रिलीफ कॅम्पमध्ये वाढलेल्या काश्मीरी पंडितांचं खरं जग कसं होतं?
मी नवीन पंडित, माझा जन्म २ डिसेंबर १९९० रोजी नगरोटा (जम्मू) येथील काश्मिरी पंडित migrant camp मध्ये एका टेंटमध्ये झाला. १९८९/९० च्या दरम्यान माझे कुटुंब हजारो काश्मिरी पंडित कुटुंबांप्रमाणे इथे जम्मू migrant camp मध्ये आले, मला त्याच्या डिटेल्समध्ये जायचं नाही.
आमच्यासारखेच अनेक काश्मिरी पंडित जम्मूला आल्यानंतर माझ्या कुटुंबाला नगरोटा येथील relief camp बद्दल कळले.
मग माझे आजी आजोबा , काकू आणि काका आणि माझ्या आई-वडिलांबरोबर मी जम्मूला पोहोचले. माझे वडील काश्मीरमधील आमच्या घरापासून दूर माझ्या आईकडे राहत होते. काही महिन्यांनंतर ते तेथे आले, माझी आई गरोदर होती (मी तिच्या पोटात होतो).
टेंटमध्ये माझे आईवडील आणि आमचं अख्खं ७ लोकांच कुटुंब एकत्र राहायचं, मग माझा जन्म झाल्यावर आम्हाला त्याच कॅम्पमध्ये ओआरटी(वन रूम टेनन्मेंट/ छोटी खोली) भाड्याने मिळाली, एक छोटं स्वयंपाक घर, बाहेर छोटीशी खोली आणि सिमेंटचं छत आणि अशी एका ओळीत सलग दहा घरे, आणि वीस खोल्यांसाठी एकाच संडास बाथरूम, ट्रेन सारखं दिसायचं ते सगळं.
मी तिथेच मोठा झालो, आयुष्य कधी सामान्य नव्हत पण तरीही आम्ही आपल्या मायभूमीवर परत जाऊ या आशेने आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न केला.
माझा जन्मच या कॅम्पमध्ये झाल्यामुळे मला काश्मीर बद्दल काही माहित नव्हते, ना आमच्या तिथल्या ऐश्वर्याची आणि काश्मीरच्या सौंदर्याची कल्पना नवह्ती. मी माझ्या आई-वडिलांकडून आजोबांकडून माझ्या शेजार्यांकडून काश्मीरमध्ये काय काय आहे हे ऐकत मोठा झालो.
अखेरीस, मी शालेय शिक्षण सुरू केले, माझी आई अद्याप सुशिक्षित नाही माझ्या आईला काश्मिरी हिंदीपण फार येत नाही कारण तिला लग्न करून काश्मीरला बाबांकडे येऊन काही महिनेच झाले होते.(हिंदी बोलण्याची काश्मिरी पद्धत फारच वेगळी आहे)
शाळेतील दिवस खूप कठीण होते. शिक्षक आणि बाकी विद्यार्थी भेदभाव करायचे.
आम्ही काश्मिरी पंडित म्हणून कोणी शिवायचे देखील नाही, मला आठवतसुध्धा नाही कि कधी मी इतर मुलांच्यात बसून डबा खाल्लाय न त्यांच्यात कधी खेळलोय.
आम्हाला सहसा ‘काश्मिरी लोला’ म्हणून संबोधले जात असे. आम्हाला या नावाची सवय झाली आहे.
शाळेतले दिवस फार आठवणीत राहावेत इतके छान नाहीत पण काही आठवणी आहेत लक्षात राहण्या सारख्या. आमच्या कॅम्पचे नाव गावाच्या नावावरून ‘नगरोटा कॅम्प’ पडले.
यात अनेक विभाग, नगरोटा कॅम्प, झरी कॅम्प, इंदिरी कॉलनी, एएमडी रेल्वे छावणी. कॅम्प मध्ये दोन खेळाची मैदाने होती, तिथे एका मैदानला नुसतंच ‘ग्राऊंड’ आणि दुसर्या मैदानाला ‘चकोरी किंवा चार दिवाळी’ अशी नावं होती, बहुतेक वेळा आम्ही तिथे फुटबॉल खेळायचो.
