हा साखरसम्राट सहज शिक्षणसम्राट बनला असता पण कर्मवीरांच्या शब्दासाठी आयुष्यभर रयत सांभाळली

अहमदनगर जिल्हा म्हणजे साखर सम्राटांचा जिल्हा. सगळीकड सहकाराच जाळ पसरलेलं आहे. निम्मा जिल्हा दुष्काळाने जळलेला पण इर्षेला पडून तालुक्या तालुक्यात साखर कारखाने उभे केले आहेत आणि ते चांगले चालवून देखील दाखवले आहेत. अख्ख्या राज्यात पहिल्यांदा सहकारी साखर कारखाना नगरमध्येच सुरु झाला.

सहकाराच्या माध्यमातून विकास हे गणित नगर जिल्ह्यानेच राज्याला शिकवलं.

आज संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्यात जास्त साखर कारखाने नगर जिल्ह्यातच आहेत. गंमतीची गोष्ट म्हणजे या साखरेचं राजकारण करणाऱ्या नगर जिल्ह्यात डाव्या विचारसरणीचे देखील मोठं वर्चस्व आहे. अगदी स्वातंत्र्यलढ्यापासून बहुजनवादी विचार शेकाप पक्षाच्या माध्यमातून इथल्या शेतकऱ्यांमध्ये रुजले. आजही त्याचे काही ठसे पाहायला मिळतात.

अशाच विचारातून मोठं झालेलं एक नेतृत्व म्हणजे सहकार महर्षी शंकरराव काळे.

शंकरराव काळे यांचा जन्म ६ एप्रिल १९२१ रोजी झाला. दुष्काळी भाग. घरची शेती असून नसल्यासारखी. मात्र वडील देवशामबाबा काळे हे स्वतः निरक्षर असूनही प्रचंड मेहनती होते. त्यांची इच्छा होती कि आपल्या पोराने खूप शिकावं. त्यांच्या इच्छेखातर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शंकरराव काळेंनी बी.एस्सी व बी. ई. (सिव्हील) पर्यंत शिक्षण घेतले. त्या काळात माजी मंत्री बी. जे. खताळ, दत्ता देशमुख, बी. जी .शिर्के, पी. जी. साळुंके यांच्यासारखे मित्र त्यांना लाभले.

स्वातंत्र्यलढ्यामुळे भारावलेला हा काळ होता. सुशिक्षित बहुजन तरुणांनी एकत्र येऊन समाजासाठी काही तरी केलं पाहिजे हा विचार तिथे रुजत होता. शंकरराव काळे यांच्या वडिलांचीही मुलाने शेती करावी अशी इच्छा होती. म्हणूनच मोठी गल्लेलठ्ठ पगाराची नोकरी मिळत असूनही शंकरराव काळे गावी परत आले.

समाजकारणाची आवड होतीच शिवाय स्वातंत्र्यानंतर नव्या ऊर्जेचे धुमारे तरुणाईमध्ये फुटत होते.

शंकरराव काळे यांनी १९५२ साली झालेल्या पहिल्याच निवडणुकीत शेकापकडून आमदारकी लढवली. पहिल्या प्रयत्नात त्यांना अपयश आलं मात्र याच अपयशातून त्यांना मोठा धडा शिकायला मिळाला.

याच काळात नगर जिल्ह्यात सहकाराचं वारं घुमू लागलं होतं. विठ्ठलराव विखे पाटलांनी प्रवरेला पहिला सहकारी साखर कारखाना उभारला. असाच कारखाना आपल्या भागात उभा करून विकासाच्या गंगेला वाट करून द्यावी हे विचार शंकरराव काळे व त्यांच्या मित्रांमध्ये आले.

तिथूनच कोपरगाव सहकारी साखर कारखाना उभारणीचे प्रयत्न सुरु झाले.

पण हि सोपी गोष्ट नव्हती. कारखान्याचा सभासद होण्यासाठी दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना समजावून सांगणे हि मोठी गोष्ट होती. शंकरराव काळे आपल्या साथीदारांसह अगदी खेडोपाडी फिरत होते. प्रसंगी शेतकऱ्यांची गुरे शेळ्यामेंढ्या सांभाळल्या पण त्यांना मागे लागून सभासद करून घेतलं.

या साऱ्या प्रयत्नातून कोपरगाव तालुक्याचं स्वप्न साकार झालं आणि सहकारी साखर कारखाना उभा राहिला.

दरम्यानच्या काळात शंकरराव काळे यांनी राजकारणात आपली पकड मजबूत केली. यशवंतराव चव्हाणांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये आले. १९६२ ते १९७२ या दहा वर्षांच्या कालावधीत त्यांनी जि.प.चे अध्यक्षपद भूषवले. पुढे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बनले. त्यानंतर त्यांचा सहकार व राजकारणातील आलेख चढताच राहिला. सन ९० मध्ये कोपरगाव मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडून गेले.

