अखेरच्या श्वासापर्यंत शंभू महाराजांची साथ न सोडणारे ‘कवी कलश’ कोण होते?

इतिहासकारांनी बखरकारांनी सर्वात जास्त अन्याय केलेली व्यक्ती म्हणजे कवीराज कलश. छत्रपती संभाजी महाराजांना अखेरच्या क्षणापर्यंत साथ दिलेल्या कवी कलशाची गेल्या काही वर्षापर्यंत बरीच बदनामी करण्यात आली. त्यांचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचू दिला नाही.

हे कवीराज कलश नेमके कोण होते?

कवी कलश मुळचे उत्तर प्रदेशचा कनोजी ब्राम्हण. त्यांंच्या पूर्वायुष्याबद्दल जास्ती माहिती नाही. पण काही ठिकाणी त्यांंचा उल्लेख केशवभट्ट कबजी असा आढळतो. त्यामुळे हे त्याचं नाव असू शकत. काही जणांच्या मते आग्र्याहून सुटकेच्या प्रसंगी महाराजांनी बालशंभूराजेना मथुरेत ठेवल होतं तेव्हा त्यांची आणि कवी कलशाची पहिली ओळख झाली. मात्र याबद्दल अनेक मतांतरे आहेत.

उत्तरेत औरंगजेब बादशाह बनल्यापासून रयतेवरील जुलूम वाढला होता. त्याने इतर धर्मांचा छळ सुरु केला. धार्मिक स्थळांची विटंबना केली. त्याच्या अन्यायाला कंटाळून अनेक विद्वान लोक दक्षिणेत येऊ लागले.

त्यांना एकच आधार दिसत होता तो म्हणजे शिवरायानी स्थापन केलेलं हिंदवी स्वराज्य. 

शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर उत्तरेतून येणाऱ्यांचा ओघ सुरु झाला. छत्रपती शिवाजी महाराज विद्वत्तेचे भोक्ते होते. त्यांनी या साऱ्यांना आधार दिला. त्यांचं दरबारात कवी परमानंद होतेच शिवाय उत्तरेच्या छत्रसाल राजाच्या दरबारातून आलेला कवी भूषण हा देखील शिवकालातील महत्वाचा कवी होता.

 याच काळात कवी कलश देखील उत्तरेतून महाराष्ट्रात आला असावा व त्याची युवराज संभाजी महाराजांशी भेट झाली.

मांसाहेब जिजाऊंच्या संस्कारात वाढलेले संभाजी महाराज रणनीती मध्ये कुशल होतेच मात्र त्यांचं संस्कृत व फारसी भाषेचाही अभ्यास गाढा होता.  पंडित होते. त्यांनी बुधभूषण  नायिकाभेद, सातसतक, नखशिख असे ग्रंथ  देखील लिहिले होते. काव्यशास्त्रविनोदाची त्यांना जाण होती. धर्मशास्त्रावर होणाऱ्या वादविवादामध्ये ते सहभागी होत.

यातूनच अष्टपैलू विद्वान म्हणून ओळख असलेल्या कवी कलशांच्या ब्रज भाषेतील काव्याचे संभाजी महाराज चाहते झाले.  

शिवरायांच्या मृत्यूनंतर दरबारातील अनेकांनी संभाजी महाराजांना गादीवर बसण्यास आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला. यात अष्टप्रधान मंडळातील अनेकजण होते. मात्र शंभूराजांची रयतेमध्ये लोकप्रियता अफाट होती.

स्वराज्याचं हित ओळखून सरसेनापती हंबीरराव मोहितेनी देखील त्यांनाच पाठींबा दिला. संभाजी महाराज छत्रपती बनले.

त्यांनी राज्यकारभाराची घडी बसवली मात्र त्यांच्या विरोधात असलेल्या अष्टप्रधान मंडळाने अनेक कटकारस्थाने केली. मुघलांपासून पोर्तुगीजांपर्यंत अनेक शत्रूंना एका वेळी तोंड द्यावे लागलेल्या संभाजी महाराजांना या स्वकीयांच्या विखारी राजकारणाला देखील सामना करावा लागला. त्यांच्यापासून सुटका करून घेण्यासाठी शंभूराजांनी आपल्या विश्वासातल्या कवी कलशाची मदत घेतली.

