ठाण्याचे जिल्हाध्यक्ष करून केदार दिघेंच्या रुपात ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना पर्याय दिलाय..

शिवसेनेत उभी फूट पडली, आमदार – खासदार, पदाधिकारी सेनेला सोडून जातायेत. जे सोडून नाही जात आहेत त्यांच्यावर ED चा दबाव असल्याचं सांगितलं जात आहे. संजय राऊत यांना आज ED ने ताब्यात घेतलं आहे. एकीकडे शिवसेनेला भलं मोठं भगदाड पडलं असतांनाच दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सेनेची पडझड रोखण्याचा शक्य तितका प्रयत्न करतायेत.  

आत्ता हीच पडझड रोखण्यासाठी शिवसेनेमार्फत केदार दिघेंची ठाण्याचे जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.

आज केदार दिघे यांची शिवसेनेकडून ठाणे जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे  केदार दिघे यांना ठाण्यात एकनाथ शिंदेंना ऑप्शन म्हणून शिवसेना पुढे करतेय का.? अशा चर्चा चालू झाल्या आहेत.

हे केदार दिघे कोण आहेत?

तर केदार दिघेंचा उल्लेख कायमच आनंद दिघेंचे पुतणे असाच केला जातो. मात्र आनंद दिघेंच्या सख्खा भावाचे ते पुत्र नाहीत. केदार दिघेंनी वयाच्या १९ व्या वर्षी आनंद दिघेंना अग्नी दिला होता.

आनंद दिघेंच्या नंतर ठाण्यात केदार दिघेंची ओळख वाढत गेली. ते आधीच राजकारणात होते मात्र २००६ मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तसेच ठाण्यात धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने “धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान” या समाजसेवी संस्थेची स्थापना केली. 

याच युवा प्रतिष्ठानमार्फत केदार दिघे ठाणेकरांशी जोडले गेलेत.

२०१३ साली त्यांना युवा सेनेचं निरिक्षक पद देण्यात आलं होतं. त्यानंतर काहीच वर्षांपुर्वी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी शिवसेनेत माझ्यावर अन्याय होतोय असं वक्तव्य केलं होतं.

“तब्बल ६ वर्षं सातत्यानं शिवसेनेचं काम करुन सुद्धा शिवसेनेनं मला शहर निरीक्षक पद दिलं नाही, तर ग्रामीण निरीक्षक पद देण्यात आलं. तरीही मी ग्रामीण भागात सेनेची सगळी घडी व्यवस्थित बसवली,” असं केदार दिघेंनी सांगितलेलं. 

वयवर्षे ३८ झाल्यामुळे मी युवासेनेच्या पदावर थांबणं योग्य नाही असं सांगत केदार दिघेंनी नोव्हेंबर २०१७ मध्ये युवासेनेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. 

पण या राजीनाम्याचा अर्थ होता पक्षाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा प्रयत्न.

पण त्यानंतर पक्षाने त्यांना फार मोठी जबाबदारी दिलीच नाही. २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेकडे ठाणे शहर या विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी मागितली होती. पण शिवसेनेने त्यांना काही प्रतिसाद दिलाच नाही.

पण त्या वेळेस असं ठाम सांगितलेलं की,”२०१९ ची विधानसभा निवडणूक मी नक्की लढवणार, कुणी उमेदवारी देवो अथवा न देवो”

तेंव्हा केदार दिघेंना ‘आमच्याकडे या’ अशी ऑफर मनसेने दिली होती असं विधान त्यांनी स्वतः बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत केलं होतं. पण शिवसेना सोडायची कि नाही याबाबतचा योग्य निर्णय योग्य वेळी घेऊ असं ते म्हणाले होते..  

२०१९ मध्ये उमेदवारी न दिल्यामुळे केदार दिघे शिवसेनेवर नाराज होते. त्याचं एक कारण उमेदवारी न दिल्याचं जरी असलं तरी दुसरं कारण म्हणजे ठाण्यात आनंद दिघेंच्या नंतर एकनाथ शिंदे यांनी केदार दिघे यांचे पक्षात पंख छाटले होते अशी ठाण्यात चर्चा असते. 

त्यामुळे केदार दिघे हे काही काळ पक्षापासून दूर गेले होते.

पण ते पिक्चरमध्ये कधी आले तर एकनाथ शिंदेच्या बंडानंतर..

जसं एकनाथ शिंदेंचं बंड सुरु झालं तसंपूर्वी शिवसेनेवर नाराज असलेल्या केदार दिघे ऍक्टिव्ह झाले. २० जूनला विधानपरिषदेची निवडणूक पार पडली. २१ जूनच्या पहाटे एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांना घेऊन सुरतला पोहचले आणि इकडे महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ उठलं. 

