चीनच्या पंतप्रधानांना मारण्यासाठी एअर इंडियाच्या विमानात टाईमबॉम्ब ठेवण्यात आला होता

गोष्ट आहे १९५५ सालची. इंडोनेशियाच्या जकार्तामध्ये आफ्रिकन आणि आशियाई देशांचे पहिले बांडुंग कॉन्फरन्स भरणार होते.

भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे विकसनशील देशांच्यामध्ये ऐक्य निर्माण करण्याच्या खटपटीमध्ये होते. त्यांचाच आग्रह म्हणून ही कॉन्फरन्स इंडोनेशिया मध्ये होत होती.

चीन तर्फे त्यांचे पंतप्रधान चाऊ एन लाय या परिषदेमध्ये सहभागी होणार होते.

पण या कॉन्फरन्सला जाण्यासाठी चीनच्या पंतप्रधानांकडे चांगले विमानच नव्हते. नुकताच स्वतंत्र झालेल्या चीनची परिस्थिती खूपच कमजोर होती. भारताने स्वातंत्र्यानंतर टाटांच्या एयर इंडियाचे राष्ट्रीयीकरण केल्यामुळे आपल्याकडे अनेक अत्याधुनिक विमाने होती.

चीनने भारताकडे आपल्या पंतप्रधानांना इंडोनेशियाला नेण्यासाठी विमानाची मागणी केली.

आदर्शवादी मोठ्या भावाच्या स्वप्नात दंग झालेल्या नेहरूंनी एयर इंडियाचे कश्मीर प्रिन्सेस हे विमान त्यांना घेण्यासाठी पाठवून दिले.

११ एप्रिल १९५५ रोजी मुंबईहून हाँगकाँग विमानतळावर आलेले काश्मीर प्रिन्सेस विमान चीनच्या पंतप्रधानांची वाट पाहत ताटकळले होते.पण बराच वेळ ते आलेच नाहीत.

नंतर माहिती मिळाली की त्यांच्या पोटात दुखत असल्यामुळे ते कॉन्फरन्सला येणार नाही आहेत.

काश्मीर प्रिन्सेसने पहाटे ४ वाजता उड्डाण केलं.

विमानात काही चिनी अधिकारी, व्हिएतनामचा प्रतिनिधी आणि काही पत्रकार होते. या पत्रकारांमध्ये काही जण चीनचे तर काही ऑस्ट्रिया, पोलंड या देशातले होते.

सोबतच एक हॉंगकॉंग मधला कम्युनिस्ट पार्टीचा माजी सेनाधिकारी सुद्धा होता. तो चाऊ एन लाय यांचा जवळचा मित्र होता.

विमानाचे मुख्य पायलट होते कॅप्टन डी.के.जातार, कोपायलट एम.सी.दीक्षित, ग्राउंड मेंटेनन्स इंजिनियर अनंत कर्णिक आणि नेव्हीगेटर जे.सी.पाठक हे होते. हवाई सुंदरी ग्लोरिया बेरी या होत्या.

साधारण नऊच्या दरम्यान विमान इंडोनेशियाच्या जवळ पोहचले होते

इतक्यात इंजिनियर अनंत कर्णिक याना विमानाच्या तिसऱ्या इंजिनमधून आगीचा धूर येताना दिसला. वेगाने खबरदारीचे उपाय घेतले जाऊ लागले.

इतक्यात एक स्फोटाचा मोठा आवाज आला.

काश्मीर प्रिन्सेसचे तीन तुकडे होऊन ती दक्षिणचीनी समुद्रात विलीन झाली.

कर्णिक, पाठक आणि दिक्षित हे तिघे इंडोनेशियन कोस्टगार्ड यांना एका बेटाजवळ सापडले, उरलेल्या १६ जणांचा मृत्यू झाला होता. कॅप्टन जातार हे संधी असूनही कॉकपिट मधून आपल्या वैमानिकांच्या जागेवरून हलले नव्हते.

त्यांना वाचवण्यासाठी गेलेली हवाईसुंदरी ग्लोरिया बेरी या देखील मृत्यूमुखी पडल्या.

भारताच्या विमान इतिहासातील ही पहिलीच मोठी दुर्घटना होती. चीनच्या पंतप्रधानांना घेऊन जाणाऱ्या विमानातच बॉम्बस्फोट झाल्यामुळे सगळं जग हादरल होतं.

अमेरिकन सीआयए आणि तैवानच्या गुप्तचर संघटनेने घडवून आणलेला हा डाव आहे असा चीनने आरोप केला.

भारतिय विमानात स्फोट झाल्यामुळे नेहरूंनी आपला सर्वात कर्तबगार गुप्तहेर रामनाथ काव यांना तपासासाठी पाठवून दिलं. पुढे जाऊन रॉ ची स्थापना करणाऱ्या काव यांनी वेगाने तपास करून बॉम्बस्फोटाचे सगळे धागेदोरे खणून काढले.

तैवानी गुप्तहेरांनी चीनच्या पंतप्रधानांना मारण्यासाठी विमानात टाईमबॉम्ब फिट केला होता.

स्वतः चाऊ एन लाय यांनी काव यांचं कौतुक केलं.

पन प्रश्न उरला की ऐनवेळी चीनचे पंतप्रधान विमानात का बसले नाहीत?

अशी शक्यता मांडली गेली की त्यांना या बॉम्बस्फोटाची खबर आधीच लागली होती आणि म्हणून त्यांनी आपला दौरा रद्द केला. पण जर माहिती होती तर विमान कॅन्सल करणे जास्त संयुक्तिक ठरले असते.

या दुर्घटनेत भारतीय पायलट, एयरहोस्टेस यांच्या सह १६ जण मृत्यूमुखी पडले होते. खुद्द चायनीज अधिकारी, पत्रकार यांचाही समावेश होता. पण पाषाण हृदयी चिनी पंतप्रधानांनी त्यांनाही वाचवले नाही.

भारतातर्फे जातार, ग्लोरिया बेरी, कोपायलट दीक्षित,अनंत कर्णिक, पाठक यांना अशोक चक्र देऊन सन्मानित करण्यात आलं. ज्या मासेमाऱ्यानी तिघा भारतीयांना वाचवलं त्यांचाही सन्मान करण्यात आला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.