आधी मोदींना गुपचूप सपोर्ट करणारे केसीआर आता थेट त्यांच्याविरोधात नेते उभे करतायेत
केंद्रात भाजप सत्तेत आहे. सलग दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या भाजपला विरोधी पक्ष जमेल तितका आणि शक्य तितका विरोध करत आहेत. यात काही पक्ष आघाडीवर आहेत त म्हणजे, समाजवादी, तृणमूल आणि काँग्रेस देखील बाकी प्रादेशिक पक्षांचा देखील मोठा वाटा यात आहे.
यात काही राज्याचे मुख्यमंत्री देखील आघाडीवर आहेत त्यातलेच एक म्हणजे तेलंगणाचे मुख्यमंत्री. के चंद्रशेखर राव….केसीआर !
केसीआर आणि त्यांचा पक्ष, तेलंगणा राष्ट्र समिती किंवा टीआरएस यांनी संसदेतील महत्त्वाच्या बाबींवर भाजपची बाजू घेत आले आहे. थोडक्यात त्यांच्यावर अनेकदा असा आरोप होत आलाय कि, भाजपची सत्ता आली कि तुम्ही भाजपची बाजू घेताय. ज्यांची सत्ता त्यांच्या बाजूने चालायची अशी नीती कायमच केसीआर पाळत आलेत असं म्हणलं जातं.
पण अलीकडच्या काळात के. चंद्रशेखर राव हे सातत्याने भाजपवर हल्लाबोल करत आहेत. त्यात प.बंगाल च्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपला टक्कर देण्यासाठी तिसऱ्या आघाडीच्या बॅनरखाली सर्व पक्षांना एकत्र आणू पाहत आहेत.
त्याचदरम्यान आता के. चंद्रशेखर राव हे देखील ऍक्टिव्ह झाल्याचं कळतंय कारण राव हे आता राजकीय पक्षांना एकत्र करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांची बैठक घेणार आहेत. २०१९ च्या निवडणुकीपूर्वी बिगर-भाजप, बिगर-काँग्रेस आघाडी एकत्र करण्याचा KCR यांनी प्रयत्न केलेला पण तो प्रयत्न अयशस्वी झाला. पण केसीआर हार मानत नाहीत. त्यांनी यापूर्वीच एमके स्टॅलिन, तेजस्वी यादव, पिनाराई विजयन आणि डाव्या नेत्यांची भेट घेतली होती.
अलीकडेच त्यांनी त्यांच्या एका पत्रकार परिषदेत स्वाती चतुर्वेदी यांचे ‘I am a Troll’ हे पुस्तक दाखवत सोशल मीडियावरचे भडकाऊ, चिथावणीखोर संदेश आणि ट्रोलिंगच्या बाबतीत त्यांनी चर्चा केली आणि हे पुस्तक उपस्थित असलेल्या सर्व पत्रकारांना देखील वाटले आणि वाचायचे आवाहन देखील केले आहे.
Telangana CM #KCR garu talks about “I am a Troll” by Swati Chaturvedi (@bainjal) in press conference now! The same has been distributed to all the journalists present. #Telangana@KTRTRS pic.twitter.com/9ODKbt1yNH
— Y Sathish Reddy (@ysathishreddy) February 13, 2022
बरं के चंद्रशेखर राव हे काय अचानक मोदींच्या आणि भाजपच्या विरोधात उठलेत का तर नाही या आधी देखील त्यांनी अनेकदा भाजप सरकारवर हल्ला केला. गुजरात मॉडेल असो वा मोदींचा पोशाख असो केसीआर भाजपच्या विरोधात बोलतांना दिसतात.
त्याची कारणे तरी अशी दिसून येतात कि,
एक म्हणजे, राज्य विरुद्ध केंद्र आणि प्रादेशिक विरुद्ध राष्ट्रीय असा वाद
थोडक्यात केसीआर हे दोन्ही राष्ट्रीय पक्षांना, काँग्रेस आणि भाजपवर टीका करते आलेत कि, या पक्षांनी तेलंगणा राज्यांच्या गरजा पूर्ण केल्या नाहीत. राज्य विरुद्ध केंद्र आणि प्रादेशिक विरुद्ध राष्ट्रीय अशा वादात एक फॅक्ट असा कामी येतो तो म्हणजे जेंव्हा राष्ट्रीय पक्षांबद्दल देशात असंतोष वाढतो त्याचा फायदा प्रादेशिक पक्षांना मिळत असतो आणि म्हणूनच केसीआर या दोन्हींवर टीका करण्याची संधी शोधत असतो. हि राणीनीती देखील केसीआर यांच्या भाजपविरोधाचे कारण असू शकते.