जसजसे आम्ही मोठे होत गेलो तसतसं क्रिकेटचं वेड लागलं,
आमची एक क्रिकेट टीम पडली, आणि आम्ही काही तिथल्याच गावातल्या टीम बरोबर खेळायला लागलो. आमच्या कॅम्प जवळ तावी नदी होती. आम्ही तिथे लपून छापून पोहायला जायचो, कारण ती नदी शापित आहे, ती माणसांचा जीव घेते असा स्थानिकांचा समज होता. जेव्हा जेव्हा पोहताना पकडला गेलो तेव्हा तेव्हा आई कडून जबरदस्त मार पडला.
कॅम्पच्या परिसरात भरपूर साप होते, आम्ही साप पण पकडायचो, सवयच झालेली. सतत लाईट जायची, पाणी नसायचं दिवसेंदिवस, काही स्थानिक लोकं कॅम्प मधल्या बायका मुलींना येऊन छेडायचे त्यावरून खूप भांडणं आणि मारामाऱ्या व्हायच्या,
सगळ्याचीच मजा वाटायची, बालपण खूप भोळ असतं, तेव्हा काही वाटायचं नाही.
मला खूप तीव्रतेने आठवतात ते कॅम्प मधल्या सणांचे दिवस. शिवरात्र, दिवाळी…
अख्खा कॅम्प सगळी दुःखं विसरून झगमगून जायचा. कितीही वाईट परिस्थिती असली तरी घरात कायम पाहुण्यांची वर्दळ अख्ख्या कॅम्प मध्ये खरंतर.
प्रत्येक कुटुंबाचे काश्मिरी मुस्लीम शेजारी आणि मित्रं, त्यांच्या कुटुंबांसह सुट्ट्या घालवायला आमच्या छोट्या घरांमध्ये राहायला यायचे.
जात धर्म भूतकाळ सगळं विसरून आम्ही एका कुटुंबा सारखे महिनाभर नांदायचो, सुट्ट्यांची मजा घ्यायचो, अगदी एका ताटात देखील जेवायचो.
मला कधीच कळले नाही कि आम्ही सगळे हिंदूमुस्लिम एक कुटुंब आहोत तर काश्मीरमधलं राहात घर सोडून इकडे जम्मूच्या कॅम्पमध्ये का यायला लागलं?
पण मी मगाशी म्हटलं तसं, बालपण खूप भोळ असतं.
मला आठवतं की आमच्या भागात वीज कपात होत असे. म्हणून आम्ही सगळे एकत्र एका चादरीवर व्हरांड्यात बसायचो आणि मी आजीच्या मांडीवर झोपायचो. ओढणीने आम्हाला वारा घालत ती काश्मिरी अंगाई गायची. मला आठवतात शब्द
“गाव माझा गव बी गसाय बाल आपूर …”
नंतर मी केन्द्रीय विद्यालय नगरोटा मध्ये शिकत होतो. नगरोटा कॅम्प पासून जवळपास ५ कि.मी. अंतरावर, आम्हाला न्यायला बस यायची कॅम्प मध्ये, मला अजूनही नंबर प्लेट आठवतेत्या बसची Jk02c 0060.
आर्थिक परिस्थिती फारच बेताची त्यामुळे जे आहे त्यात भागवून घेत होतो आम्ही सगळे. शहरात जाणे हे एक स्वप्न होत…
आमची परिस्थिती आधी अशी नव्हती, काश्मीरमध्ये ३ मजल्यांचं मोठं घर होतं आमचं अंगण असलेलं, ज्यात गायीचा गोठासुध्दा होता, स्वतःचा जीव वाचवायला सगळं सोडून निघून यावं लागलं.
आता इथे मात्र हल्दीरामचं पाच रुपयांचं आलू भुजियाचं पॅकेट खायला घेण सुद्धा स्ट्रगल वाटायचं, आठवड्या भराच प्लानिंग आणि बचत आणि मग विकएंडला आलू भुजिया… असो..
परिस्थिती बदलली कि आजूबाजूचे लोक देखील बदलतात, जे आपले वाटायचे ते आपले नसतात हे हि कळून चुकतं, आणि ज्यांच्याकडून कधीच काही अपेक्षा केली नाही असे मदतीला धाऊन यायचे.
जसा मोठा होत गेलो तश्या या गोष्टी कळत गेला. पण परिस्थिती वरून कधीच नशिबाला किंवा पर्यायाने देवाला दोष द्यावासा वाटला नाही.
