छत्रपतींची नातसुन जिजाबाईंनी शेवटपर्यंत करवीर राज्यावर पेशव्यांचे वर्चस्व येऊ दिले नव्हते.

छत्रपतींच्या भोसले घराण्यात अनेक कर्तबगार पुरुष निर्माण झाले पण त्या घराण्यात काही स्त्रिया देखील कर्तबगार निघाल्या होत्या. त्यातल्याच म्हणजे राजमाता जिजाबाई, महाराणी ताराबाई, महाराणी येसूबाई.  राजमाता जिजाबाई या तर शिवछत्रपतींच्या आई. पण त्याच नावाची आणखी एक स्त्री महाराणी जिजाबाई भोसले घराण्यात १८ व्या शतकात उदयास आली होती.  त्या इतिहासात तशा अज्ञातच आहेत.

या महाराणी जिजाबाई कोण?

शिवछत्रपतींचे दोन पुत्र म्हणजे संभाजी महाराज व राजाराम महाराज. संभाजी महाराजांनंतर राजाराम महाराज मराठ्यांचे छत्रपती बनले. याच वेळी म्हणजेच १६८९ साली संभाजी महाराजांची राणी येसूबाई व पुत्र शाहू राजे मोगलांची कैदी बनले.

त्यानंतर १७०० सालात राजाराम महाराजांचा मृत्यु घडून आला. राजाराम महाराजांना दोन मूल होते. महाराणी ताराबाईंच्या पोटी जन्मलेले शिवाजी महाराज आणि राजसबाई यांच्या पोटी जन्मलेले संभाजी महाराज. राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर ताराबाईंनी आपला पुत्र शिवाजी महाराज यांना गादीवर बसवलं आणि १७०० ते १७०७ पर्यंत हिंदवी स्वराज्याचा कारभार सांभाळला.

पुढे औरंगजेब बादशहाच्या मृत्युनंतर मोगलांच्या कैदेतून सुटून शाहू महाराज स्वराज्यात परतले. त्यांचा व ताराबाईंचा झगडा होऊन त्यांनी साताऱ्यास आपली गादी स्थापन केली. तिकडे पन्हाळ्याला
ताराबाईंनी राजधानी बनवलं आणि वारणेच्या दक्षिणेकडील प्रदेशात आपला अंमल जारी ठेवला. त्यांचे हे राज्य करवीरचे राज्य तसेच कोल्हापूरचे राज्य म्हणून ओळखले जाऊ लागले. १७१४ मध्ये पन्हाळ्यावर क्रांती होऊन ताराबाई व त्यांचे पुत्र सत्ताच्युत झाले आणि त्यांच्या जागी ताराबाईंच्यासोबत राजसबाई व संभाजी महाराज आले.  हे संभाजी राजे , करवीकर संभाजी म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहेत.

या संभाजी महाराजांच्या महाराणी म्हणजे जिजाबाई ज्या शिवछत्रपतींची नातसून व राजाराम महाराजांची धाकट्या सून होत्या.

त्या काळच्या प्रथेप्रमाणे संभाजी महाराजांची एकूण ७ लग्न झाली होती. आणि यात जिजाबाई या चौथ्या क्रमांकाच्या महाराणी होत्या. संभाजी राजांच्या पहिल्या दोन राण्या अकाली मृत्यू पावल्यानंतर संभाजी महाराजांनी जिजाबाईंसोबत लग्न केलं होतं.

जिजाबाई या तोरगलकर शिंदे घराण्यातील नरसोजीराव शिंदे यांच्या कन्या होत्या. जिजाबाईंचा विवाह १७२६ मध्ये घडवून आणला. लग्नाच्या वेळी त्यांचं वय होतं अवघं दहा ते अकरा वर्षांचं. जिजाबाई ह्या सर्व राण्यांमध्ये ज्येष्ठ तर होत्याच, शिवाय त्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाच्या होत्या म्हणूनच त्यांनी त्यांच्या बुद्धी चातुर्याच्या जोरावर पुढे संभाजी महाराजांच्या कारभारात महत्व प्राप्त केलं होतं.

