अंदमानच्या बेटाला मराठी मावळ्याचं नाव मिळालंय ज्याच्यामुळे काश्मीरचा भाग भारताला मिळाला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंदमान-निकोबार इथल्या २१ निनावी बेटांना २१ परमवीर चक्र विजेत्यांची नावं देण्याचं घोषित केलं आहे.  

इथल्या या बेटांना अद्याप नावे नव्हती. फक्त अंदमान निकोबार बेटांच्या नावाने ओळखले जात होते. आता त्या बेटांना मिळालेल्या नावांमध्ये मेजर सोमनाथ शर्मा, सुभेदार आणि कॅप्टन करम सिंग, द्वितीय लेफ्टनंट रामा राघोबा राणे, नाईक जदुनाथ सिंग, मेजर शैतान सिंग, कंपनी क्वार्टरमास्टर हवालदार अब्दुल हमीद, लेफ्टनंट कर्नल अर्देशीर बुर्जोर्जी तारापोर, लान्स नाईक अल्बर्ट एकका, मेजर होशियार सिंग, सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल, फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग सेखॉन, मेजर रामास्वामी परमेश्वरन, नायब सुभेदार बाना सिंग, कॅप्टन विक्रम बत्रा, लेफ्टनंट मनोज कुमार पांडे, सुभेदार मेजर संजय कुमार आणि सुभेदार मेजर योगेंद्र सिंह यादव (सेवानिवृत्त) या वीर चक्र विजेत्यांच्या नावावरून या बेटांची नावे देण्यात आली आहेत.

पण या यादीत एक मराठी नाव ठळकपणे दिसून आलं ते म्हणजे – लेफ्टनंट रामा राघोबा राणे !

या निमित्ताने त्यांच्या बद्दल जाणून घेऊया, थेट जाऊया इतिहासात…

ब्रिटीश भारत सोडून गेले पण जाताना फाळणीची भळभळती जखम देऊनच.  भारत पाकिस्तान या दोन्ही देशात काश्मीरला आपल्यात विलीन करून घेण्यासाठी चढाओढ लागली होती. पाकिस्तानने आपल सैन्य घुसवल देखील. बऱ्याच मोठ्या दडपणानंतर राजा हरिसिंग यांनी संस्थान भारतात विलीन करण्यास मान्यता दिली. ते ही अनेक अटी घालूनच.

भारतीय आर्मी काश्मीर मध्ये उतरली. प्राणाची बाजी लावून श्रीनगर ताब्यात घेतलं. हळूहळू पाक अतिरेकी सैन्याला पळवून लावण्यात आलं. त्यातच नेहरूंनी प्रश्न युनोत नेला आणि त्यांनी विषय जैसे थे  थांबवण्यास सांगितलं. एक तृतीअंश काश्मीर पाकच्याचं ताब्यात राहिला. 

लाईन ऑफ कंट्रोल हीच सीमारेषा बनली. तरी कित्येक महिने या सीमा शांत नव्हत्याच. जखमी वाघाप्रमाणे खवळलेले पाकिस्तानी काश्मीर मिळवण्यासाठी जीव तोडून प्रयत्न करत होते. सर्वात जास्त काळ चाललेले हे भारत पाक युद्ध होते.

एप्रिल १९४८. राजौरी

पाकिस्तानी फौजा सध्याच्या नियंत्रण रेषेपासून २४ किमीपर्यंत आत आल्या होत्या. त्यांना हुसकावण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु होते.  भारताने गमावलेले एकएक गाव जिंकत आपली आर्मी पुढे सरकत होती. या युद्धात मुख्यतः रणगाड्यांचा वापर आर्मीकडून केला जात होता.

८ एप्रिल १९४८ रोजी चौथ्या डोग्रा बटालियनने राजौरीवर कब्जा मिळवला. त्याच्यापुढे असणारा बरवाली पुलदेखील ताब्यात आला. पण यापुढे भारतीय रणगाड्यांना चढाई अशक्य होती. कारण पळपुट्या पाकसैन्याने रस्त्यात भूसुरुंग पेरून ठेवले होते.

राजौरी ते नौशेरा जुना मुघल कालीन रस्ता. दोन्ही साईडला प्रचंड मोठे पर्वत आणि मधून जाणारा हा अरुंद नागमोडी मार्ग सामरिकदृष्ट्या अतिमहत्त्वाचा होता.पाकिस्तानी सैन्याने जागोजागी रणगाडाविरोधी भूसुरंग पेरले तर होतेचं शिवाय मोक्याच्या जागी दबा धरून भारतीय सैन्याची वाट पहात होते. हा रस्ता मोकळा केला नाही तर राजौरी आपल्या हातून घालवण्यासारखे होते. 

