कर्नाटकमध्ये झालेल्या वादाचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटत आहेत…

सध्या सोशल मीडिया, वर्तमानपत्रं आणि वेगवेगळे राजकीय-अराजकीय कट्टे सगळीकडे फक्त एकाच विषयाची चर्चा सुरू आहे, तो विषय म्हणजे कर्नाटकात झालेला वाद. कर्नाटकमध्ये कॉलेजमध्ये विद्यार्थीनींनी हिजाब घालण्याची परवानगी न दिल्यानं आंदोलन केलं. हे प्रकरण पार कर्नाटक हाय कोर्टापर्यंत गेलं. मुलींचं आंदोलन, त्यावर उमटलेल्या प्रतिक्रिया आणि व्हायरल झालेला व्हिडीओ यामुळे देशातलं वातावरण चांगलंच तापलंय. त्याचे पडसाद कर्नाटकमध्ये उमटत आहेतच, पण सोबतच महाराष्ट्रातही हा विषय चांगलाच गाजतोय.

सुरुवातीला राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी, ‘एका भगिनीला असे छळून काय मिळते ह्या भक्तांना, विद्वेधाचे राजकारण भारताला पाकिस्तान च्या पंक्तीला नेऊन बसवेल एक दिवस, #हे_राम’ असं ट्विट करत, कर्नाटकमध्ये झालेला व्हिडीओ शेअर केला.  

नुकतंच राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही या वादावर आपलं मत मांडलं, ते म्हणाले, ‘जर शाळा आणि कॉलेजेसमध्ये युनिफॉर्म ठरवून दिलेला असेल, तर तोच वापरला पाहिजे. शैक्षणिक ठिकाणी फक्त शिक्षणाचीच चर्चा व्हायला हवी.धार्मिक किंवा राजकीय वाद इथे आणता कामा नयेत.’ आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यावर आणखी काय प्रतिकिया येतात हे तर आपण बघूच, पण सोबतच राज्यातल्या इतर ठिकाणी काय होतंय हे पाहुयात.

राज्यातल्या बीडमध्ये फ्लेक्स लावण्यात आले आहेत. बरं हे फ्लेक्स लागलेत, शहरातल्या वर्दळीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक, बशीर गंज चौक, राजुरीवेस परिसर या भागांमध्ये. या फ्लेक्सवरच्या कंटेंटची चर्चा फक्त महाराष्ट्रातच नाही, तर सगळ्या देशात होतीये.

या फ्लेक्सवर लिहिण्यात आलंय, ‘पहले हिजाब, फिर किताब. हर किमती चीज परदे में होती है.’ माध्यमांमध्ये असलेल्या वृत्तांनुसार फारुखी लूखमान नावाच्या एका विद्यार्थी नेत्यानं हे फ्लेक्स लावले आहेत. बीडमधल्या या फ्लेक्सबाजीवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. त्यामुळं या फ्लेक्समुळे वातावरण बिघडणार नाही ना अशी चर्चाही सुरू आहे.

दुसऱ्या बाजूला विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यातही कर्नाटकमध्ये झालेल्या प्रकरणाचे पडसाद उमटताना दिसत आहेत. पुणे शहर-जिल्हा काँग्रेस कमिटी, अभिव्यक्ती, लोकायत व विविध धर्मनिरपेक्ष संघटनांनी एकत्र येत ९ फेब्रुवारी रोजी, कॅम्पमधल्या कोहिनुर चौकात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. याच्या पोस्टरवर ‘हिजाब घालणाऱ्या मुलींना शिक्षण हक्क नाकारणाऱ्या व धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या संविधान विरोधी भाजप सरकारचा जाहीर निषेध’ असंही लिहिण्यात आलं होतं. मात्र काही कारणास्तव हे आंदोलन रद्द करण्यात आलं.

एवढंच नाही, तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानंही या वादात उडी घेतली आहे. महाराष्ट्र शासनाने मुस्लिम विद्यार्थिनींचा हिजाबसारख्या प्रकरणावरून सामाजिक छळ होणार नाही, इथली कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही, याची हमी घेतली पाहिजे. कर्नाटकमध्ये जे झालं, त्यासारखाच प्रयत्न भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदुत्ववादी राजकीय पक्ष महाराष्ट्रात करायला पाहत आहेत, असा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव आणि माजी आमदार नरसय्या आडम यांनी केला आहे.

कर्नाटकमध्ये नेमका काय वाद पेटलाय?

उडुपी जिल्ह्यातल्या सरकारी महिला प्री-युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात एक प्रकार घडला. कॉलेजमधल्या आठ मुलींनी सांगितल्यानुसार, कॉलेज प्रशासनानं त्यांना हिजाब घालून वर्गात बसण्याची परवानगी नाकारली. जानेवारीमध्ये त्यांनी या विरोधात आंदोलन केलं. तसंच या विरोधात कर्नाटक हायकोर्टमध्ये याचिकाही दाखल केली. नुकताच एक व्हिडीओ साऱ्या देशात व्हायरल झाला, त्यात कॉलेजमध्ये हिजाब घालून जाणाऱ्या मुलीला भगवे शेले घातलेल्या काही तरुणांनी जय श्रीरामच्या घोषणा देत विरोध केला, याला प्रत्युत्तर देताना त्या मुलीनं अल्लाह हू अकबर अशा घोषणा दिल्या.

वर्गात बसताना हिजाब घालण्याची परवानगी असावी का, याची चर्चा देशभरात सूरू आहे आणि याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटत आहेत.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.