर आणि माढ्याची मंदिरे किल्ल्याच्या धाटणीची आहेत. परंतु करमाळा येथील मंदिर बांधकामशैली ही पूर्णत: नावीन्यपूर्ण आहे. रंभाजीचे पुत्र जानोजीराव निंबाळकर यांनी हे मंदिर दाक्षिणात्य पद्धतीने बांधले.

इ.स. १७४० ते १७४३ च्या दरम्यान रावरंभा जानोजी राव हे रघुजी भोसलेसमवेत दक्षिणेतील त्रिचनापल्लीच्या स्वारीवर गेलेले असताना तेथील मंदिराच्या प्रवेशद्वारावरील बांधकामाची ‘गोपुरशैली’ त्यांना फार भावली. रंभाजीच्या काळात सुरु झालेले कमलाभवानी मातेच्या मंदिराचा काम जानोजीरावांनी पूर्ण केले मात्र मंदिराच्या रचनेत महत्वाचे बदल करून त्यांना दाक्षिणात्य पद्धतीची गोपुरे बसवली.

महाराष्ट्रात पहिल्यांदा मंदिरांना गोपुरे बसवण्याचा मान हा करमाळ्याच्या रावरंभाकडे जातो.

असं म्हणतात की या रावरंभा निंबाळकर यांच्या करमाळा जहागिरीमध्ये 96 खेडी होती. त्यामुळे 96 या अंकाला या कमलादेवी मंदिरात विशेष महत्व आहे. मंदिर 96 खांबावर उभारले असून मंदिराला जाण्यासाठी 96 पायर्‍या आहेत. मंदिरात 96 ओवर्‍याचे भक्तनिवास आहे. मंदिरामध्ये सजावटीसाठी 96 शिल्पचित्रे लावलेली आहेत.

स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना असलेली 96 पायर्‍याची हत्ती बाव मंदिर परिसरातच आहे. या प्रचंड विहिरीच्या बांधकामासाठी आलेला खर्च हा पूर्ण मंदिराच्या बांधकामासाठी आलेल्या खर्चापेक्षा जास्त आला असावा असे म्हटले जाते. ही विहीर इतकी प्रचंड आहे की तिचा मोट मारायला हत्ती असायचे. या विहिरीमुळे आसपासची अनेक शेते हिरवीगार राहिली आहेत.

कमलाभवानी मंदिर हेमाडपंथी शैलीतील असून मंदिरातील बांधकामावर मुघली बांधकाम शैलीचाही प्रभाव असल्याचे दिसते. उंच टेकडीवर असलेल्या या मंदिरात प्रवेश करण्यासाठी पायथ्यापासून प्रवेशद्वारापर्यंत दगडी पायर्‍यांची चढण आहे. मुख्य मंदिरामध्ये श्री कमलाभवानी मातेची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. 

कमलाभवानी माता ही महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेचे प्रतिरूप मानली जाते. सिंहारूढ आणि महिषासुराचे निर्दालन करण्याच्या आवेशात उभी असलेली भवानीमाता अष्टभुजा आहे.

मंदिरात कमलाभवानी मातेच्या उजव्या बाजूच्या भागात श्री महादेवाची पाषाणातील पिंड आहे. त्यामागच्या मंदिरात श्री गणेशाची काळ्या पाषाणातील भव्य मूर्ती आहे. गाभार्‍यात श्री विष्णू-लक्ष्मीची गरुडारूढ मूर्ती आणि त्यामागील गाभार्‍यात सूर्यनारायणाची सप्त अश्व जोडलेली काळ्या पाषाणातील मूर्ती आहे.

मुख्य मंदिरासमोरच्या मोकळ्या जागेत 80 फूट उंचीच्या तीन दीपमाळा असून त्या एवढय़ा भव्य आहेत की, त्यावर जाण्यासाठी आतील बाजूला पायऱ्या आहेत. दीपमाळेतील पायऱ्यांची संख्या 96 च आहे. दीपमाळा प्रज्वलित केल्यानंतर त्याच्या ज्वाला करमाळा जहागिरीतील संपूर्ण 96 गावांतून स्पष्टपणे दिसत होत्या अशी दंतकथा आहे.   

स्वतः रावरंभा निंबाळकर हे बऱ्याचदा या मंदिरातल्या ओवऱ्यामध्ये राहायला यायचे. त्यामुळे त्यांना भेटायला येणारेही याच ठिकाणी राहात असत. पेशवे दफ्तरातील ‘मुक्काम दरजागा कमलालये’ या नोंदीवरून पेशव्यांचा मुक्कामही या ओवरीत झाला असण्याची शक्यता आहे. 

आजही दरवर्षी कमळादेवीची मुख्य यात्रा  कार्तिक पौर्णिमेला भरते. या काळात रोज देवीचा छबिना निघतो, परंतु शेवटच्या दिवशी म्हणजे चतुर्थीला निघणारा छबिना जरा वैशिष्टय़पूर्ण असतो. रात्री 12 वाजता थोरल्या हत्तीच्या वाहनाच्या अंबारीत निघालेल्या छबिन्यासाठी सेवेकरी, मानकरी मोठी गर्दी करतात. ‘

बडी जे महेरबान’, ‘बडी सवारी आ रही है’ अशा हिंदीतील घोषणेबरोबरच आई राजा उदोऽऽ उदोऽऽचा जयघोष सुरू असतो.

कमळादेवीच्या या छबिन्याचे वैशिष्टय़ म्हणजे  रात्रभर चालणाऱ्या छबिन्यापुढे मुस्लीम समाजातील नर्तकीचे नृत्य सुरू असते. रावरंभा खंडेराव अर्जुन बहाद्दुरचे हैदराबादमधील महालिका नावाच्या नर्तकीवर मनापासून प्रेम होते. त्याचे प्रतीक म्हणून कमळादेवीच्या छबिन्यापुढे मुस्लीम समाजातील नर्तकी नृत्य सादर करीत असते

रावरंभा घराणे हे मोठे पराक्रमी होते पण औरस अनौरासाच्या वादामुळे फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्याच्या तुलनेत त्यांना योग्य तो सन्मान मिळाला नाही. असं म्हणतात की हेच शल्य जानोजीराजे निंबाळकर यांना होते. त्यामुळेच त्यांनी मराठ्यांच्या 96 कुळाला डोळ्यासमोर ठेवून कमलाभवानी मंदिराची रचना केली. तुळजाभवानी प्रमाणे येथेही पुजारी आणि सेवेकरी मराठा जातीचे आहेत. 

अतिशय सुंदर असे हे मंदिर आणि करमाळा तालुक्याचा परिसर सैराट चित्रपटामध्ये झालेल्या चित्रिकरणामुळे प्रसिद्धीस आला आहे.

हे ही वाच भिडू.

 

2 Comments
  1. राहुल गोविंदराव पवार says

    संदर्भ कोणते वापरले आहेत या लेखासाठी हे समजू शकेल का ….?

  2. praven dhepe says

    हि माहिती कुनी सांगितली

Leave A Reply

Your email address will not be published.