आदिलशाहीत उद्ध्वस्त झालेल्या पुण्यात जिजाऊंनी कसबा गणपतीची स्थापना केली.

पुण्यात मानाचे पाच गणपती आहेत हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. विसर्जनाच्या मिरवणुकीत या गणपतींना मान असतो. सर्वात आधी या पाच गणपतींच क्रमवार विसर्जन होतं आणि मग इतर गणपती. यात सर्वात पहिला मान असतो कसबा गणपतीचा.

कसबा गणपतीचं मानाचा पहिला गणपती असं का हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. चला या गणपतीचा इतिहास शोधू.

गोष्ट आहे सोळाव्या शतकातली. आज आपण पाहतोय ते पुणे शहर इतकं विशाल नव्हतं. पुनवडी नावाचं छोटंसं गाव होतं. शहाजीराजांना जहागीर म्हणून मिळालेलं हे गाव. शहाजी राजानी किती दिवस शाह्यांच्या चाकरी करायच्या म्हणून स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर वचक बसावा म्हणून आदिलशहाने आपला सरदार मुरार जगदेव याला प्रचंड सैन्य देऊन शहाजी राजांची जहागिरी असलेल्या पुण्यावर धाडले. 

मुरार जगदेवने पुण्यात प्रचंड लुटालुट केली. अख्खं पुण जाळून बेचिराख केलं आणि तिथे कसब्यात गाढवाचा नांगर फिरवला. सुलतानाचं सैन्य निघून गेलं तेव्हा संपूर्ण गाव नष्ट झालं होतं. मुरार जगदेवने जमिनीत खोचलेली एक पार त्यावर अडकवलेली चप्पल आणि फुटकी कवडी एवढचं काय शिल्लक राहिलेलं. याचा अर्थ या गावात आता कोणीही राहायचं नाही अथवा कोणतही पिक घ्यायचं नाही.

महाराष्ट्रासाठी ती काळरात्र होती.  सगळा अनागोंदीचा कारभार. कोणीकोणास वाली नव्हता. कधी आदिलशहा, कधी निजाम तर कधी उत्तरेतील मुघल येऊन लुटालूट, रक्तपात करून जात होते.

हे सगळ घडत होत तेव्हा जिजाऊ गरोदर होत्या. त्यांना शिवनेरीवर सुरक्षित हलवण्यात आलं होतं. तिथेच त्यांच्या धाकट्या मुलाचा जन्म झाला. नाव ठेवण्यात आलं होतं, शिवाजी. लाडाने सगळे शिवबा म्हणायचे. महाराष्ट्राची काळरात्र संपवणाऱ्या स्वातंत्र्यसूर्याचा जन्म झाला होता.

शिवबांना घेऊन आईसाहेब जिजाऊ शहाजी राजांकडे दक्षिणेत गेल्या. काही वर्षे तिकडे काढल्यावर त्यानी परत पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला. स्वातंत्र्याची ओढ त्यांना बंगळूरच्या सोन्याच्या पिंजऱ्यात स्वस्थ बसू देत नव्हती. आपल्या लेकराला घेऊन आऊसाहेब पुण्यात परतल्या.

आल्या तेव्हा त्यांना दिसलं गेल्या बारा वर्षात पुण्याची स्थिती ओसाडच आहे. गावात कोण चिटपाखरू नाही, शेत रिकामी पडली आहेत. रानावनात जंगली श्वापदांचा उपद्रव वाढला होता. गाढवाचा नांगर फिरवल्यामुळे पसरलेलं भीतीचं वातावरण कमी झालेलं नाही.

जिजाऊनी कारभार हाती घेतला आणि सगळ बदलायचं ठरवलं. गाव नव्याने वसवायचं ठरवलं. मदतीला फडावरचा कारभार बघायला म्हणून सिंहगडचे किल्लेदार दादोजी कोंडदेव यांची नेमणूक शहाजी महाराजांनी केली होती. त्यांनी झांबरे पाटलांची जागा विकत घेऊन तिथे आऊसाहेब आणि महाराजांच्या वास्तव्यासाठी लाल महाल बांधला.

