तब्बल ३५ वर्षे पाकिस्तानच्या काळ कोठडीत काढून जिवंत परतणारा सुपरस्पाय

पाकिस्तान हा भारताच्या कुंडलीला लागलेलं ग्रहण आहे यात शंका नाही. प्रत्येक देशाचे शेजारच्या देशाशी वाद असतात पण भारत आणि पाकिस्तान यातील सीमावाद गेली सत्तर वर्षे तसाच आहे. पाकिस्तानला यात कोणताही तोडगा काढायचा नाही तर त्याला वाद चिघळत ठेवण्यात जास्त रस आहे.

पाकिस्तानची आजवरची नीती युद्धखोर आहे.

तिथे लोकशाही नावाला आहे, कायद्याचा राज्य तर कधीच धाब्यावर बसवलं आहे. लष्कर स्वतःच खुलेआम अतिरेकी यांना पाळते. त्यांची गुप्तचर संघटना आयएसआय कायम भारताला त्रास देण्यासाठी नवीन नवीन कुरापती शोधत असते.

स्वातंत्र्यानंतर नेहरू, लालबहादूर शास्त्री असे सज्जन पंतप्रधान असताना भारत आदर्शवादी रस्त्यावरून चालत होता.

पण पाकिस्तानी आयएसआयच्या कारवाया वाढल्यावर तेव्हाच्या खमक्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी काही रॉ, मिलिटरी इंटेलिजन्स सारख्या खास संगठना सुरू केल्या.

रामनाथ काव हे रॉ चे प्रमुख होते. त्यांनी भारतीयगुप्तहेर खात्याच स्वरूपच पालटून टाकलं. त्यांच्या खास ट्रेनिंग खाली अनेक स्पाय तयार झाले जे स्वतःच प्राण अर्पण करायला देखील तयार होते.

यातीलच एक नाव म्हणजे कश्मीरसिंग.

कश्मीरसिंग हे पंजाबच्या नांगलचोरा या गावचे. पोलीस खात्यात होते. अचानक एक दिवस नोकरी सोडली. घरच्यांनी विचारल्यावर आता आर्मीसाठी काम करतोय अस सांगितलं. इलेक्ट्रिक वस्तू विकण्याचा धंदा सुरू केला. त्या निमित्ताने घरा बाहेर फिरती वर राहू लागले.

खरं तर त्यांचं स्पाय बनण्याचं ट्रेनिंग सुरू होतं.

पोलीस खात्यात असल्यापासूनच भारतीय गुप्तहेर खात्याच त्याच्यावर लक्ष होतं. कश्मीरसिंग जात्याच हुशार होता, उर्दू भाषेवर चांगली पकड होती. पंजाबच्या सीमाभागातील असल्यामुळे पाकिस्तानी रीतिरिवाज, आचारविचार अगदी सेम होते.

लष्करातल्या एका मोठ्या अधिकाऱ्याने त्याला अप्रोच केला आणि काश्मीर सिंग गुप्तहेर बनून पाकिस्तानला जाण्यास तयार झाला.

जवळपास तीन महिने त्याच ट्रेनिंग झालं. अनेक सिक्रेट गोष्टी त्याला शिकवल्या गेल्या यात फोटोग्राफीच खास ट्रेनिंग देण्यात आलं. सगळ्यात शेवटी त्याचा सुंथा करण्यात आला.

भारताचा काश्मीर सिंग पाकिस्तानचा मोहम्मद इब्राहिम बनला.

१९६९ साली कश्मीरसिंगला गुरुदासपूर जवळच्या डेराबाबा नानक येथून पाकिस्तानमध्ये घुसवण्यात आलं. त्याच्या जवळ एक इंपोर्टेड कॅमेरा देण्यात आला होता. बॉर्डर जवळील पाक सैन्याच्या हालचाली, त्यांचे मिलिटरी साहित्य, त्यांची ठाणी याचे फोटोग्राफ काढून आणण्याची जबाबदारी काश्मीर सिंग यांची होती.

आपल्या पहिल्याच फेरीत कश्मीरसिंग जवळपास लाहोरपर्यंत जाऊन आले. या मोहिमेनंतर इंटेलिजन्सच्या अधिकाऱ्यांचा त्याच्यावरचा विश्वास वाढला.

पुढच्या तीन वर्षात कश्मीरसिंग यांनी पाकिस्तानला जवळपास ५० फेऱ्या मारल्या.

प्रत्येकवेळी गुप्त वेष धारण करून ते लाहोरच्या एका विशिष्ट हॉटेल मधील विशिष्ट खोलीत आठ दहा दिवस राहायचे. तिथून जवळपास मुलतान, भवालपूर, साहिवाल इथंपर्यंत त्यांच्या कारवाया चालत.

