कोरोनामुळे बेंदूरची १०० वर्षांची परंपरा खंडित करावी लागली.

बेंदूर म्हणजे बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करायचा सण. वर्षभर शेतात राबराब राबणाऱ्या बैलांच ऋण फेडण्यासाठी शेतकरी हा दिवस साजरा करतात.

या सणाला कोणी बेंदूर तर कोणी बैलपोळा म्हणतात. सर्वत्र आपापल्या शेतीच्या कामांनुसार वेगवेगळ्या दिवशी हा सण साजरा केला जातो.
दक्षिण महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात कर्नाटकी बेंदूर साजरा होतो.
कोल्हापूर जिल्ह्यतील इचलकरंजी हे एक संस्थांनी गाव. पंचगंगेच्या काठावर असलेली सुपीक शेती आणि गावात वाढलेला वस्त्रोद्योग हातात हात घालून उभा असल्यामुळे हे शहर प्रचंड वेगाने भरभराटीस आले

कितीही आधुनिकता आली तरी या गावातल्या लोकांनी संस्थांनकाळापासून चालत आलेल्या अनेक जुन्या परंपरा प्रथा मनापासून जपल्या.
अशीच एक प्रथा म्हणजे कर तोडणे.
वटपौर्णिमा झाली की बेंदराची चाहूल लागते. शेतकरी पहाटे उठून आपल्या बैलांना पंचगंगा घाटावर घेऊन जातात. न्हाऊ माखू घालतात. विविध आकर्षक रंगांनी व फुलांनी सजवून त्यांची वाजतगाजत मिरवणूक काढली जाते.

फोटो सौजन्य: अप्पा चौगुले जयसिंगपूर

घराजवळ ही मिरवणूक आली की घरधणीन आपल्या बैलांना ओवाळते,त्याला नैवेद्य दाखवते. शेतातल पीक जोमाने वाढू दे, घरात दूधदुभत्याच गोकुळ नांदू दे अशी प्रार्थना करते.
ज्यांच्या घरात बैल नाहीत ते मातीची बैलजोडी आणतात.
हरभऱ्याची डाळ आणि गुळापासून बनवलेले कडबोळे शिंगांवर ठेवून त्यांची पूजा करून त्यांनाही पुरणपोळीचा नैवैद्य दाखवला जातो.

दुपारी ऊन उतरले की मग असतो कर तोडण्याचा कार्यक्रम.

हा मान मात्र गावच्या पाटलांना असतो. इचलकरंजीमध्ये दोन पाटलांची घरे आहेत. थोरले पाटील आणि धाकले पाटील.
या दोन्ही पाटलांची बैले या कर तोडीच्या कार्यक्रमात सहभागी असतात.
गावभागातील महादेव मंदिरपरिसरात चावडीजवळ करी उभारली जाते. राजवाडा चौकातुन पाटलांचे मानाचे बैल धावत सुटतात. रस्त्याच्या दोन्ही साईडला हजारो नागरिक हा सोहळा पाहण्यासाठी उभे असतात.

फोटो सौजन्य: अप्पा चौगुले जयसिंगपूर

दोन्ही पाटलांच्या बैलापैकी ज्याचा बैल पहिल्यांदा करी वरून उडी मारून पलीकडे पोहचतो तेव्हा कर तोडण्याचा कार्यक्रम पार पडतो.
आता यातही एक गंमत आहे. इथल्या शेतकऱ्यांची एक समजूत आहे,

“जर थोरल्या पाटलांच्या बैलाने कर तोडला तर त्यावर्षी पाऊस कमी पडतो आणि जर धाकट्या पाटलांच्या बैलाने कर तोडला तर त्यावर्षी पाऊस चांगला होतो.”

फोटो सौजन्य: अप्पा चौगुले जयसिंगपूर

खरं खोटं माहीत नाही पण शेजारपाजारच्या खेड्यातून अनेक शेतकरी उत्सुकतेने हा उत्सव पाहायला इचलकरंजीला येतात.

इचलकरंजीचे दूरदृष्टीचे राजे नारायणराव घोरपडे यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून गेल्या शतकात ही परंपरा सुरू केली. जनावरांच्या वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या व बेंदूराची सांगता कर तोडण्याने केलं जाऊ लागलं
संस्थाने खालसा झाल्यावर गावातल्या लोकांनी बेंदूर उत्सव समिती स्थापन करून ही परंपरा जपली.
माजी खासदार कल्लापा आवाडे, गणपतराव जोंग, बंडू शांतप्पा मगदूम या प्रगतिशील शेतकऱ्यांनी एकविसाव्या शतकातही त्याच उत्साहात हा उत्सव सुरू ठेवला आहे.

मात्र शंभर वर्षांहुन मोठी परंपरा असलेला हा कार्यक्रम या वर्षी रद्द करण्यात आला.

जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे , कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमाव एकत्र येऊ नये व संसर्ग वाढू नये म्हणून यावर्षी बेंदूर समितीने पाटलांच्या परिवाराला विनंती केली आणि हा कर तोडण्याचा कार्यक्रम थांबवला.

काल रविवारी हा कर्नाटकी बेंदूर सण होता. समितीच्या वतीने दोन्ही पाटील कुटुंबीयांचा सकाळी सत्कार केला, केवळ पारंपरिक पद्धतीने दोन्ही बैलांची पूजा केली व प्रतिकात्म रित्या उत्सव पार पाडला.

फोटो सौजन्य: अप्पा चौगुले जयसिंगपूर

फक्त इचलकरंजीच नाही तर अनेक ठिकाणी साधेपणाने बैलांची पूजा करून बेंदूर हा सण शेतकऱ्यांनी साजरा केला.
फोटो सौजन्य: अप्पा चौगुले जयसिंगपूर

Leave A Reply

Your email address will not be published.