महाराष्ट्रात शास्त्रीय नृत्यकलेचं बीज पं. रोहिणी भाटे यांनी रोवलं होतं…

महाराष्ट्रात अभिजात शास्त्रीय संगीत, नाट्यगीत आणि लोकगीतांची परंपरा दीर्घकाळापासून सुरू आहे यात नृत्य, डान्स,नाच अशा कैक शब्दांत आपण नृत्यकला बघत असतो. पण तेव्हा शास्त्रीय नृत्य हा प्रकार नव्हता. एक साधना समजून कलाकार लोकं नृत्याकडे एका वेगळ्या नजरेने बघत असतात. आज घडीला नृत्याचे किती फॉर्म आहेत. लावणीपासून ते कथक ते डिस्को वैगरे मग जितके फॉर्म असतील तितके. पण महाराष्ट्रामध्ये शास्त्रीय नृत्याचे बीज रोवले ते म्हणजे रोहिणी भाटे यांनी. त्यांच्याबद्दल आपण जाणून घेऊया.

14 नोव्हेंबर 1924 रोजी रोहिणी भाटेंचा बिहार ,पटना येथे एका मध्यमवर्गीय परिवारात जन्म झाला. रोहिणी भाटे या मराठी कथक नर्तकी होत्या. ज्या काळात भारतात पांढरपेशा घरातील मुलींनी स्टेजवर नृत्य करणे ही प्रथा समाजमान्य नव्हती, त्या काळात एका मराठी मुलीने नृत्य करणे ही गोष्ट धारिष्ट्याचीच होती. पण एकदा घेतलेला निर्णय रोहिणी भाटे यांनी मरेपर्यंत निभावला. त्या बुद्धिमान तर होत्याच शिवाय त्या कविताही करीत. गाण्याचेही त्यांना अंग होते.

या सर्वांचा उपयोग त्यांना नृत्यसाधनेसाठी झाला. रोहिणी भाटे यांनी लखनौ घराण्याचे कथक नर्तक लच्छूमहाराज व जयपूर घराण्याचे नर्तक मोहनराव कल्याणपूरकर यांच्याकडे कथक नृत्याचे शिक्षण घेतले होते. त्यांनी इ.स. १९७२च्या सुमारास पुण्यात नृत्यभारती नावाची कथक नृत्यप्रशिक्षण अकादमी स्थापली.

भाटे यांनी कलेचा सराव करण्याशिवाय त्याच्या संशोधनात्मक अभ्यासावरही भर दिला. भरतनाट्यम नर्तक कलानिधी नारायणन यांच्या सहकार्याने त्यांनी कथक आणि भरतनाट्यम यातील अभिनयाचा तुलनात्मक अभ्यास केला.

भाटे यांनी ‘माझी नृत्यसाधना’ या आत्मचरित्रासह मराठी भाषेत अनेक पुस्तके लिहिली. अमेरिकन समकालीन नर्तक ईसाडोरा डंकन यांच्या आत्मचरित्राचे भाषांतरही केले. त्यांनी कथक दर्पण दीपिका नावाच्या संस्कृत पुस्तिकेचे संपादनही केले. भाटे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परफॉर्मिंग आर्ट्स (ललित कला केंद्र) येथे कथक अभ्यासक्रमांच्या तयारीसाठी मार्गदर्शन केले. तिथे त्या मानद प्राध्यापक म्हणूनही जायच्या.

इ.स. १९७७ साली महाराष्ट्र राज्य पुरस्काराने, तर इ.स. १९९० साली महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन गौरवले गेले. नवी दिल्लीच्या संगीत नाटक अकादमी ने इ.स. १९७९ साली त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान केला. रोहिणी भाटे यांनी लिहिलेले लहेजा या नावाचे आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे. त्यांच्या शिष्यांमध्ये प्राजक्ता अत्रे, ऋजुता सोमण, मराठी चित्रपट अभिनेत्री शर्वरी जमेनीस यांचा समावेश आहे.

10 ऑक्टोबर 2008 रोजी रोहिणी भाटे यांचं निधन झालं पण महाराष्ट्रात शास्त्रीय नृत्याच त्यांनी रोवलेलं बीज आज वटवृक्षाप्रमाणे दिसून येत आहे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.