कर्मवीरांच घराणं म्हणजे जैन, लिंगायत आणि मराठा; अण्णांच्या घराण्याची अशीही एक जातीनिरपेक्षता

सांगली कोल्हापूरचा नदी पट्टा म्हणजे जैन, मराठा आणि लिंगायत या तिन्ही जातींच राजकारण. उगीच खोटं कशाला बोला. आम्ही जातीचं राजकारण करत नाही अस कितीही ठणकावून म्हणालात तरिही हे राजकारण इथे चालत हे उघड सत्य आहे. 

अशाच भागातून कर्मवीर अण्णा पुढे आहे. काही प्रमुख अपवाद होते ज्यांना जातीचा बिल्ला कधी लागला नाही आणि कोणी जाणूनबुजून लावण्याचा प्रयत्न केला तर कर्मवीर अण्णांच्या उंचीपुढे तो फिका पडला. या माणसाला गरिबी आणि शेतकरी ही एकच जात दिसत होती. शिक्षण हा त्यावरचा उपाय दिसत होता. त्यातूनच कर्मवीर आण्णांनी गरिबांची पोर काखोटीला धरून शाळेत आणली… 

एक-दोन-तीन-चार अशा चार चार पिढ्यां शिकवण्याचं श्रेय कर्मवीर आण्णांना जातं. अशा थोर मानवाची जात कोणती ते सांगण हा लेखाचा हेतू नाही, तर अण्णांच्या घरात जात कशी संपत गेली हे सांगण या लेखाचा हेतू आहे.. 

कर्मवीर भाऊराव पाटलांचे मुळ घराणे ऐतवडे बुद्रुक सांगितले जाते. मात्र ऐतवडे हे त्यांच्या मुळ घराण्याचे गाव नसून कर्नाटकातील मंगलोर जिल्ह्यातील मूडबिद्री हे त्यांच्या घराण्याचे मुळ गाव आहे… 

हा इतिहास सुरू होता आदिलशाहीच्या काळात.

विजापूरच्या आदिलशाहीने तेव्हा गोलघुमटाचे बांधकाम काढले होते. गोलघुमट हा वास्तुशिल्पाचा एक उत्तम नमुना समजला जातो. जेव्हा आदिलशाहीने हे बांधकाम सुरू करण्याचे ठरवले तेव्हा मुल्ला मौलवी व ज्योतिष्यांचा सल्ला घेण्यात आला.

हा सल्ला देताना आदिलशाहीला सांगण्यात आले की चिरंतर उभा राहणारी वास्तू पुर्णत्वास घेवून जायचे असेल तर याच्या पायात जिवंत सौभाग्याची आहुती द्यायला हवी. ही जोडी घरातील जेष्ठ असावी. म्हणजे घरातील थोरल्या मुलाचे लग्न दूसऱ्या घराण्यातील थोरल्याच मुलीसोबत झाले असेल अशा जोडीचा बळी या बांधकामासाठी देण्यात यावा. 

लागलीच आदिशाहीचे गुप्तहेर राज्यामध्ये अशा जोडीचा शोध घेवू लागले. मूडबिद्रीच्या देसाई घराण्यात असे जोडपे होते.

देसाई घराण्याचा आपला माग काढत आपला बळी देणार असल्याची माहीती मिळाली व होतं नव्हतं ते सगळं घेवून हे जोडपं आदिलशाहीच्या सिमा ओलांडून पन्हाळ्यावर आलं.. 

लिंगायत : 

कोल्हापूरच्या पन्हाळ्यावर ना शेती होती ना कष्ट करण्याचे दूसरे साधन. इथे येवून या जोडप्याने उदरनिर्वाहासाठी दुकान सुरू केलं. देसाई हे आडनाव मागे पडून महाजन आडनाव धारण केलं. मुळचे देसाई घराणे महाजन झाले.

व्यापार करणारा तो महाजन व महाजन तो लिंगायत या धर्तीवर हे कुटूंब लिंगायत म्हणून ओळखले जावू लागले. 

जैन : 

या जोडप्याला तीन मुले झाली. पैकी दोन मुलांनी पन्हाळ्याची वेस ओलांडून शेती करण्याचा निर्णय घेतला. शेतीच्या शोधात ते वारणाकाठी असणाऱ्या ऐतवडे बुद्रुक मध्ये आले. दोन्ही भाऊ ऐतवड्यात शेती करु लागले. त्या काळात या गावाला केळीचं ऐतवडे म्हणून ओळखलं जातं. गावात चांगला जम बसवला.

प्रतिष्ठा वाढली आणि दोघां भावांपैकी थोरल्या भावाकडे ऐतवड्याची पाटीलकी आली, हे जैन पाटील झाले.. 

मराठा :

थोरल्या भावाकडे पाटिलकी आल्यानंतर धाकट्या भावाने पुढचा रस्ता पकडला. तो मजल दरमजल करत सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील येळगाव येथे आला. येळगावचा पाटील मराठा घराण्यातला होता. त्यांना मुलबाळ नव्हते.

त्यांनी या धाकट्या मुलास दत्तक घेतले. आपली पाटीलकी या पाटलाच्या पदरात टाकली. धाकटा मराठा पाटील झाला.. 

अशा प्रकारे तीन भावांचा इतिहास. एक लिंगायत,दूसरा जैन आणि तिसरा मराठा. नियतीनेच या घराण्यात जातीयतेला मुठमाती दिली. 

पैकी ऐतवड्याचा जैन मराठा घराण्याचे वारसदार म्हणजे कर्मवीर आण्णा. करवीर येथे जैन धर्माचे जिनसेन भट्टारक पट्टाचार्य हे धर्मपीठ आहे. या गादीचा मान भाऊरावांच्या घराण्यातील पूर्वज नेमगोंडा पाटील यांना मिळाला. दिगंबर मुनींची दिक्षा घेवून ते पुढे त्यागी झाले.

१८२० साली त्यांनी भिलवडी येथे समाधी घेतली. नेमगोंडा पाटील यांना शांतोगोडा नावाचा मुलगा मुलगा होता. त्यांनाही जैन सैनाचार्य पदाचा मान मिळाला. नांदणी येथे १८५४ साली त्यांचे देहवसान झाले. त्यांची समाधी नांदणी येथे आहे. 

याच घराण्यातील देवगोंडा ज्योतीगौंडा पाटील म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटलांचे आजोबा. त्यांना एकदा एका कामासाठी सही करण्यास बोलवण्यात आले. पण ते अशिक्षित असल्याने त्यांना सही करता आली नाही. तेव्हा त्यांनी आपल्या मुलाला शिकवण्याचा संकल्प केला. आपला मुलगा पायगोंडाला त्यांनी शिकवले. पायगोंडा महसुल खात्यात नोकरीला लागले. 

पायगोंडानी देखील आपल्या मुलांना शिकवले. त्यांना एकूण चार मुले व दोन मुली. पैकी तात्यासाहेब हा मुलगा कोल्हापूर संस्थानात वकिली करु लागला. बळवंतराव मॅट्रिक होवून अबकारी खात्यात लागला. बडेंद्र हा पोलीस खात्यात नोकरीला लागला आणि सर्वात थोरला कर्मवीर झाला… 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.