कष्टाची भाकरी : गेली ४६ वर्ष कमी पैशात पोटभर जेवण देण्याचा हा उपक्रम चालू आहे.

अम्मा कॅन्टिन, इंदिरा कॅन्टिन, अण्णा कॅन्टिन पासून ते महाराष्ट्रात युतीच्या काळात सुरु झालेलं एक रुपायत झुणका भाकर केंद्र. कित्येक आले आणि त्याच वेगाने बंद झाले. कष्टकऱ्यांना कमी पैशात जेवण मिळवून देणाऱ्या योजना येतात, माध्यमांमध्ये बातम्या होतात. तात्पुरती हवा होते आणि त्याच वेगाने अशा योजना बंद पडतात. त्याच मुख्य कारण असतं ते म्हणजे नियोजन आणि ती योजना राबवण्याबाबत असणारा प्रामाणिकपणा.

पण गरिब कष्टकरी मजूराच्या पोटात चार घास पडले पाहीजेत हा प्रामाणिक उद्देश घेवून काम केलं तर इतिहास घडू शकतो. असाच इतिहास पुण्यात घडला आहे.

कित्येक गोष्टी आल्या आणि गेल्या पण गेली ४६ वर्ष पुण्यात कष्टकरी मजूरांना कमी पैशात जेवण मिळवून देणाऱ्या कष्टाच्या भाकरीचा उपक्रम निरंतर चालू आहे.

ही गोष्ट कष्टाच्या भाकरीची.

कष्टाच्या भाकरीची सुरवात झाली ती सत्तरच्या दशकात. आजच्या प्रमाणेच पुण्यात त्या काळात नोकरीच्या शोधात महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून लोक येतं. पुण्यात रहाण्याची सोय नाही, जेवणाची सोय नाही. दिवसभर कष्टाचं काम करायचं. मार्केट यार्डात शंभर किलोच्या वरची पोती दिवसभर उचलायची. जेवणाची वेळ आली तर दिवसभरातली सर्व मजूरी जेवणावरच जायची वेळ यायची असा तो काळ.

१९७२ साली महाराष्ट्रात न भुतो न भविष्यती दुष्काळ पडला होता. मोठमोठे जमिनदार या दुष्काळात आत आले तर मोलमजूरी करून हातावर पोट असणाऱ्याचं काय सांगणार. लोकांचे लोंढेच्या लोंढे कामाच्या शोधात शहराची वाट धरू लागले. रस्त्याच्या कडेला, कुठल्यातरी कोपऱ्यावर, रस्त्यांवर रहाण्याची सोय होत असे. उठायचं आणि पडेल ती कामं करायची. पण पोटाचा प्रश्न कायम असायचा.

अशा वेळी गरिब, कष्टकरी, मोलमजूरी करणाऱ्यांच्या मदतीला आली ती कष्टाची भाकर.

बाबा आढाव यांच्या हमाल पंचायतीने दिनांक २ ऑक्टोंबर १९७४ साली पुण्यातल्या भवानी पेठेत कष्टाच्या भाकरीची स्थापना केली. आज पुण्यात एकूण ११ ठिकाणी या संस्थेची केंद्र आहेत. एकूण १२ ते १३ हजार लोकांना या कष्टाच्या भाकरीच्या केंद्राचा रोज लाभ घेता येतो. भवानी पेठ, पुणे स्टेशन, मालधक्का, मार्केट यार्ड, नाना पेठ अशा पुण्याच्या विविध ठिकाणी एकूण अकरा केंद्रावर पोटभर जेवण मिळते. आजचे वाढलेले दर सांगायचे झाले तर ३० रुपयांमध्ये पोटभर थाळी मिळते. प्रत्येक गोष्ट नगावर घेण्याची इथे तरतूद आहे, त्यामुळे काय होतं तर ज्याला जे हवं तितकचं तो घेतो. पाच रुपयांना पोळी, पाच रुपयांना पिठलं, १० रुपयांना भज्जी, १० रुपयांना जिलेबी अस अगदी घरच्यासारखं जेवणं इथ मिळतं.

पण सर्वात आश्चर्याची आणि शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे हा उपक्रम इतक्या कमी पैशामध्ये ४६ वर्ष कसा काय चालू आहे ? 

याच प्रश्नाचं उत्तर समजून घेण्यासाठी मॅनेजमेंटचे अनेक पोरं इथे भेट देत असतात. कष्टाची भाकर केंद्रावर एकूण १५० लोक काम करतात. महिला स्वयपाक करतात. ना नफा ना तोटा हे संस्थेच ब्रीद आहे. काम करण्यासाठी महिला आहेत त्या कष्टकरी मजूरांच्या पत्नी आहे. अनेक विधवा महिला आहेत. पतीच्या पश्चात ज्यांचा संसार उघड्यावर पडला अशा महिला इथे काम करतात. त्याच स्वयपाक करतात. घरच्यासारखं अस्सल करण्यावर त्यांचा भर असल्याने क्वॉलिटीत कधीच फरक पडला नाही त्यामुळे कष्टकरी, मजूर लोकांसाठी कष्टाची भाकर हक्काची झाली. फक्त जेवणच नाही तर सकाळच्या वेळेस पोहे, शिरा अशी नाष्ट्याची सोय देखील इथे करण्यात आली आहे. दिवाळीच्या दिवसात लाडू चिवड्याची सोय देखील या केंद्रामधून केली जाते.

नियोजन आणि प्रामाणिक हेतू या दोन गोष्टी जपल्यामुळे कष्टाच्या भाकरीची परंपरा हमाल पंचायतीने जपली. तर दूसरीकडे लोकांच्या भल्याचा विचार म्हणून सरकारने काढलेल्या योजना फसल्या. त्याचं कारण देखील नियोजन आणि हेतू. कोणताही उपक्रम चालवण्यामागे विचार प्रामाणिक असले माणसं प्रामाणिक असली की इतिहास घडतो हे वाक्य कष्टाची भाकरी कडे पाहिल्यानंतर मनोमन पटते. 

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.