श्रावण महिना आला की कावड यात्रा सुरु होते पण त्याचा इतिहास असा आहे…

जय भोले.. 

बाहुबली सिनेमा पहिला आहे का? शिवलिंगावर अभिषेक करण्यासाठी आईला वारंवार झऱ्याचं पाणी आणावं लागू नये यासाठी अक्खा शिवलिंगच खांद्यावर उचलून झऱ्याच्या खाली मांडतांना प्रभासला आपण पाहिलं असेलच. त्या सीनच्या बॅकग्राऊंडला कैलास खैरच्या आवाजातील शिवतांडवस्तुतीमुळे सीन अगदी भारी वाटतो.

हे झालं सिनेमाचं मात्र खऱ्या खुऱ्या जगात सुद्धा लाखो जण बाहुबलीच्या आईसारखे नदीचं पाणी वाहून आणतात आणि शिवलिंगावर चढवतात..

होय, श्रावण महिना सुरु झालाय आणी त्याचबरोबर उत्तर भारतातील प्रसिद्ध कावड यात्रा सुद्धा चालू झालीये. या कावड यात्रेत लाखो शिवभक्त भगवे कपडे घालून जय भोले! म्हणत आप-आपल्या कावडी घेऊन हरिद्वार, ऋषिकेश आणि काशीच्या दिशेने चालू लागले आहेत.

परंतु यंदाच्या कावड यात्रेवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हिंदी पट्ट्यातील सर्वच राज्यांनी यासाठी सुरक्षा तैनात केली आहे. एवढी भक्कम सुरक्षा असलेली आणि महिनाभर चालणारी ही कावड यात्रा नेमकी कशी असते ते समजून घेऊयात..

गंगा नदीचे पाणी आणि उत्तर भारतातील कावड यात्रा..

गंगा नदीचे आणि तिच्या पाण्याचे महात्म्य हिंदू धर्मात सगळ्यात मोठे आहे. परंतु गंगा नदी ज्या राज्यांमधून वाहते त्या राज्यातील लोकांसाठी गंगा जीवनाचा आणि परंपरांचा अविभाज्य अंग आहे. त्यामुळेच गंगेच्या पाण्यावर आधारलेल्या अनेक परंपरा या भागात आहेत.

त्यातीलच एक परंपरा म्हणजे कावड यात्रा होय. दरवर्षी लाखो भाविक या कावड यात्रेत सहभागी होतात आणि हरिद्वारमधून गंगेचे पाणी शिवलिंगावर चढवतात.

कावड यात्रेच्या मुख्यस्थानी असलेली गंगा नदी..

हिमालय पर्वतरांगेतील गोमुख येथे भागीरथी नदीचा उगम होतो. पुढे जाऊन गंगोत्री येथे भागीरथीला अलकनंदा येऊन मिळते. या दोन नद्यांच्या संगमातुन गंगा नदीचा जन्म होतो. गंगा नदी गंगोत्रीहून वाहत वाहत उत्तरकाशी आणि देवप्रयाग ओलांडून ऋषिकेशला येते. 

त्यांनतर काहीच मैल पुढे वाहून हिमालयातील ही महाकाय नदी मैदानात उतरते आणि उत्तरेच्या मैदानाला जीवन देते. गंगा नदी उत्तरेच्या मैदानात शेती, उद्योग, पिण्याचे पाणी या सगळ्या गरज भागवते. त्यामुळे या यात्रेमागे धार्मिक कारण असले तरी पर्यावरणीय आणि सामाजिक कारणं सुद्धा आहेत.

श्रावण महिना आला कि कावड यात्रेला सुरुवात होते..

श्रावण महिना सुरु झाला कि उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, पंजाब आणि हरियाणातील लाखो भाविक आपल्या खांद्यावर कावडी उचलून अनवाणी पायाने उत्तराखंड राज्यातील हरिद्वारला चालत जातात. काही जण हरिद्वारच्या पुढे ऋषिकेशला सुद्धा जातात.

हरिद्वार, ऋषिकेश मधून गंगा नदीचे पाणी कावडीतील घड्यांमध्ये भरून मेरठ जवळच्या पुरा येथील नीलकंठ महादेव, काशी विश्वनाथ किंवा आपल्या गावापासून जवळ असलेल्या शिवलिंगावर चढवतात. इतक्या दुरून पाणी आणून शिवलिंगावर चढवण्याच्या मागे दोन आख्यायिका आहेत..

पहिली आख्यायिका अशी सांगितली जाते कि, 

समुद्र मंथनांतर अमृताच्या प्याल्यात सर्वात प्रथम हलाहल नावाचे विष निघाले होते. सृष्टीला वाचवण्यासाठी हे विष महादेवाने प्यायले होते. परंतु हे विष महादेवाच्या संपूर्ण शरीरात जाऊ नये यासाठी पार्वतीने महादेवाचा गळा रोखून ठरला. विष गळ्यात रोखले गेल्यामुळे महादेवाचा कंठ निळा झाला आणि महादेव नीलकंठ झाले.