पारनेरचे आमदार म्हणून त्यांनी बराच काळ जिल्ह्य़ाच्या व राज्याच्या राजकारणावर ठसा उमटवला. मंत्रीपदे देखील भुषवली.

त्यांची व शंकरराव कोल्हे यांची विधायक कामासाठीची चुरस संपुर्ण राज्यात गाजायची. पुढे शंकरराव काळेंनी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती घेतली आणि सहकार क्षेत्राकडे स्वतःला पूर्ण वेळ वाहून घेतलं.

फक्त साखर कारखाना उभा केला नाही तर शेतकऱ्याच्या शेतीला जोडधंदा मिळावा म्हणून कुक्कुटपालन, पशुखाद्य, दूधसंघ, पतसंस्था, सहकारी बँका अशा विविध सहकारी संस्थांचे जाळे उभे केले आणि कोपरगाव तालुक्याचा भाग्योदय घडवून आणला.

कोपरगाव साखर कारखाना उभारत होता तेव्हाच काळ. एकदा सातारचे कर्मवीर भाऊराव पाटील नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. कर्मवीरांनी प्रतिज्ञा केली होती की,

दाढीचे केस जितके आहेत तितकी गोरगरिबांची मुलं शिकवत नाही तो पर्यंत दाढी करणार नाही आणि पायात चप्पल वापरणार नाही.

असा हा कर्मयोगी खेडोपाडी फिरून पोरांना खांद्यावर उचलून आणायचा व त्यांना शाळेत शिकण्यास भाग पाडायचा. भाऊराव पाटलांच्या या प्रयत्नामुळे महाराष्ट्रातील लाखो पिढ्या शिकल्या. नगर जिल्ह्यात त्यान्ची एकदा शंकरराव काळेंशी भेट झाली. त्यांचं कार्य बघून भाऊराव पाटील म्हणाले,

“तुम्ही शेतकऱ्यांच्यासाठी साखर कारखाना काढलात ही फार अभिमानास्पद गोष्ट केली आहे. पण मी शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना शिक्षण मिळावं म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे. गोरगरीब पददलितांमधील मुलांनी शिकून सवरून मोठे व्हावे. सरस्वती लक्ष्मी हातात हात घालून शेतकऱ्याच्या झोपडीत गेली पाहिजे तरच खरी सुबत्ता येईल.”

भाऊराव पाटलांनी शंकरराव काळेंना सांगितले,

रयत शिक्षण संस्थेचे हेच खरे कार्य आहे व ते तुम्ही नगर जिल्ह्यात करावे अशी विनंती करायला मी तुमच्या घरी आलो आहे.

कर्मवीरांचे हे बोल शंकरराव काळेंच्यासाठी आयुष्याला कलाटणी देणारे ठरले. नगर जिल्ह्यात रयत शिक्षण संस्थेचा विस्तार करण्याचा त्याच दिवशी मनोमन संकल्प केला आणि रयतचे काम सुरु केले. ते काम एकनिष्ठेने शेवट्पर्यंत तडीस नेले. 

बरेच वर्ष रयत शिक्षण संस्थेचं अध्यक्षपद शंकरराव काळेंनी निभावलं.

आज नगर जिल्ह्यातली दुष्काळी भागातली बहुजनांची मुलं शिकू शकली, आपल्या पुढच्या पिढयांना गरिबीच्या खाईतून बाहेर काढू शकली ते फक्त आणि फक्त रयत शिक्षण संस्थेमुळे. कर्मवीर भाऊराव पाटलांचा आशीर्वाद आणि शंकरराव कलेची मेहनत यामुळेच नगर भागात रयतच जाळं पसरू शकलं.

वास्तविक पाहता त्यांनी मनात आणलं असत तर कोपरगाव भागात ते सहज शिक्षण सम्राट होऊ शकले असते पण भाऊराव पाटलांनी दिलेलं काम श्रद्धेनं ते करत राहिले. समाज अभियंता या आपल्या आत्मचरित्रात ते म्हणतात,

“आम्ही गंगाथंडीची माणसं. बुडणाऱ्याला इथली माणसं पाण्यात उडी टाकूनच वाचवतात. काठावर बसून कसं पोहायचे याच व्याख्यान देत बसत नाहीत.”

शंकरराव काळेंनी स्वतः गौतमीपुत्र बनून आपले हेच विचार आचरणात आणले आणि शिक्षण सहकार व राजकारणात एक आदर्श निर्माण केला.

सन्दर्भ- राजकीय आत्मचरित्रे :स्वरूप आणि समीक्षा 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.