शिवसेना भवनच्या बाहेर शिवसैनिकांनी गर्दी केली होती काही मोजके नेते ही सांभाळत होते त्यात केदार दिघे देखील होते. आनंद दिघे यांचे पुतणे म्हणून केदार दिघे पिक्चर मध्ये आले.

आधी शिवसेनेवर नाराज असलेल्या केदार दिघेंनी एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आपली भूमिका बदलली आणि शिंदेंवर टीका करत असं भाष्य केलं “ज्या संघटनेने तुम्हाला सर्वकाही दिले, त्या संघटने विरोधात जाताना विचार करायला हवा होता, दिघे साहेब असते तर ही वेळच आली नसती” असं मत व्यक्त केलं.

मागच्या आठवड्यात केदार दिघे यांची ठाणे जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झालेली मात्र आता सेनेनं त्यांना ठाणे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपवली आहे.

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेची पुढील वाटचाल कशी असेल याबाबत त्यांनी स्वतःची भूमिका मांडायला सुरुवात केली.  एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे ठाण्यातील शिवसेनेच्या नेतृत्वामध्ये स्पेस निर्माण झालीय.  

ठाण्याचं नेतृत्व आता कोणाकडे अशी चर्चा सुरु झाली आणि त्यात केदार दिघे समोर येऊ पाहत आहेत. 

ते वेळोवेळी असं सांगतायत कि, “आता दिघे आडनावाचे वलय असेल तर संघटनेसाठी तेच काम करून संघटना जुन्या आणि नव्या शिवसैनिकांमध्ये घरा घरात जाऊन रुजवेन”…याचाच अर्थ केदार दिघे आपल्या “दिघे” आडनावाचं महत्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न करत आहेत. 

पण ‘दिघे’ आडनाव असलं तरी केदार दिघे नेमके कोण आहेत त्यांचं आनंद दिघेंसोबत काय नातं होतं याबाबत मुक्त पत्रकार रवींद्र पोखरकर बोल भिडूशी बोलताना सांगतात कि,

“दिघेंना एक बहिण आहे. एक सख्खा भाऊ होता तो अविवाहीत असतानाच वारला. केदार दिघे आनंद दिघेंचे सख्खे पुतणे नाहीत. तर ते आनंद दिघेंच्या चुलत चुलत भावाचा मुलगा आहे. दिघे साहेब सुरुवातीला ज्या संघर्षांतून जात होते तेंव्हा त्यांना जवळचं असं कुणी नव्हतं जेंव्हा त्यांचं राजकारणातलं वलय वाढत गेलं तसं तसं लांबचे लोकं देखील त्यांच्याशी जवळीक साधत गेले, याचं वैषम्य स्वतः आनंद दिघेंना देखील वाटतं असायचं”.

आता केदार दिघे हे आडनावाचा फायदा घेत स्वतःला मोठं करण्याचा प्रयत्न करतायेत, ते खरंच दिघेंचे कुणी जवळचे असते तर आनंद दिघेंनी त्यांना काही जबाबदारी देऊ केली असती. पण तस काही झालंच नाही. आता एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर जी काही पोकळी निर्माण झालीय, त्याचा राजकीय लाभ घेण्यासाठी केदार दिघे समोर येत आहेत” असं पोखरकर यांचं म्हणणं आहे..

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर ठाण्यात शिवसेनेला जबरदस्त नुकसान सहन करावं लागलं. त्यामुळे पक्षाला पु्न्हा उभारण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात आणि इतर भागांत आनंद दिघे यांच्या काळातील शिवसैनिकांवर जबाबदारी देऊ केल्यात. 

त्यात ‘दिघे’ नावाच्या वलयामुळे केदार दिघेंवर देखील ठाण्यातील शिवसेना वाचवण्याची जबाबदारी दिल्याचं बोललं जातंय..

कारण आदित्य ठाकरेंच्या गाडीत दिसलेले केदार दिघे आता शिवसेना नेतृत्वाच्या आणि मातोश्रीच्या अधिक जवळ जात असल्याचं दिसून येतंय. आजही केदार दिघे यांना जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी मातोश्रीवर बोलवून देण्यात आली आहे.

त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये केदार दिघे शिवसेनेसाठी एकनाथ शिंदेंचा पर्याय म्हणून दिसू शकतील का?  ठाण्यात एकनाथ शिंदेंनी निर्माण केलेली पोकळी हे केदार दिघे भरून काढतील का? की ही फक्त पॉलिटिकल स्टंटबाजी ठरेल ? हे येणाऱ्या काळातच कळेल.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.