दुसरं म्हणजे, राष्ट्रीय भूमिका –
केसीआर यांची राष्ट्रीय राजकीय महत्त्वाकांक्षा आहे हे तर साहजिकच आहे. पुढील सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी पंतप्रधानांना टार्गेट करणे हा एक व्यवहार्य आघाडीचा नेता म्हणून ओळखला जाण्याचा एक निश्चित मार्ग आहे. ज्या मार्गावर ममता बॅनर्जी देखील आहेत. थोडक्यात केसीआर ची राष्ट्रीय राजकारणाची भूमिका हि भविष्यात इतर विरोधी नेत्यांसमोर एक धाडसी भागीदार म्हणून सादर करते त्यामुळे राष्ट्रीय राजकारणात त्यांचं महत्व वाढेल.
तिसरं कारण तसं म्हणायला साधं वाटत असेल तरी महत्वाचं आहे ते म्हणजे केसीआर अस्खलित हिंदी बोलतात.
केसीआर हे अस्खलित हिंदी, इंग्रजी, तेलुगू आणि उर्दूमध्ये बोलतात. त्यांच्या पत्रकार परिषदेत ते जेंव्हा राष्ट्रीय भूमिकेवर बोलताना केसीआर तेलुगु आणि इंग्रजीमध्येच नव्हे तर हिंदीतही विस्तृतपणे आणि स्पष्टपणे बोलतात, विशेषत: केंद्र सरकारवर टीका करतांना ते हिंदीत आणि इंग्लिशमध्ये बोलतात. इतर जे दक्षिणेकडील नेते आहेत चंद्राबाबू नायडू, एमके स्टॅलिन किंवा देवेगौडा यांसारख्या इतर अनेक नेत्यांपेक्षा त्यांचा हा मोठा फायदा आहे. केसीआर यांची हिंदीत उत्तम संवाद साधण्याची क्षमता त्यांना राष्ट्रीय स्तरावर अधिक स्वीकारार्ह आणि लक्षवेधी बनवू शकते.
अलीकडेच सादर झालेला अर्थसंकलची तुलना तेलंगणा सरकारसोबत…
अलीकडेच केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला. केसीआर यांनी अर्थसंकल्पानंतरच्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर अशी टीका केली कि, भाजप मागास जाती, शेतकरी किंवा गरिबांची काळजी न करणारा पक्ष आहे. त्यांनी केंद्राने केलेल्या वाटपाचे आकडे शेअर केले आणि वंचितांचे खरे चॅम्पियन असल्याचे सुचवण्यासाठी त्यांची स्वतःच्या सरकारने केलेल्या वाटपांशी तुलना केली.
एक महत्वाचं कारण म्हणजे, तेलंगणा सरकारने आणलेल्या महत्वाच्या या ३ योजना ज्यांची केंद्र सरकारने कॉपी केली आणि स्वतःची योजना म्हणून त्याचे भांडवल केले.
त्यातली पहिली योजना म्हणजे, राईथू बंधू योजना जी प्रत्येक जमीन मालक शेतकऱ्याला प्रति एकर ₹८,००० देणारे थेट गुंतवणूक समर्थन करते, ज्याचे अनुकरण करत केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान योजना सुरु केली. केसीआर सरकारची प्रत्येक घरात नळ देण्याची मिशन भगीरथ योजना म्हणजे, ज्याचे अनुकरण करून केंद्राने हर घर जल- जल जीवन नावाची योजना सुरु केली. आणखी एक म्हणजे केसीआर सरकारची आरोग्यश्री योजना ज्याचे अनुकरण करत केंद्राने आयुष्मान भारत योजना सुरु केली. अशाप्रकारे केसीआर सरकारद्वारे सुरू केलेल्या योजना केंद्राने अनुसरण केले म्हणजे मोहनाची बाबा आहे.
राज्यामध्ये त्यांची आघाडी सुरक्षित आहे.
केसीआर हे निर्विवादपणे तेलंगणातील सर्वात महत्वाचे राजकीय नेते आहेत. त्यांच्या टीआरएस पक्षाचे ते निर्विवाद नेते आहेत तसेच त्यांच्या पक्षात कोणतेही मोठे अंतर्गत राजकीय संकट नाही. एक स्पष्ट उत्तराधिकार योजना आहे ज्याचा मुलगा केटी रामाराव एक तंत्रज्ञान-जाणकार नेता म्हणून उदयास आला आहे ज्यांनी नवीन पिढीला प्रभावित केले आहे. त्यामुळे केसीआरला त्याच्या घराच्या पलीकडे पाहण्याची आणि राष्ट्रीय भूमिका बजावण्यास मोकळीक मिळते.