परंतु विष गळ्यात असले तरी घातक होते. तेव्हा विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी पार्वतीने महादेवाला गंगेचे पाणी दिले होते. त्यामुळे दरवर्षी कावडीने पाणी आणून शिवलिंगावर चढवले जाते. 

तर दुसरी आख्यायिका महादेवाचा निस्सीम भक्त रावणाची आहे.

रावण हा महादेवाचा निस्सीम भक्त होता हे तर आपल्याला माहीतच आहे. परंतु महादेवाने हलाहल प्यायल्यावर रावणाने हरिद्वार येथून गंगेचे पाणी आणून पुरा येथील नीलकंठ महादेवाला अर्पण केले होते. तेव्हापासून कावड यात्रा चालू झाली असे सांगितले जाते.

काही जण या दोन आख्यायिकांव्यतिरिक्त शिवभक्त परशुरामाने दार सोमवारी महादेवाला पाणी वाहिल्यामुळे ही यात्रा सुरु झाली असे सांगतात.

शरयू आणि गंगेचे पाणी देवघरच्या बैद्यनाथाला..

कावड यात्रा फक्त हरिद्वारहून पुरा येथील नीलकंठ महादेव मंदिरापर्यंतच चालत नाही. तर अनेक ठिकाणी वेगवेगळ्या नद्यांचे पाणी सुद्धा ज्योतिर्लिंगांना चढवले जाते. काही यात्रेकरू अयोध्येतून शरयू नदीचे पाणी घेऊन काशी विश्वनाथला चढवतात.

तर काही यात्रेकरू शरयू नदीच्या पाण्यासह बिहारच्या सुल्तानगंजमधून गंगा नदीचे पाणी घेऊन, झारखंड राज्यातील देवघर येथील बैद्यनाथ ज्योतिर्लिंगाला आणि दुमका जिल्ह्यातील वासुकीनाथाला जलाभिषेक करतात आणि आपली यात्रा पूर्ण करतात.

नर्मदा नदीचे पाणी महाकालेश्वराला आणि क्षिप्रा नदीचे पाणी ओंकारेश्वराला..

काही यात्रेकरू मध्य प्रदेशातील उज्जैन येथे क्षिप्रा नदीच्या काठावरील महाकालेश्वर मंदिरात अभिषेक करतात. त्यांनतर क्षिप्रा नदीचे पाणी कावडीत घेऊन नर्मदा नदीच्या काठावर असलेल्या ओंकारेश्वराचा  जलाभिषेक करतात.

तर काही काही यात्रेकरू त्याच्या उलट नर्मदा नदीच्या पाण्याने ओंकारेश्वराचे अभिषेक करतात. त्यानंतर नर्मदा नदीचे पाणी कावडीत घेऊन क्षिप्रा नदीच्या काठावर असलेल्या महाकालेश्वराचा जलाभिषेक करतात आणि आपली कावड यात्रा पूर्ण करतात.

कावड यात्रेची भव्यता आणि दहशतवादी हल्ल्याची भीती.. 

कावड यात्रा पूर्वीपासून चालत आली असली तरी १९६० च्या दशकापासून मोठ्या स्वरूपात साजरी केली जात आहे. गेल्या वीस तीस वर्षात या यात्रेला मोठे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे या यात्रेत सहभागी होणाऱ्या यात्रेकरूंची संख्या कोटीच्या घरात पोहोचली आहे. 

आजपर्यंत या यात्रेवर कोणताही दहशतवादी हल्ला झालेला नाही. परंतु दिवसेंदिवस वाढणाऱ्या भव्यतेमुळे आणि नुकत्याच घडलेल्या नुपूर शर्मा प्रकरणामुळे कावड यात्रेवर दहशतवादी हल्ल्याचे सावट पसरले आहे. 

केंद्रीय गृहमंत्रालयाने दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवल्यामुळे दिल्ली, हरियाणा, यूपी, उत्तराखंड राज्यतील यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. जागोजागी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. 

हिंदू धर्मातील गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू आणि कावेरी या सप्तसरितांमध्ये गंगा नदी ही कायम महत्वपूर्ण राहिली आहे. गंगा आणि गंगेच्या पाण्याचे महत्व निव्वळ धार्मिकच नाही तर समाजजीवनात आणि पर्यावरणात सुद्धा मोठे महत्व आहे. त्यामुळे ही कावड यात्रा भारतीय परंपरेत महत्वाची आहे.

आजपर्यंत शांततेत पार पडलेल्या या यात्रेत भविष्यात कोणतेही विघ्न येणार नाही याची काळजी घ्यावी लागेल..

हे ही वाच भिडू 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.