साधारण १६८६ साली साष्टीबारची पोर्तुगीजांवरची मोहीम आटोपून रायगडावर परतलेल्या संभाजी महाराजांनी कवी कलशाना कुलमुख्यत्यार पदाची जबाबदारी दिली.

हे प्रशासनातील प्रमुख पद होते. संभाजी महाराज छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये कवी कलशाचा सल्ला घेऊ लागले. त्यांंना छंदोगामत्य ही पदवी बहाल केली. अष्टप्रधान मंडळाचे महत्व कमी झाले.

कवी कलशामुळे अण्णाजी दत्तो सारख्या अष्टप्रधानांचा जळफळाट होऊ लागला. त्यांच्या बद्दल अनेक अफवा पसरवण्यास सुरवात याच काळात झाली. कवी कलश हा संभाजी महाराजांना गूढ विद्या शिकवतो, त्यांना मदिरेचे सवय लावतो असे घाणेरडे आरोप सुरु करण्यात आले.

याला वैतागून कवी कलशांनी महाराष्ट्र सोडुन उत्तरेत परत जाण्याची तयारी केली परंतु संभाजी राजांनी

“तुमच्या एवढा भरवसा आम्ही दुसर्‍या कोणावर ठेवु शकत नाही”

असे ठणकावुन सांगत आग्रह केला व यामुळेच कवी कलश थांबले. त्यांनी आपल्या कर्तव्यात कोठेही कुचराई येऊ दिली नाही.

कवीराज कलश मोठे पराक्रमी व रणनितीकार देखील होते.

त्याने संभाजी राजांच्या गैरहजेरीत शहाबुद्दीन खानाचे रायगडावरील आक्रमण वेशीवरच मोडुन काढले. याच कलशावर राजांनी कुडाळ व डीचोलीचे बारुदखाने चालवण्याची जबाबदारी दिली होती. याच कलशांनी गणोजी शिर्केंच्या फितुरीनंतर पन्हाळा मुघलांच्या घशात घालण्याचा डाव केला होता तो हाणून पडला.

संभाजी महाराजांचा कवी कलशावर इतका विश्वास होता की तो  शेवटपर्यंत सावलीप्रमाणे त्यांच्या सोबत राहिला.

जेव्हा स्वराज्याचा खात्मा करण्यासाठी मुघल बादशहा औरंगजेब स्वतः दक्षिणेत उतरला तेव्हा त्याचा सामना कसा करायचा याची योजना बनविण्यासाठी संगमेश्वर येथे संभाजी महाराजांनी निवडक लोकांची बैठक घेतली. त्यात कवीराज कलशही हजर होते.

पण दुर्दैवाने औरंगजेब बादशहाला ही बातमी कळाली व त्याने पन्हाळ्याजवळ असणाऱ्या मुकर्र्बखानाला संभाजी राजांना पकडण्याच्या गुप्त मोहिमेवर पाठवले.

घात झाला. संगमेश्वरी स्वराज्याचे छत्रपती शंभूराजे मुघलांच्या तावडीत सापडले. कवी कलश तेव्हा देखील संभाजी राजां सोबतच होते. ते देखील लढता लढता महाराजांच्या सोबत कैद झाले. मुकर्रब खानाने त्यांना बहादूरगडावरील औरंगजेबाच्या छावणीकडे नेले.

औरंगजेबाने त्यांचा प्रचंड छळ केला. संभाजी महाराजांना धर्मांतर करून आपला मांडलिक होण्यासाठी राजी करण्यास या कवीचा उपयोग होईल असे बादशहाला वाटत होते. त्याने कलशाला वेगवेगळी आमिषे दिली. पण कवीराज बधले नाहीत.

