कलम ३७० रद्द केलं पण आजही काश्मिरी पंडितांना काश्मीर सोडून जावं लागतंय…

१९९० च्या दशकात काश्मीर खोऱ्याने भयंकर अशांतता, दहशत अनुभवली. हिंदू, शीख आणि काश्मिरी पंडितांना तिथून निर्वासित होऊन अन्यत्र घर करावं लागलं. आता २०२१ उजाडलं तरी पंडित त्यांच्या मूळ घरी परत जाऊ शकलेले नाहीत.

हल्लीच काश्मिरी पंडित संघर्ष समिती चे अध्यक्ष संजय टिकू यांनी सांगितलंय कि, “बडगाम, अनंतनाग, आणि पुलवामा सारख्या अन्य भागातून ५०० पेक्षा जास्त लोकांनी पलायन सुरु केले आहे. काही गैर काश्मिरी पंडित कुटुंब सुद्धा काश्मीर सोडून निघून गेले आहेत.”

संजय टिकू यांच्या विधानामुळे परत एखादा काश्मिरी पंडितांचा विषय चर्चेत आला आहे. कलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मिरी पंडित निर्भयपणे पुन्हा आपल्या काश्मीर मध्ये परतू  शकतील.घरवापसी करु शकतील, असं सांगण्यात येत होतं.

३७० रद्द केल्याने काश्मिरी पंडित यांच्यावर त्याचा काय परिणाम झाला हे आपण जाणून घेऊया. पण त्याआधी हे समजून घेणं महत्वाचं असेल कि काश्मिरी पंडितांनी कोणत्या कारणांसाठी काश्मीर सोडले. असं काय घडलं होतं ज्यामुळे त्यांना काश्मीर सोडावं लागलं

पलायन करणाऱ्या काश्मिरी पंडित यांच्याकडून असं सांगण्यात येत की. 19 जानेवारी 1990 चा दिवस होता. त्या रात्री काश्मिरातल्या मशिदींनी त्यांच्या लाउडस्पीकर्सवरून घोषणा केली, काश्मिरी पंडितांपैकी पुरुषांनी काश्मीर खोऱ्यातून निघून जावं आणि त्यांच्या बायकांना मागे ठेवावं. पाकिस्तानचा पाठिंबा असलेल्या मुस्लिमांनी त्या दिवशी काश्मिरातल्या रस्त्यांवर आझादीच्या घोषणा दिल्या. यंत्रणा कोलमडून पडली होती.

या सगळ्या गोंधळाच्या स्थितीत काश्मिरी पंडितांमधल्या काही प्रमुख व्यक्तिमत्त्वांना लक्ष्य करून त्यांची हत्या करण्यात आली. टिका लाल टपलू यांच्यासारख्या राजकीय नेत्यापासून न्यायाधीश नीलकंठ गांजू यांच्यापर्यंत, दूरदर्शनचे लास्सा कौल यांच्यापासून लेखक सर्वानंद कौल प्रेमी यांच्यापर्यंत अनेकांचा त्यात समावेश होता. ज्या काश्मिरी पंडितांची हत्या करण्यात आली, त्यापैकी बहुतांश जणांच्या हत्येची जबाबदारी जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटने (JKLF) स्वीकारली.1990 पासून चार लाखांहून अधिक काश्मिरी हिंदूंना (Kashmiri Hindus) जबरदस्तीने काश्मीरबाहेर पडावं लागलं.

कलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मिरी पंडित अनेक दृष्टीने फायदा होईल असं सांगण्यात येतं होतं  ते कितपत सत्यात उतरलय. हे आता आपण हे बघूया…

जम्मू-काश्मिरात कलम ३७० हटवण्यास दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. तसेच राज्याचा विशेष दर्जाही काढण्यात आला व राज्याची दोन केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये विभागणी करण्यात आली. तेव्हा म्हटले गेले की, राज्यात शांतता व समृद्धी येईल. तसेच खोऱ्यात काश्मिरी पंडितांच्या परतण्याचा मार्ग मोकळा होईल. मात्र पंडितांचा दावा आहे की, सरकार खोऱ्यात त्यांना परत आणण्यात अपयशी ठरले आहे.

काश्मिरी पंडितांच्या हक्कासाठी लढणारी संघटना रिकॉन्सिलेशन रिटर्न अँड रिहॅबिलिटेशन ऑफ मायग्रेंट्सचे अध्यक्ष सतीश महालदार सांगतात, पंडितांना पुन्हा खोऱ्यात आणण्यात सर्व सरकारे अपयशी ठरली. नुकतेच प्रशासनाने खोऱ्यात ६ हजार पंडितांना रोजगार देण्याचे सांगितले. हे खोटे आहे, कारण हे पुनर्वसनाशी संबंधित नाही.

काश्मिरी पंडितांना काश्मिर मध्ये कशाप्रकारे पुनर्वसन करण्यात येईल.यावर अनेक मते तयार झाली होती.पनून काश्मीर संघटनेचे अध्यक्ष डॉ. अग्नीशेखर यांनी पुनर्वसनाचा मार्ग सुचवताना सांगितले कि,

“काश्मिरी पंडितांना पुन्हा खोर्‍यात नेण्यासाठी केंद्र शासनाने श्रीनगर किंवा त्याच्या जवळपास एखादे स्वतंत्र शहर वसवावे. देशभरातून येणार्‍या पंडितांना तेथे राजकीय आणि प्रशासकीय अधिकार द्यावेत. मतदानाचा हक्क मिळावा,”

३७० रद्द झाल्यानंतर काश्मीर मध्ये कोणता बदल झाला हे सांगताना तेथील लोक सांगतात कि,

काश्मिरात दगडफेक व संपाच्या घटनांमध्ये घट झाली आहे मात्र हिंसाचार थांबत नाहीये. रोज सुरक्षा दल आणि अतिरेक्यांमध्ये चकमक होते. २०२० मध्ये वेगवेगळ्या चकमकींमध्ये २२५ अतिरेकी मारले गेले तर ६० सुरक्षा कर्मचारी शहीद झाले. २०१९ मध्ये १४८ अतिरेकी मारले गेले होते. यंदा जूनपर्यंत ५८ काश्मिरी तरुण अतिरेकी झाले जे सुरक्षा यंत्रणांसाठी चिंतेचा विषय आहे. इकडे, काश्मीर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने त्यांच्या अहवालात म्हटले आहे की, फक्त काश्मीर क्षेत्रातच पाच लाख रोजगार घटले आहेत. येथील अर्थव्यवस्थेचे सुमारे १७८०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

काश्मीर मध्ये काश्मिरी पंडितांच पुनर्वसन करण्यासाठी आज काश्मीर मध्ये सुरक्षिततेचे वातावरण सध्या तरी तयार झालेले नाही. त्यामुळे काश्मिरी पंडितांना घरवापसी करण्यासाठी अजून तरी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल असंच दिसतंय.

काश्मिरचे मुख्य शहर श्रीनगर अजूनही काटेरी तारा, तपासणी नाके आणि सशस्त्र सैनिकांनी घेरलेले आहे. काश्मिर ची पूरस्थिती लवकरात लवकर सुधरावी व तिथं शांतता, सौख्य, नांदावं एवढीच काय ती प्रत्येक भारतीयांची इच्छा आहे.

हे ही  वाच भिडू  :

Leave A Reply

Your email address will not be published.