स्थानिकांकडे दुर्लक्ष अन राष्ट्राकडे फोकस..
स्थानिक पातळीवर, केसीआर हे आक्रमकरित्या भाजप नेतृत्वावर टीका करते, जसे कि केंद्राने शेतकऱ्यांना काय दिले जाते, तरुणांना पुरेशा नोकऱ्या नाहीत, कथित कौटुंबिक राजवट आणि सत्तेचे केंद्रीकरण, कथित भ्रष्टाचार. परंतु यासाठी ते राज्यातील भाजप नेत्यांवर टीका करत नाहीत कि त्यांच्या आरोपांना उत्तर देत नाहीत. कारण त्यांना उत्तर देऊन त्यांना मोठं बनवायचं नाही त्यापेक्षा केंद्रावर टीका करून, थेट मोदींवर टीका करणं त्यांनी पसंद केलं.
शेतकऱ्यांचा राज्य सरकारवरचा संताप…
तेलंगणात भरघोस पीक आल्याने, खरेदी परवडणे तेलंगणा सरकारसाठी आव्हान बनले होते. रब्बीमध्ये अतिरिक्त पुरवठा कमी करण्यासाठी शेतकऱ्यांना भात पिकवू नये म्हणून केसीआर सरकारला भाजप नेत्यांनी दोष दिला होता. शेतकऱ्यांचा भलेही राग केसीआर सरकारवर होता तरी केसीआर यांनी धान्य खरेदी करण्यास नकार दिल्याबद्दल केंद्रावर दोष देऊन मोकळे झाले होते. पण ३ वादग्रस्त कृषी कायद्यांना घेऊन केसीआर सरकारने भाजपवर हल्ला केलेला. शेतीविषयक कायदे मागे घेण्याच्या एक दिवस आधी त्यांनी हैदराबादमध्ये शेतकऱ्यांचे महा-धरणे आयोजित केले आणि स्वतःला देशातील शेतकऱ्यांचा राजकीय आवाज म्हणून घोषित केले होते.
तेलंगणाला राज्याचा दर्जा मिळावा म्हणून त्यांचा प्रयत्न…केसीआर आग्रहीपणे सांगतात कि, तेलंगणाला राज्याचा दर्जा मिळावा यासाठी त्यांची दीर्घकाळ चाललेली मोहीम लोकांच्या पाठिंब्याने आणि सहभागाने चालविली लोकांनीच त्यांना प्रेरित केले होते. आता राज्यातील तरुणांनी देखील यासाठी उठून संघर्ष केला पाहिजे.
खरं तर केसीआर यांनी त्यांची राजकीय कारकीर्दची सुरुवात काँग्रेसपासून सुरुवात केली, एनटीआर सोबत ते तेलुगू देसमचे संस्थापक सदस्य होते, ते मुख्य प्रतिस्पर्धी चंद्राबाबू नायडू यांच्यापेक्षा वरिष्ठ आहेत, आंध्र प्रदेशात दोन वेळा राज्यमंत्री होते. त्यानंतर त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि भारतातील सर्वात तरुण राज्याला जन्म देणार्या आंदोलनाचे नेतृत्व केले. ते यूपीए २००४ ते २००६ मध्ये केंद्रीय मंत्री राहिले आहेत.
केंद्रीय राजकारण सोडलं तर शरद पवार, मुलायम सिंह यादव, शिबू सोरेन आणि लालू यादव यांसारख्या प्रमुख विरोधी नेत्यांशी त्यांचे वैयक्तिक समीकरण चांगले आहे. हे तर सुरुवातीपासून म्हणलं जातंय कि, केसीआर यांच्याकडे नेटवर्किंग आणि लॉबिंगचे कौशल्य आहे, जे कि त्यांच्या देशाच्या राजकारणात खूप कमी येणार आहे.
हे हि वाच भिडू :
- समलैंगिक सैनिकाची भूमिका असणारा चित्रपट बनवायच्या आधीच वादात सापडलाय
- आव्हाड म्हणतात तसं युपी बिहार सारखं महाराष्ट्रातला मुख्यमंत्री ओबीसी ठरवू शकतील का ?
- ग्रीटिंग कार्ड असु दे की टेडी भारतीयांना व्हॅलेंटाईनला गिफ्ट्सची सवय लावली ती या ब्रॅण्डनेच