जगातील सर्वात मोठी मिशी असणाऱ्या डाकूचं मुंडकं पाकिस्तानवाल्यांनी पळवून नेलंय .

भारतात अनेक अशा घटना घडल्या आहेत ज्यांच्या रोचक कथा वर्षानुवर्षे ऐकवल्या जातात. काही खरोखरच घडलेल्या असतात तर काही नुसतं थापा मारण्यासाखया सांगितल्या जातात. अशीच एक घटना आजपासून ३० वर्षांपूर्वी राजस्थान मधील जैसलमेर गावात घडली होती. ज्यात एका व्यक्तीची हत्या करून हत्यारे त्याच शीर पळून गेले आणि धड तिथंच पडू दिले.

ही गोष्ट आहे करणा राम भील यांची. ६ फूट उंचीचा धिप्पाड माणूस. त्याचा चेहरा असा होता की, बघूनच मनात धडकी भरायची. जैसलमेर मधील आया आपल्या मुलांना त्याच्या नावाची भीती घालायच्या. करणा राम एक खतरनाक दरोडेखोर होता.

त्याला रेगिस्तानचा गब्बर सिंग म्हटलं जायचं.

दरोडेखोर असला तरी त्याच्यात दोन खासियत होत्या एक म्हणजे त्याच्या लांबलचक मिशा. त्याच्या ८ फूट लांब मिशांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये जगातील सर्वात लांब दुसरी मिशी म्हणून नोंद आहे. आणि दुसरं त्याला असलेलं नडवादनाचे वेड. तो कुणी जन्मजात कलाकार नसला तरी एका बाईवर मन जडल्याने त्याला नडवादनाचे वेड लागले होते.

नडवादन ही एक राजस्थानी लोकसंगीताचा भाग आहे. तो एक काळ होता, जेव्हा पाकिस्तान-अफगाणिस्तान मधील स्त्रिया नडवादन ऐकाण्याची मोठी आवड होती. त्या नडवादन ऐकायला राजस्थानला यायच्या. अशीच एक लाली नामक स्त्री नडवादन ऐकायला अफगाणिस्तान वरून आली होती. ती करणाला जाम आवडली, मग तिला पटवायला तो नडवादन शिकला. पुढे ती मिळाली की नाही, ते माहीत नाही पण तो एक उत्कृष्ट नडवादक बनला होता.

अशात १९६५ मध्ये करणा रामने जैसलमेर आणि बाडमेरच्या मधात वसलेल्या भू-गावात जमीन खरेदी केली होती. त्या जमिनीच्या मालकी हक्कावरून इलियास नामक व्यक्तीसोबत वाद झाला. त्यावरून दोघांत नेहमी खटके उडायचे.

यातूनच एक दिवस करणा रामच्या रागाचा पारा चढला आणि रागाच्या भरात त्याने इलियास याला त्याच्या मुलासमोर गोळी मारून ठार केले.

तेव्हा इलियासच्या मुलाने वडिलांच्या हत्येचा बदला घेण्याची शपथ घेतली. नंतर करणा रामला अटक होऊन जन्मठेपेची शिक्षा झाली. काही लोकांचे म्हणणे आहे की, करणा राम जेल तोडून फरार झाला होता. पण काही दिवसांनी त्याला परत अटक झाली. जेलमध्ये असतांना त्याला आपल्या लांब मिशा आणि नडवादनात तरबेज असल्या कारणाने पॅरोलवर सुट्टी मिळायची.

पण सुट्टी तेव्हाच मिळायची जेव्हा कुठला लोकसंगीताचा व्हीव्हीआयपी कार्यक्रम असायचा. असेच एकदा तत्कालीन राष्ट्रपती ज्ञानी झैल सिंग जैसलमेर दौऱ्यावर होते. तेव्हा त्यांच्या सन्मानात आयोजित कार्यक्रमासाठी करणा रामला नडवादन करण्यासाठी बोलवले होते. म्हणतात की, करणा रामच्या नडवादनाने खुश होऊन तत्कालीन राष्ट्रपती ज्ञानी झैलसिंग यांनी त्याची शिक्षा कमी केली होती.

२ जानेवारी १९८८ ची घटना. करणा राम आपली उंट गाडी घेऊन चारा आणण्यासाठी चालला होता. तो जसे सोनार किल्ल्याजवळ आले तसा मागून हल्ला चढवला आणि त्याचं मुंडक धडा वेगळं करून टाकलं. हल्लेखोर मुंडक घेऊन पसार झाले आणि धड उंट गाडीत टाकून गाडी घराकडे पाठवून दिली. उंट धड घेऊन जेव्हा घरी आले तेव्हा ते बघून घरातल्यांना जोरदार धक्का बसला. लोक म्हणायचे की,

“करणा रामला मारणे हे एकट्या दुकट्याचे काम नव्हते. तो चांगलाच पैलवान होता, इतका की उंट उचलू शकेल. “

हत्येनंतर घरच्यांनी मुंडक्याचा फार शोध घेतला पण ते काय सापडले नाही. शेवटी त्यांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार न करता ते धड तसच घराजवळ एक खड्डा खोदून त्यात पुरवले. पोलिसांचे म्हणणे आहे की, त्याकाळी बॉर्डर वर कुठली फेंसिंग व्हायची नाही. त्यामुळे भारतातून पाकिस्तान जाणे फार सोपे होते. हत्या करणाऱ्यात इलियासच्या मुलासोबत तीन जण सहभागी होते. हत्या करून शीर घेऊन पाकिस्तानला पळून गेले असावे.

तर या घटनेला ३० वर्षे होऊन गेलीत. पण आजही करणा रामच्या घरचे या आशेवर टिकून आहेत की, एक ना एक दिवस शीर मिळेल आणि करणा रामवर अंत्यसंस्कार करता येतील. यावर करणा रामचा मुलगा म्हणाला की,

“वडिलांचा आत्मा भटकतो आहे. त्यामुळे आम्हाला वडिलांचे शीर आणून द्या, नाहीतर त्यांचा आत्मा असाच भटकत राहणार.”

हे ही वाचा भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.