संभाजी महाराजांसोबत त्यांंचेही अतोनात हाल करण्यात आले. अस म्हणतात की या प्रसंगी कवी कलशाने संभाजी महाराजांवर एक काव्य रचलं होतं आणि साखळदंडानी बंदिस्तअशा अवस्थेत औरंगेजेबासमोर ते म्हणून हि दाखवलं होतं.

यावन रावन की सभा संभु बंध्यो बजरंग,

लहू लसत सिंदूर सम खूब खेल्यो रनरंग,

ज्यो रबी छबि लखतही खद्योत होत बदरंग,

त्यो तव तेज निहारके तखत त्यजो अवरंग …

याचा अर्थ असा की

रावणाच्या सभेत शिष्टाई करण्यास आलेल्या बजरंगाला ज्या प्रकारे बांधून ठेवले होते , त्या प्रमाणेच हे शंभू राजा तू आज येथे बांधला गेला आहेस. युद्ध करताना तुझ्या अंगास झालेल्या जखमांमुळे आणि त्यातून वाहणाऱ्या रक्तामुळे तू अंगास शेंदूर फासलेल्या हनुमानाप्रमाणे भासत आहेस. ज्या प्रमाणे तेजो भास्कर रवी म्हणजे सूर्य उगवला कि परप्रकाशी काजवे निस्तेज होवू लागतात त्या प्रमाणेच याही अवस्थेतील तुझे तेज सहन होत नसल्यामुळे , हा यवनाधाम औरंग्या स्वतःचे सिंहासन सोडून तुझ्यापुढे नतमस्तक झाला आहे !!!!

हे काव्य ऐकून रागाने लाल झालेल्या औरंगजेबाने या त्याची जीभ हासडन्याची आज्ञा दिली. संभाजी महाराज व कवी कलश या दोघांचेही डोळे फोडण्यात आले. त्यांची विदूषकाचे कपडे घालून धिंड काढली. पण त्यांनी हे अत्याचार सहन केले पण आपला ताठ बाणा सोडला नाही.

इतके झाल्यावरही शेवटचा प्रयत्न म्हणून औरंगजेबाने कवी कलशा कडे एक पत्र दिले व त्यावर सही करायची मागणी केली. ते पत्र महाराणी येसूबाईना रायगड खाली करून स्वराज्य मुघलांच्या हवाली करण्याबद्दल होतं.

पण शिवरायांच्या स्वराज्याच्या मिठाशी, शंभूराजांच्या मैत्रीशी कवी कलशाने बेईमानी करणे शक्यच नव्हते.

स्वराज्य धर्माच रक्षण करणारे संभाजी महाराज व त्यांच्या सोबतीला कवी कलश यांचा शिरच्छेद करण्यात आला. त्यांच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आली. पण त्यांचं हौतात्म्य वाया गेल नाही. त्यांच्याच रक्ताची शपथ घेऊन अनेक मावळे पेटून उठले व शिवरायांच्या स्वराज्याची कीर्ती दिगंतात पोहचवली.

आजही तुळापुर येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी शेजारी कवीराज कलश यांची देखील समाधी उभी आहे.

संदर्भ- शिवकाल 1630 ते 1707

हे ही वाचं भिडू.

3 Comments
  1. Balkrishna Khair says

    सातारा त छत्रपती ऊदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजीराजे यांचे मंदिर स्थापन करावे महाराष्ट्र धर्म छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा पगड जातीना एकत्र बांधून जगवला . दक्षिणेत घरोघरी छत्रपती शिवाजी महाराजांची दररोज पुजा होते महाराष्ट्रात ही भव्य मंदिर व्हायलाच हवे.

  2. Sujit Gavhane says

    2G फोनमध्ये लेखांचे काही अक्षरे गाळले जात आहेत. कृपया काहीतरी व्यवस्था करावी.

  3. विश्वा जाधव says

    भावा छत्रपती संभाजी महाराजांनी कवी कलश याना कुलमुखत्यार पदाची जबाबदारी दिली होती याचा तात्कालीन संदर्भ भेटेल का

Leave A Reply

Your email address will not be published.