आईबाबा कायम खंबीरपणे पाठीशी उभे राहिली, संकटांची झळ कधीच नाही लागू दिली. माझे वडील अजूनही म्हणतात
‘तुमच्यासाठी मला नेहमीच कुठून तरी पैसे मिळायचे, देव सगळं बघत असतो आणि मार्ग दाखवत राहतो’.
२००३ आजोबांनी काश्मीरचे घर विकले, नागरोटा कॅम्पपासून दूर जम्मूमध्ये स्वतःचे घर बांधले आणि आम्ही आमच्या स्वतःच्या घरात गेलो.
माझी जम्मू वरून सुटका –
मी १२ वी उत्तीर्ण झाल्यावर इतर ९५% तरुणांप्रमाणे मलाही डॉक्टर व्हायचे होते, त्यासाठी मी कोचिंगचे वर्गदेखील घेतले होते. मी त्यासाठी तयारी केली होती पण २००८ मध्ये काश्मीरमधील अमरनाथ भूमीसंदर्भात आंदोलन झाले त्यामुळे आमच्या एन्टरन्स च्या परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या.
मला वर्ष वाया जाऊ द्यायचे नव्हते. माझ्याकडे इंजिनीअरिंगचा ऑप्शन होता. मी संधीचा फायदा घेतला आणि इंजिनीअरिंग करण्यासाठी जम्मू सोडले.
आणि नवीन प्रवासाची सुरुवात झाली.
जम्मूच्या नागरगोटा कॅम्पमधून बाहेर पडून नव्या आयुष्याची सुरुवारात दुसऱ्या शहरात जाऊन इन्फोसिस मध्ये काम करणाऱ्या इंजिनिअरचे रुपांतर एका अभिनेत्यामध्ये झाले ते २०१२मध्ये झालेल्या मिस्टर जम्मूच्या स्पर्धेमध्ये.
सहजच भाग घेतला आणि मिस्टर जम्मूचं टायटल जिंकले.
पण मला कुठेतरी मनात माहित होते कि मी कलाक्षेत्रात काहीतरी नक्की करणार. नंतर मग जसे पूर्ण भारतातून हजारो तरुण मुंबईच्या चंदेरी दुनियेत करियर करण्यासाठी येतात तसा मी ही आलो.
मला मुंबईने आपलं करून घेतलं ज्याप्रमाणे ती सगळ्यांना आपलं करून घेते. इथे एकदम धावपळीच्या शहरी वातावरणात adjust होणं सोपं नव्हतं पण घरच्यांचा पाठींबा आणि जिद्द म्हणून मी टिकून राहिलो.
मधल्याकाळात नैराश्याने पुन्हा जुना जॉब घेतला म्हैसूरला गेलो, आणखी नवीन स्ट्रगल केले, थेटर केले.
कलेच्या आणि मुंबईच्या ओढीने पुण्याला आलो जिथे माझ्या बायकोशी, शुभीशी ओळख झाली, आयुष्याला नवीन वळण मिळाले, आणि आता मला एकटे वाटत नव्हते. या मोठ्ठ्या दुनियेत मी घरच्यांपासून दूर असलो तरी आता एकटा नव्हतो.
शुभी आणि मी काही महिन्यांपूर्वी लग्न केले. ती आणि तिचे कुटुंब मला पूर्ण सपोर्ट करते. आम्ही आता मुंबईमध्ये राहतो. गेल्या काही वर्षांत मी बड्या राष्ट्रीय वाहिन्यांवरील tv टीव्ही शो केले आहेत, मी एका शोर्ट फिल्म मध्ये काम केले, जी अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये ईंडी फिल्म मधून निवडली गेली, मामी चित्रपट महोत्सव २०१८ मध्ये निवडली आणि प्रदर्शित केली गेली.
हा माझ्यासाठी महत्वाचा टप्पा ठरला.
आत्ता मी सध्या माझ्याकडे दोन चित्रपट करत आहे, एक तेलगू आणि दुसरा एक मराठी चित्रपट. माझ्या नशिबाने मला जोडीदार चांगली मिळाली, तिचे कुटुंबही खूप समजूतदार आहे आणि आयुष्याच्या टप्प्यांवर चांगले मित्र पण मिळत गेले.
मला एका गोष्टीवर विश्वास आहे कि आपण एकटे मोठे आणि सक्सेसफुल होत नाही, 1 + 1 = 11 असतात हे मला माझ्या अनुभवांनी शिकवलं. मला अजून खूप लांब पल्ले गाठायचे आहेत.
- नवीन पंडित