कारसेवा म्हणजे काय? उत्तर सापडतंय अमृतसरच्या सुवर्णमंदिराच्या निर्माणामध्ये !

आज अयोध्येमध्ये राममंदिराचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. गेली अनेक शतके राम मंदिरासाठी सुरु असलेला संघर्ष संपुष्टात आला. रामजन्म भूमीसाठी झालेल्या आंदोलनात लाखो कारसेवकांनी दिलेलं बलिदान यशस्वी झालं असं म्हटल गेलं.

पण अनेकांना प्रश्न पडतो हे कारसेवक म्हणजे काय?

याचं उत्तर कोणत्याही पुराणात नाही तर शीख गुरुग्रंथ साहेब यात सापडेल.

गोष्ट आहे सोळाव्या शतकातली. अमृतसरमध्ये सुवर्णमंदिराचे निर्माण होत होतं. याच काळात मुघल बादशाह जहांगीर यांच्या मुलाने खुसरोने त्याच्या विरुद्ध बंड केला होता. शिखांचे पाचवे गुरु अर्जनसिंग यांनी या खुसरोला पैशांची मदत केली आहे ही शका घेऊन जहांगीरने त्यांच्या वर हल्ला केला. त्यांना पकडले.

खुसरोला बंड करण्यासाठी मदत केली या कारणामुळे छळ केला. त्यांच्यावर धर्मांतर करण्याचा दबाव आणला, त्यांनी याला नकार दिल्यावर त्यांची क्रूरपणे हत्या केली. 

अर्जन सिंग यांचा चौदा वर्षांचा मुलगा सहावे शीख गुरु हरगोविंद यांना देखील जहांगीरने ग्वाल्हेरच्या किल्ल्यात तुरुंगात टाकले होते. त्यांच्या कडे जहांगीर दंड भरण्याची मागणी करत होता. गुरु हरगोविंद यांच्या जवळ पैसा नव्हता.

गुरु हरगोविंदसिंग साहेब यांनी अनेक वर्ष तुरुंगात काढले.

जहांगीरची लाडकी बायको बेगम नुरजहा ही महान सूफी फकीर मीयांमीर यांची भक्त होती. मियांमीर हे गुरु अर्जन सिंग यांचे अनुयायी होते. त्यांचा गुरु पंथावर विश्वास होता. नूरजहाँ मार्फत त्यांनी जहांगीरला गुरु हरगोविंद यांना सोडवायचा आदेश दिला.

जहांगीरने देखील कारावासात गुरु हरगोविंद यांचे सदाचारी वर्तन पाहिलं होतं. यांच्या  आपल्या गादीला कोणताही धोका नाही हे ओळखल्यावर त्याने गुरूंची सुटका केली. फक्त इतकेच नाही तर गुरूंच्या सोबत ५२ राजांना देखील सोडल.

यामुळे गुरु हरगोविंद यांना बन्दी छोड़ दाता अस म्हटल जातं.

जेव्हा गुरु हरगोविंदसिंग अमृतसरला परत आले तेव्हा त्यांनी सुवर्णमन्दिर परिसरात हरमंदिरसाहेबच्या समोर अकाल तख्त बांधण्यास सुरवात केली.

अकाल तख्त म्हणजे अनंतकाळचे सिंहासन. इथून शिखांचे धार्मिक प्राधिकरण चालते. शिखांचे सर्वोच्च स्थान म्हणजे अकाल तख्त.

अस सांगितल जात की एकदा मुघल बादशाह जहांगीर अमृतसरला आला होता. गुरु हरगोविंदसिंग यांचा त्याच्यावर चांगलाच प्रभाव पडला होता. त्याने अकाल तख्तच्या बांधकामासाठी मदत करण्याचा प्रस्ताव हरगोविंद सिंग यांच्या समोर ठेवला. तेव्हा त्याला नम्रपणे नकार देत हरगोविंद सिंग म्हणाले,

“अकाल तख्त का निर्माण उसके अनुयायी के कारसेवा से ही होना चाहिये.”

निस्वार्थ भावनेने मन्दिर उभारण्यासाठी आपल्या हातानी केलीली सेवा म्हणजे कारसेवा.   

संस्कृत मधल्या करचा पंजाबी भाषेत अपभ्रंश होऊन ‘कार’ बनला आहे. शीख धर्मस्थळाला गुरुद्वारा हे नाव देखील हरगोविंदसिंग यांनी दिले. त्यांच्या काळात अनेक लोक शीख धर्माचे पालन करू लागले. कित्येक गुरुद्वारे उभा राहिले. यासाठी अनेकांनी कार सेवा केली.

जालियानवाला बाग हत्याकांडानंतर क्रांतिकारी उधमसिंग यांनी तिथे कारसेवा केली होती.

आजही कारसेवेची परंपरा शीख धर्मामध्ये पहावयास मिळते. शिखांच्या गुरुद्वारा येथे पुष्कळ लोक ही “कार” सेवा करतात, किंवा करायला जातात. लंगर (प्रसादाचे) जेवण तयार करणे, साफ सफाई करणे, भांडी घासणे, जेवण वाढणे, जोडे सांभाळणे किंवा पॉलिश करणे वगैरे कामे “कार” सेवे मधे समाविष्ट असतात

राम मंदिर निर्माण हे देखील एकदोघांच्या प्रयत्नातून होणार नव्हते तर याच्या निर्माणासाठी अनेकांच्या श्रमदानाची गरज होती.

बाबरीच्या विवादित जागेवर रामजन्मभूमीची सेवा करण्यासाठी विश्व हिंदू परिषद व अन्य हिंदुत्ववादी संघटना यांनी कारसेवक अयोध्येला नेण्यास सुरवात केली. यात स्त्री-पुरुष, लहान थोर या सगळ्यांचा समावेश होता.

पुढे भारतीय जनता पक्षाच्या लालकृष्ण अडवाणी यांनी रथ यात्रा करून देशभरातून लोकांना जागृत केले व त्यांनी छेडलेल्या आंदोलनादरम्यान हजारो कार्यकर्ते कारसेवक बनले. लाखोंच्या संख्येने बस,गाड्या रेल्वे भरून कारसेवक अयोध्येला जाण्याची लाट निर्माण झाली.

भारताचे माजी संरक्षण मंत्री कै. मनोहर पर्रीकर देखील त्याकाळी आपल्या सोबत शेकडो कारसेवकांना घेऊन अयोध्येत आले होते व त्यांच्यावर लाठी हल्ला झाला होता.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारसेवा करण्यासाठी आपण अयोध्येला गेलो होतो व तिथे पोलीसांच्या गोळीबाराचा सामना करावा लागला होता अशी आठवण सांगितली आहे.

पोलिसांनी जबरदस्तीने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला मात्र ६ डिसेंबर १९९२ रोजी कारसेवकांनी बाबरी मशीद पाडली. यानंतर कारसेवक हा शब्द सर्व ठिकाणी चर्चेत आला. अनेकदा हा शब्द नकारात्मकपण वापरला गेला. मात्र कारसेवा म्हणजे निस्वार्थीपणे केलेलं श्रमदान हे आजच्या पिढीला समजावून सांगण्याची वेळ आली.

हे ही वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.