मोठमोठ्या दान शूरांना लाजवेल असं दान कर्नाटकच्या हुच्चम्मा आजीने केलंय

दान करण्याचे अनेक प्रकार आहेत, फक्त दान करण्यासाठी इच्छा आणि खुलं मन असावं लागतं. आज काल आपण असे अनेक सेलिब्रिटीज किंवा अनेक लोक बघतो जे काहीतरी दान करतात, मात्र त्या दानापेक्षा जास्त त्याचा सोशल मीडियावर डंका वाजवतात. अशावेळी एकंच प्रश्न येतो की, याला दान म्हणावं का? खरंच दान जे लोक करतात त्यांना कोणत्याही पब्लिसिटीची गरज नसते. त्यांची आपोआप वाच्यता होत असते. आणि हे एका आजीने नुकतंच सिद्ध करून दाखवलंय. 

या आजींचं नाव आहे हुच्चम्मा चौधरी. या आजीने त्यांची १ करोड मूल्याची जमीन अक्षरशः दान केली आहे. आणि ज्यासाठी दान केली आहे ते कारण अजूनच सॉलिड आहे. त्यांनी गावातील मुलांसाठी शाळा बांधायला ही जमीन दिलीये.

७५ वर्षांच्या या हुच्चम्मा आजी मूळच्या कर्नाटकच्या. कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यातील कुनीकेरी गावात त्या राहतात. या आजींना स्वतःच मूल नाहीये पण त्या सगळ्या गावातील मुलांना स्वतःची मुलं मानतात. या मुलांसाठी त्या गेली कित्यके वर्ष झाले शाळेत मध्यान्ह भोजन तयार करतात. त्यांना या मुलांचा खूप लळा लागला आहे. आणि त्याच प्रेमापोटी आजींनी गावातील मुलांसाठी शाळा आणि खेळाचे मैदान बांधण्यासाठी एक कोटी रुपयांची जमीन दान केलीये. 

हुच्चम्मा आजींची गावात २ एकर जमीन आहे. अलीकडच्या काळात या गावात धातू उत्पादकांचा व्यवसाय वाढला आहे, ज्यामुळे चौधरी यांच्या जमिनीची किंमतही वाढली आहे. बाजारमूल्य वाढल्याने त्यांच्या जमिनीची किंमत १ करोड इतकी झालीये, असं गावकऱ्यांनी सांगितलंय. मात्र जेव्हा शाळा उभारण्यासाठी शासनाने हुच्चम्मा आजींसमोर त्यांची जमीन खरेदी करण्याचा प्रस्ताव मांडला, तेव्हा आजींनी जमीन विकली नाही तर खुल्या हाताने दान केली.

हुच्चम्मा आजीचं म्हणणं आहे की, “मी स्वतः एकही मूल जन्माला घातलं नाही. मात्र या गावातील सगळे मुलं मला ‘आजी’ असं म्हणतात. अशाने मी जवळपास ३०० मुलांची आजी झालेय. ही सगळी मुलं माझी आहेत. तेव्हा मी जे करतेय ते माझ्या मुलांसाठी आहे. जमीन विकून जे पैसे मिळतील त्यांचं मी काय करू? उलट या जमिनीवर जर शाळा बांधल्या गेली तर गावातील माझी मुलं मला नेहमी लक्षात ठेवतील. आणि हेच माझ्यासाठी पुरेसं आहे.”

“या मुलांसाठी रोज जेवण बनवण्यात मला माझा आनंद सापडतो. तेव्हा त्यांच्यासाठी शाळा जर बांधली तर आयुष्यभराचं  सुख मला लाभेल”

हुच्चम्मा आजींचं खूप तरुण वयात लग्न झालं होतं. बसप्पा चौधरी असं त्यांच्या पतीचं नाव. या जोडप्याला मूलबाळ झालं नाही. ते आयुष्यभर त्यांच्या शेतजमिनीवर राबत होते. बसप्पा यांच्या मृत्यूनंतरसुद्धा हुच्चम्मा आजी शेतकरी म्हणून साधं जीवन जगत आहेत. त्या त्यांच्या जमिनीवर शेती करत असतात. शिवाय त्या स्वखुशीने गावातील शाळेत मध्यान्ह भोजनासाठी स्वयंपाकी म्हणून काम करतात. कोरोनाकाळात जेव्हा शाळा बंद होत्या तेव्हा त्यांनी गावातील इतर शेतात काम केलं. 

आता मुलांच्या कल्याणासाठी हुच्चम्मा आजीने त्यांची सगळी मालमत्ता दान केलीये. दोन एकर जमिनीपैकी १ एकर जमीन शाळा बांधण्यासाठी असणार आहे, तर दुसऱ्या एकरमध्ये शाळेतील मुलांसाठी खेळाचं मैदान तयार करण्यात येणार आहे. 

कर्नाटकाच्या या हुचम्मा आजीने परोपकार आणि दान कसं असावं, यांचं उदाहरण जगासमोर मांडलं आहे. हुच्चम्मा आजींच्या मनाचा मोठेपणा यातून दिसतो. या कृत्यातून आजच्या पिढीला आयुष्याचं सार आजी सांगून जात आहेत. आजींचा म्हणणं आपण संदेश म्हणून घेऊ शकतो, ते म्हणजे..

पैशाचं काय करणार? खरं सुख तर ‘देण्यात’ आहे. आणि कुणाच्या तरी आपण कामी आलो यातंच आयुष्यभराचं सर्व आलं.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.