शिवछत्रपतींनी स्थापन केलेल्या राज्याची दोन भाग पडले होते. ही गोष्ट मराठ्यांच्या दृष्टीने उचित नव्हती. हे दोन्ही भाग पुन्हा जोडले गेले तर मराठी सत्तेचे ऐक्य पुन्हा साधले जाणार होते.

१७४० मध्ये बाजीराव पेशव्याच्या अकाली मृत्यूनंतर पेशव्यांचा आणि भोसले घराण्याचा एक गुप्त करार झाला.

हा करार होताना जिजाबाई देखील तिथे उपस्थित होत्या. हा करार घडवून आणण्यात, आणि वाटाघाटींमध्ये जिजाबाई यांची मुख्य भूमिका होती. शाहू महाराजांनंतर सातारा आणि कोल्हापूर या गाद्या एक होऊन त्यावर संभाजीमहाराजांनी बसायचं हा करार होता.

त्याप्रमाणेच होत होतं पण १७४५ नंतर वारशाचा प्रश्न पुढे येऊ लागला. पेशव्यांचे वारस गादीवर हक्क सांगू लागले. जिजाबाईंचे पेशव्यासोबत सलोख्याचे संबंध होते पण करवीर राज्याच्या जप्तीचा डाव जिजाबाईंनी हाणून पाडला होता.

२० डिसेंबर १७६० रोजी संभाजी महाराजांचे निधन झाले आणि हळूहळू पेशव्याच्या मनातले कटकारस्थान बाहेर येऊ लागले. हालचाली वाढत गेल्या. जिजाबाईंवर आणखी संकट यायला लागली. संभाजी महाराजांचे निधन त्यापाठोपाठ पेशव्यांच्या फौजेची जप्तीसाठी धावणे. अशा सगळ्या संकटावर मात करुन जिजाबाई निर्धाराने उभ्या राहिल्या होत्या.

त्यात कुसाबाईला कन्याप्राप्ती झाली होती. पेशव्यांच्या फौजा परतविण्याच्या युक्तिवादात त्यांनीच  अनेकांना असं लिहिलं होतं कि, निदान कुसाबाई प्रसूत होईपर्यंत तरी थांबावं. पण कुसाबाईला कन्या झाल्यामुळे पेच आणखी वाढू शकतो आणि पेशव्यांचा मार्ग मोकळा होऊ शकतो. म्हणून जिजाबाईंनी कुसाबाईंना मुलगा झाला म्हणून बातमी सगळीकडे पसरवली. राज्याला वारस मिळाला म्हणून राजधानी पन्हाळ्यावर जिजाबाईने उत्सव घडवून आणला होता.

कुसाबाईस पुत्र झाला नाहीं तर खानवटकरांचा पुत्र  दत्तक घेऊन राज्याला वारस द्यावा अशी मरणापूर्वी संभाजी महाराजांची आज्ञा केली होती.

आणि मग जिजाबाईने देखील पुढं म्हटलंय. कुणाचा पुत्र दत्तक घ्यावा ठरवण्याचा अधिकार पेशव्यांचा नाहीये. पेशव्यांनी आणलेल्या अनेक अडचणींवर मात करून जिजाबाईंनी शहाजी भोसले खानवटकर यांचा पुत्र मानकोजीला विधियुक्त दत्तक घेतले. अशाप्रकारे करवीरच्या गादीवर आपल्या मनाप्रमाणे छत्रपती स्थापन करण्याचा हेतू जिजाबाईंनी नाना प्रकारच्या संकटांवर मात करून तडीस नेला.

या सर्वच प्रकरणांमध्ये आणि इतरही प्रकरणांमध्ये त्यांच्या अंगी असणाऱ्या शहाणपण, मुत्सद्देगिरी, कल्पकता, प्रसंगावधान व धाडस या गुणांचे दर्शन झाल्याशिवाय राहात नाही. जिजाबाईंचे राज्य लहान होते आणि तेही विरोधकांनी वेढलेले होते.

तो काळ म्हणजे छत्रपतींचे महत्व मागे पडू लागले व पेशव्यांचे महत्त्व वाढू लागले होते.

अशा परिस्थितीमध्ये जिजाबाईने आपल्या अंगचे लष्करी नेतृत्वाचे गुण दाखवले होते असे उल्लेख इतिहासात सापडतात.

