कठूआ बलात्कार प्रकरणाच्या वकिलांना मध्येच केस का सोडावी लागली होती?

जम्मू मधील कठूआ जिल्ह्यात १० जानेवारी २०१८ रोजी ८ वर्षाच्या चिमुरडीवर घडलेल्या बलात्कार आणि हत्याकांडच्या घटनेने संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली होती. सात नराधमांनी मिळून ८ वर्षाच्या चिमुरडीवर मंदिरात बलात्कार करून नंतर तिची निर्घुण हत्या केली होती.

यानंतर सगळीकडे असंतोषाची लाट पसरली होती. आरोपींना अटक करून त्यांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी देशभरात कॅण्डल मार्च काढण्यात आले. हि केस तपासासाठी क्राईम ब्रांचकडे देण्यात आल्यानंतर १६ एप्रिल २०१८ ला आरोपींचे अटकसत्र सुरु झाले आणि त्यात सात जणांना अटक होऊन त्यांच्यावर खटला भरण्यात आला.

आरोपींना अटक झाल्यानंतर खटला पुढे चालवण्यासाठी पिडीतेचे वकील पत्र कोण घेणार ? हा मोठा प्रश्न होता. कारण पोलिसांनी आरोपींवर दाखल केलेल्या चार्जशीटच्या विरोधात जम्मू मधील अनेक वकील रस्त्यावर उतरले होते. इतकेच नव्हे तर या आरोपींच्या समर्थनार्थ जम्मूमध्ये भारतीय जनता पक्षाने मोर्चा काढला होता, ज्यात त्यांचे दोन मंत्रीदेखील सामील झाले होते.

या सगळ्या राजकीय दडपणामुळे कोणीही वकील या केसचं आरोपपत्र घेण्यास तयार नव्हता. अखेर यातून वेगळा मार्ग निवडत एका स्थानिक वकिलने पिडीतेच्या बाजूने लढण्याचा निर्णय घेतला. ती वकील म्हणजे,

‘ दीपिका सिंह राजावत.’

कोण आहेत दीपिका सिंह राजावत आणि त्यांनी हि केस का घेतली ?

३८ वर्षीय दीपिका सिंह राजावत ह्या एक काश्मिरी पंडित आहेत. त्यांचे कुटुंब १९८६ मध्ये काश्मीर मधून पलायन करून जम्मूला आले होते. याशिवाय दीपिका ह्या सिंगल मदर आहेत. कठूआ केसला आपल्या सहकार्यांचा विरोध असताना देखील त्यांनी हि केस लढण्याच्या निर्णय घेतला. त्यानंतर त्यांना वारंवार धमक्यांचा सामना करावा लागला. या केसबद्दल बोलताना त्या म्हणाल्या होत्या की,

“मी बऱ्याच काळापासून लहान मुलांचे अधिकार यावर काम करत आहे. शिवाय माझीही ५ वर्षांची मुलगी आहे. पिडीतेची कहाणी इतकी दुखदायक होती की, हि केस घेण्यासाठी मी त्यांना स्वताहून संपर्क केला.”

दीपिका ह्यांनी मध्येच हि केस सोडली.

कठूआ केस घेतल्यानंतर दीपिका यांना वारंवार बलात्कार करून जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. कुणी त्यांच्या घरावर हल्ला करेल याची त्यांना सतत भीती लागून होती. शिवाय कोणी आपल्या मुलीला काहीतरी करेल ही भीतीसुधा होती. अखेर त्यांनी नोव्हेंबर २०१८ मध्ये ही केस सोडण्याच्या निर्णय घेतला.

दीपिका यांच्या वडिलांनी पठाणकोट न्यायलयात आवेदन दिले होते की, हि केस पुढे लढण्याची दीपिकाची इच्छा नाही. या केस मध्ये झालेल्या ११० सुनावणीपैकी त्या केवळ २ वेळा न्यायलयात उपस्थित राहू शकल्या आहेत. त्यांच्या गावापासून पठाणकोट न्यायालय अडीचशे किलोमीटर दूर असल्याने त्यांना वेळोवेळी न्यायालयात उपस्थित राहता आले नाही. या कारणामुळे त्या केसमधून बाहेर पडू इच्छित होत्या. यावर न्यायलयाने त्यांचे आवेदन स्वीकारून त्यांची या केसमधून सुटका केली. ही केस सोडत असताना आपल्याला फार दुख होत असल्याचे दीपिका बोलल्या होत्या.

केसचा निकाल लागल्यावर दीपिका यांची प्रतिक्रिया…

या केस मधील सात पैकी सहा दोषींवर आरोप सिद्ध होऊन त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले. एक आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्याची सुटका करण्यात आली. आरोपींवर आरोप सिद्ध झाल्याची बातमी ऐकून अॅडव्होकेट दीपिका यांनी आनंद व्यक्त केला. यावर त्या बोलल्या,

“हा सत्याच्या विजय असून, त्या आठ वर्षाच्या बालिकेच्या मृत्यू वरून देश तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा पराभव आहे. इतकच नाहीतर काही लोक या केसला एक वेगळेच वळण देऊ पाहत होते. ज्यात लोकांनी असा प्रचार केला होता की, हि केस लढून मी चूक करत आहे. निरपराध हिंदूंना फसवत आहे. हा आरोप मी आजपर्यंत माझ्या माथी घेऊन फिरत होती. पण म्हणतात ना, देवाच्या घरात उशीर होतो पण अंधार नाही. ठीक तसेच झाले आणि या निकालाने माझ्या माथी असलेला आरोपीचा डाग पुसला गेला.”

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.