ते नेमकं पाकिस्तानमध्ये काय करायचे हे स्पष्टपणे सांगत नाहीत पण पाकिस्तानी मिलिटरी बेसचे अपडेट्स कॅमेरा च्या माध्यमातून भारतीय अधिकाऱ्यांना पोहचवणे ही त्यांची मुख्य मोहीम होती.

त्यांना महिन्याला ४८० रुपये पगार होता व पाकिस्तानला गेल्यावर दिवसाचा एक्स्ट्रा १५० रुपये अलोंउन्स मिळायचा.

एकदा त्यांना पेशावर वरून रावळपिंडीला बसने जायचं होतं. सोबत मदतीला एक लोकल गाईड सुद्धा होता. दोघे निघाले पण काश्मीरसिंग यांना का कुणास ठाऊक गाईडच वागणं शंकास्पद वाटत होतं.

रावळपिंडीच्या अलीकडे २२वा मैल म्हणून ठिकाण आहे तिथे अचानक बस स्लो झाली. काश्मीरसिंग यांच्या डोक्यात धोक्याची घंटा घणघणली. त्यांनी आपला खिडकीतून कॅमेरा फेकून दिला.

बस थांबल्यावर पाक मिलिटरीचे जवान आले व त्यांनी काश्मीरसिंग यांना उचललं.

इथून पुढचा काळ त्यांच्यासाठी मरणाहुन ही जास्त भयानक होता. वेगवेगळ्या पाकिस्तानी जेलमध्ये त्यांना ठेवण्यात आलं, अनेक केसेस लादण्यात आले.

रोज प्रचंड मारहाण व्हायची. थर्ड डिग्री सुद्धा साधी म्हणावी एवढे अमानुष अत्याचार त्यांच्यावर झाले. पण शेवटपर्यंत कश्मीरसिंग मी एक समगलर आहे आणि माल विकण्यासाठी पाकिस्तानमध्ये आलो होतो असेच सांगत राहिले.

हे सगळं घडलं तेव्हा कश्मीरसिंग फक्त ३२ वर्षांचे होते.

त्यांच्या मागे परमजीत कौर ही पत्नी व तीन छोटी मुलं होती. तत्कालीन भारत सरकारने मात्र कश्मीरसिंग आमचा गुप्तहेर आहे हे नाकारून त्याला मदत करण्यास नकार दिला.

कोणत्याही गुप्तहेराच हेच दुर्दैव असत की त्यांनी कितीही पराक्रम केला तरी सरकारला अधिकृतपणे त्यांना सन्मान किंवा त्यांना मदत करता येत नाही. पण गुप्तपणे महिन्याला ३००रुपये कश्मीरसिंग यांच्या पत्नीला देण्यात येत होते.

पुढे कश्मीरसिंग यांना मृत्यू दंडाचीही शिक्षा झाली.

२८ मार्च १९७८ रोजी त्यांना फाशी होणार होती पण फाशीला फक्त २ तास उरले असताना चमत्कार घडला व कोर्टाची स्टे ऑर्डर आली.

तिथून पुढे जवळपास २५ वर्षे त्यांनी काळ कोठडीमध्ये काढली. त्यातील १८ वर्ष त्यांच्या हातापायात बेड्या होत्या. तेव्हा झालेल्या मारहाणीचे वळ अजूनही कायम आहेत.

दिवसरात्र मृत्यूची टांगती तलवार डोक्यावर घेऊन कश्मीरसिंग यांनी ३५ वर्षे पाकिस्तानी जेलमध्ये पूर्ण केले.

पाकिस्तानी मानवाधिकारा साठी काम करणारे कार्यकर्ते अन्सार बर्णी यांच्याशी त्याची भेट झाली. लाहोर सेंट्रल जेलमध्ये आलेल्या अन्सार यांनी कश्मीरसिंग यांना कधी न कधी बाहेर काढणार याच वचन दिलं.

कश्मीरसिंग पाकच्या तुरुंगात खितपत पडले आहेत याची बातमी त्यांनीच जगापर्यंत आणली.

तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रर्रफ यांनी अखेर कश्मीरसिंग यांना परत जाण्यासाठी हिरवा झेंडा दाखवला.

४मार्च २००८ रोजी कश्मीरसिंग यांनी पहिल्यांदाच खुल्या वातावरणात मोकळा श्वास घेतला. त्याच दिवशी बाघा बॉर्डर क्रॉस करून ते भारतात आले. तिथे त्यांची पत्नी हजर होती. दोन्ही साईडच्या जवानांनी टाळ्यांच्या गजरात कश्मीरसिंग यांचं स्वागत केलं.

कश्मीरसिंग यांचं अख्ख तारुण्य जेलमध्ये गेलं होतं. त्यांची मुलं मोठी झाली, गावे बदलली, अख्खा देश बदलला. पण जे घडलं त्यासाठी कश्मीरसिंग याना थोडही वाईट वाटत नाही,

“आजही मला पुन्हा संधी मिळाली तर देशासाठी पुन्हा तेच आयुष्य जगण्याची माझी तयारी आहे”

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.