पुणं पुन्हा वसत होतं. अशातच आऊसाहेबांच्या भेटीला एक गरीब ब्राम्हण आला. विनायकभट ठकार असं त्याच नाव. तो सुद्धा कर्नाटकातून आपल्या कुटुंबासमवेत आला होता. त्याच्या सोबत एक गणेशाची मूर्ती होती. त्याने सांगितलं की दृष्टान्तामधून त्याला ही गणेशाची मूर्ती मिळाली आहे, त्याची आपण प्राणप्रतिष्ठा करावी. काही जण असंही म्हणतात की जिजाऊना दृष्टान्त झाला आणि त्या जागी उकरल्यावर गणपतीची मूर्ती सापडली.

शहर नव्याने उभं करायचं असेल तर गावकऱ्यांच्यामध्ये आत्मविश्वास परत आणणे गरजेचे आहे. त्यासाठी गावात मंदिर असणे गरजेचे आहे, जिजाऊंनी कसब्यात मंदिर बांधून तिथे गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करवून आणली.

फक्त एवढ्यावर त्या थांबल्या नाहीत. ज्या कसब्यात आदिलशहाने गाढवाचा नांगर फिरवला होता तिथे बाळ शिवबाच्या हातून सोन्याचा नांगर फिरवला. ही अभूतपूर्व अशी घटना होती. कोणत्याही अंधश्रद्धेला न जुमानता त्यातून जनतेच्या भल्यासाठी मार्ग काढणे ही मोठी शिकवण आऊसाहेबांनी शिवबाना दिली होती, 

इतकच नाही कोल्हे, लांडगे यासारख्या उपद्रवी जंगली जनावरांच्या बंदोबस्तासाठी इनाम देण्याचं फर्मान काढलं. प्रजेची या कृतीमुळे भीती मोडली. लोक गावात परतून आली. शेतं पुन्हा पिकांनी डोलू लागली. शहर पुन्हा जुन्या वैभवान सजू लागलं.

आजही हे ठकार कुटुंबीय पुण्याचं ग्रामदैवत असणाऱ्या कसबा गणपतीच्या सेवेत आहे. शिवशाही नंतर पेशवाई व त्यानंतरही कसबा गणपतीच्या प्रथम पूजेच्या मानात खंड पडलेला नाही.

राजेमहाराजे आपल्या प्रत्येक स्वारीपूर्वी या गणपतीचे दर्शन घेत असत. म्हणून या गणपतीला ’जयति गणपति’ असे म्हणतात. आजही घरात होणार्‍या मंगल कार्याची पहिली अर्पणपत्रिका या गणपतीपुढे ठेवण्यात येते, आणि लग्नकार्य पार पडल्यावर वधूवरांना लगेचच या गणपतीच्या दर्शनाला आणतात.

१८९३ मध्ये  टिळकांनी विधायक कामासाठी लोक एकत्र यावीत म्हणून सार्वजनिक गणपतीला उत्तेजन दिले. दुसऱ्याच वर्षी पुण्यात शंभर एक गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली. अनंतचतुर्दशीला विसर्जनाच्या मिरवणुकीत मात्र या गणेशोत्सव मंडळानी गर्दी केली. वाद होऊ लागले. यातून मार्ग काढण्यासाठी टिळकांना बोलवण्यात आले. त्यांनी सांगितलं,

“ग्रामदैवत म्हणून पहिला मान कसबा गणपतीचा.”

यानंतर सव्वाशे वर्ष उलटून गेली तरीही टिळकांनी आखून दिलेल्या क्रमानुसार आणि मानानुसार गणेश विसर्जन होते. मानाच्या पहिल्या कसबा गणपती मंडळाच्या गणेशाचे विसर्जन झाल्यावर मगच इतर गणपती विसर्जनासाठी येतात.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.