अतिशय कठीण अशी ही जबाबदारी सोपवण्यात आली एका मर्द मराठी मावळ्याला. सेकंड लेफ्टनंट रामा राघोबा राणे

लेफ्टनंट राणे यांच्या इंजिनीअर्स रेजिमेंटच्या बॉम्बे सॅपर्स या तुकडीला हा रस्ता मोकळा करण्याचे काम सोपविण्यात आले होते. सकाळी १०वाजता राणेनी स्वतः आघाडीवर राहून या मोहिमेला सुरवात केली.

खाली जीवघेणे भूसुरुंग वरून भाजून काढणारा पाकिस्तानी मशीनगणचा मारा.

राणेंच्या तुकडीतील जवान पुढे सरपटत निघायचे, बॉम्ब सापडला तर लगेच त्याला निकामी केलं जात होतं. त्यांच्या पाठोपाठ इतर फौज आणि रणगाडे. दिवस रात्र हा रस्ता मोकळा करणे सुरूच होतं. अतिशय जोखमीच काम होते. हातपाय सोलपटून जात होते. शिवाय मृत्यूची टांगती तलवार डोक्यावर होतीच. संयमाची परीक्षाचं बघितली जात होती. पण चिवट मराठी वीरांनी हार मानली नाही.

बॉम्बे सॅपर्स तुकडीतील दोघे हुतात्मा झाले. स्वत: राम राणे यांच्यासह पाच जण जखमी झाले. पण काम थांबलं नाही.  पुढील बारा तासात या शूरजवानांनी रणगाड्यांसाठी वेगळा व सोपा रस्ता तयार केला. शत्रूच्या माऱ्यातच हे काम सुरु होते. 

१० एप्रिल रोजी जखमी अवस्थेतील राणे यांनी पहाटे उठून पुन्हा रणांगणाची वाट धरली. मशीनगनचा मारा आणि सुरुंगांचे स्फोट होत असताना त्यांनी रणगाड्यांच्या वाटेत पडलेली पाच देवदाराची झाडे बाजूला केली. रणगाडे येथून पुढे गेल्यावर अजून एक अडथळा त्यांच्या समोर आला. याभोवतालच्या टेकड्यांवर दबा धरून बसलेल्या पाकड्यानी मारा सुरु केला होता.

अखेर राणे स्वतः एका रणगाड्यात बसून पुढे गेले व भीषण गोळीबार होत असताना रणगाड्याची आस घेउन त्यांनी अडथळ्यास सुरुंग लावून फोडून काढले व चौथ्या डोगरा बटालियनची वाट मोकळी केली.

रामा राणेंच्या टीमने केलेल्या बहादुरीमुळे  काश्मीरचा हा महत्वाचा भाग भारताच्या ताब्यात आला. हजारो पाक सैनिकांना तेथून हुसकावून लावण्यात यश आलं. त्यांच्या या पराक्रमाची चर्चा सर्वत्र झाली. खुद्द राष्ट्रपती राजेंद्रबाबू यांच्या हस्ते त्याना सर्वोच्च परमवीरचक्र हा बहुमान देण्यात आला.

या परमवीराचा जन्म २६ जून १९१८ रोजी कारवार जिह्यातील हावेरी गावी झाला. त्यांचे वडील पोलीस नोकरीमध्ये होते. रामा राणे यांना बालपणापासून देशप्रेमाने भारावून टाकलेले होते. खरे तर गांधीजीनी सुरु केलेल्या  असहकार आंदोलनात त्यांना भाग घ्यावयाचे होते. पण त्यांच्या वडिलांनी त्यांना देशासाठी काही करावयाचे आहे तर सैन्यात जा असा सल्ला दिला. हा सल्ला शिरोधार्ह मानून रामा राणे आर्मीमध्ये शिपाई म्हणून भरती झाले. त्यांनी पराक्रमाने नायक, हवालदार ही पदे मिळवून किंग कमिशन मिळवले आणि ते सेकंड लेफ्टनंट पदावर पोहोचले.

सगळय़ांना अभिमान वाटेल असे स्वातंत्र्योत्तर काळातील ५वे परमवीरचक्र रामा राणे यांनी जिवंतपणे मिळवले. त्यांचे हे परमवीरचक्र पुण्यातील ‘बॉम्बे सॅपर्स’च्या संग्रहालयात आजही ठेवण्यात आलेले आहे. 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.