स्वतः स्वार होऊन सैन्याचे नेतृत्व करून जिजाबाईने विरोधकांची ठाणी जिंकून घेतल्याचे उल्लेख तत्कालीन कागदपत्रांमध्ये मिळतात. जिजाबाई केवळ राजवाड्यात बसून कारभार करणाऱ्या बैठ्या राज्यकर्त्या नव्हत्या तर प्रसंग पडला तर तलवार हाती घेऊन त्या सैन्याचे नेतृत्वही करू शकत होत्या. ही गोष्ट छत्रपतींच्या स्त्रियांच्या उज्ज्वल परंपरेला साजेशी अशीच आहे.

त्यांच्याआधी जिजाबाई, प्रसंगी येसूबाई आणि महाराणी ताराबाई या महिलांनी देखील हातात तलवार घेतल्याचे उल्लेख आहेत.

जिजाबाईंच्या धाडसी स्वभाव आणि करारी बाणा दाखवून देणारा एक प्रसंग माहिती हवाच,

एकदा जिजाबाई देवदर्शनासाठी प्रवासाला निघाल्या होत्या. निघण्यापुर्वी आपल्या राज्यकारभाराची व्यवस्था पाहण्याची आज्ञा रामचंद्रपंत अमात्य यांचा पुत्र कृष्णराव अमात्य याला केली. अमत्यास जिजाबाई संबंधी फारसे अगत्य नसल्याने त्याने ‘स्त्री बुद्धी अशाश्वत सबब हे काम आपणाकडून होणार नाहीं” असे उत्तर पाठवले.

या उद्धट उत्तरामुळे जिजाबाई संतापल्या. जिजाबाई यांनी त्याच भाषेत त्याला उत्तर दिलं. “आपण काम न कराल तर मोठी अडचण पडेल असं समजू नये ते काम य:कश्चित कुणबीनिंकडून चालवीता येईल.” असं बोलूनच त्या थांबल्या नाहीत तर त्यांनी आपले म्हणणे खरे करून दाखवण्यासाठी यशवंतराव शिंदे यांच्याकडे राज्य कारभार सोपवून त्यांच्या हाताखाली. गंगु, रंगू, भागू, नागू आणि लिंबू अशा पाच शहाण्या कुणबीणी त्यांनी शिरोळ, आळते, वडगाव, इत्यादी ठाण्यांवर अंमलदार म्हणून नेमल्या. त्या कुणबीनी ही तशा तयारच होत्या.

त्यांनी या ठाण्यांचा कारभार काही दिवस चोख करून दाखवला आणि जिजाबाईंच्या बोलाचे मोल कमी होऊ दिले नाहीं.

नानासाहेब पेशवे या सारख्या सामर्थ्यवान सत्ताधीशाला न जुमानता जिजाबाईंनी आपला हेतू तडीस नेला होता. असा निश्चयी स्त्रीविषयी अशा लोककथा प्रसिद्ध होणेही स्वाभाविक आहे. मग त्या खर्‍या असो खोट्या असोत पण जिजाबाईंच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध रंग दाखवतात हे तितकेच खरे.

जिजाबाईंच्या कामगीरींचे मोजमाप करताना इतिहासकारांना त्यांची ताराबाईंची तुलना करण्याचा मोह होणे स्वाभाविक आहे. त्या दोघीही तशा समकालीन. ताराबाईंना दीर्घायुष्य लाभल्याने यांची जावे त्यांच्या समकालीन बनल्या. जिजाबाईंचा स्वभाव सावधगिरी बाळगून होता, त्यांना माहिती होतं कि, नानासाहेब पेशवा किती धूर्त आहे.  जिजाबाईनी दिलेले स्वराज्यातील योगदान हे आधुनिक महाराष्ट्रात घडून आलेला दूरगामी प्रभाव मानला जातो.

संदर्भ – डॉ. जयसिंगराव पवार (कर्तुत्ववान मराठा स्त्रिया)

हे हि वाच भिडू :

 

1 Comment
  1. Ram Mate says

    मला महाराणी जिजाबाई यांच्या जीवनावर काही पुस्तकं किंवा काही कांदबरी असेल सुचवा

Leave A Reply

Your email address will not be published.