नरसिंहरावांच्या खंबीरतेमुळे काश्मीरमध्ये अतिरेक्यांच्या ताब्यातून दर्ग्याची सुटका झाली

१५ ऑगस्ट १९४७ ला देश स्वतंत्र झाला, या सोबत पाकिस्तान आणि भारत असे विभाजन झाले. या दरम्यान अनेक गोष्टी विभागल्या गेल्या, ज्यात पाकचा हेतू होता जम्मू- काश्मीरचा आपल्यात समावेश करण्याचा. जो कधी पूर्ण झाला नाही, पण त्यासाठी पाकने कित्येक प्रयत्न केले.

खुल्या कारवाया झाल्या, छुपे हल्ले केले. यातूनच जन्म झाला तो दहशतवादाचा. ज्यांनी घुसखोरी करून किंवा देशात आपलं जाळं पसरवून बऱ्याचदा भारताला झुकवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा प्रयत्न वेळोवेळी फेल गेला. त्यातलंच एक प्रकरण म्हणेज चरार-ए-शरीफ दर्गा. 

हिमालयाच्या पीर पंजाल पर्वतरांगांच्या कुशीत चरार-ए-शरीफ हा दर्गा आहे. १४ व्या शतकातील काश्मिरी सूफी संत शेख नुरुद्दीन वाली यांची पवित्र कबर इथे आहे. मुस्लीम आणि हिंदू या दोन्ही समुदायांचं हे श्रद्धास्थान.

सीमेबाहेरून आलेल्या मस्त गुल या पाकिस्तानपुरस्कृत अफगाणी अतिरेक्याने आपल्या साथीदारांसह १९९४ च्या हिवाळ्यापासून काश्मीरमधील चरार-ए-शरीफ या महत्त्वाच्या धार्मिक स्थळामध्ये घुसखोरी करून आश्रय घेतलेला होता.

 केंद्रात पंतप्रधान नरसिंह राव यांचं सरकार असताना या दहशतवाद्यांना हुसकावून लावण्यासाठी ७ मार्च, १९९५ रोजी सुरक्षा दलांनी चरार-ए शरीफला वेढा घातल्यानंतर दहशतवाद्यांनी प्रतिकारासाठी दर्ग्यामध्ये मोर्चेबांधणी केली. धार्मिक स्थळांची मुक्तता करणं, हे मोठं जोखमीचं काम होतं. 

मात्र हजरतबाल दर्गा प्रकरणाप्रमाणेच याही वेळी प्रशासन आणि सुरक्षा दलांनी संयम राखला. शिवाय हा दर्गा दाट लोकवस्तीच्या भागात असल्यानेही प्रशासनाला काळजीपूर्वक पावलं उचलणं भाग होतं. कारवाईचे मोठे भावनिक पडसाद उमटण्याची शक्यता होती. सुरक्षा दलांनी त्यामुळेच मोठी काळजीपूर्वक ही कारवाई केली.

कारवाईचे ते ६६ दिवस प्रशासन आणि सुरक्षा दलांच्या संयमाची कसोटी पाहणारे ठरले.

हजरतबाल दर्ग्यात आश्रय घेतलेले बंडखोर हे मूलत: काश्मिरी होते, मात्र चरार-ए-शरीफमध्ये ठाण मांडलेले दहशतवादी सीमेबाहेरून आले होते. त्यांचे धागेदोरे पाकिस्तानात होते. रेडिओ यंत्रणेद्वारे त्यांचा पाकिस्तानातील सूत्रांशी संपर्क होता. त्यामुळे प्रशासनाच्या उपाययोजना निष्फळ ठरत होत्या.

मात्र प्रशासनाने ‘wait and watch’ हे धोरण अवलंबलं.  सुरक्षा दलांनी ७ मार्च, १९९५ रोजी त्यांना बाहेर हुसकावण्यासाठी वेढा घातला होता. पण स्वतःहून कुठली कारवाई करत नव्हतं. अखेर दहशतवाद्यांचा संयम सुटला. ८ मार्च, १९९५ रोजी त्यांनी दर्ग्यापासून २०० मीटर अंतरावर असलेल्या इमारतीला आग लावली आणि विस्फोट घडवण्यास सुरुवात केली. 

दर्ग्याचं बांधकाम लाकडी असल्याने त्याने पेट घेतला. अखेरीस सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांवर हल्ले सुरू केले. या हल्ल्यात २० दहशतवादी ठार झाले आणि दर्गा दहशतवाद्यांच्या कब्जातून मुक्त झाला.  तब्बल ६६ दिवसांनी, म्हणजे १०  मे, १९९५ रोजी दहशतवाद्यांच्या कब्जातून या धार्मिक स्थळाची मुक्तता करण्यात सुरक्षा दलाला यश लाभलं.

मात्र, या संघर्षात या दर्ग्याची आणि भोवतालच्या इमारतीची मोठ्या प्रमाणात हानी झाली. या घटनेनंतर दर्ग्याचं आणि गावाचं झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने निधीची तरतूद केली. मात्र पूर्ण संयमाने केलेल्या या कारवाईनंतरही चरार-ए-शरीफ हे पवित्र स्थान भारतीय सुरक्षा दलांनी उद्ध्वस्त केल्याचा प्रचार दहशतवाद्यांनी सुरू केल्यामुळे काश्मीरमध्ये लोकभावना भडकून दंगली पसरल्या. या दंगली आटोक्यात आणण्यासाठी सुरक्षा दलांना बळाचा वापर करावा लागला.

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.