केदारनाथ यात्रा सुरु झालीये… कसं जायचं, कुठे उतरायचं? सगळं समजून घ्या

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून केदारनाथ मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी बंद होते. पण भाविकांची दर्शन घेण्याची इच्छा आत्ता पुर्ण होणारे कारण ६ मेच्या सकाळी केदारनाथ मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी सुरू करण्यात आले आहेत.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्या उपस्थितीत वैदिक मंत्रांचे उच्चार करून केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. केदारनाथाची यात्रा ही वर्षातून फक्त सहा महिनेच करता येते. म्हणजेच साधारण नोव्हेंबर महिन्यापर्यन्त केदारनाथाची यात्रा करता येईल आणि त्यानंतर केदारनाथाच दर्शन पुन्हा बंद होईल..

आपल्यापैकी अनेकांची तर इच्छा असतेच की, कधीतरी केदारनाथाचं दर्शन घ्यावं. तर आता केदारनाथची ही यात्रा कशी केली जाते, कसं जायचं असतं. कुठे उतरायचं असतं हे समजून घ्या.

सर्वात पहिली गोष्ट म्हणजे केदारनाथ मंदिराची यात्रा कोण करु शकतं, तर करोनाच्या पार्श्वभूमीवर केदारनाथ मंदिराचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची संख्या आटोक्यात ठेवण्याच्या हेतूने उत्तराखंड सरकारने भाविकांची संख्या निश्चित केली आहे.

त्यानुसार केदारनाथचं दर्शन घेण्यासाठी प्रतिदिन १२ हजार, बद्रिनाथचं दर्शन घेण्यासाठी प्रतिदिन १५ हजार, गंगोत्रीचं दर्शन घेण्यासाठी प्रतिदिन ७ हजार आणि यमुनोत्रीचं दर्शन घेण्यासाठी प्रतिदिन ४ हजार भाविकांची संख्या निश्चित करण्यात आलीये. 

महत्वाचं म्हणजे या यात्रेदरम्यान कोविड व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट किंवा कोरोनाचे निगेटिव्ह रिपोर्ट असणं गरजेचं नाहीये, उत्तराखंडमध्ये करोनो नियंत्रणात आल्याने करोनासंबधित कागदपत्रांची पुर्तता करण्याची गरज नसल्याचं उत्तराखंड सरकारने सांगितलं आहे.  

आत्ता पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे केदारनाथला कसं पोहचायचं…. 

उत्तराखंड राज्यात केदारनाथधाम आहे. इथून सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन २०१ किलोमीटर अंतरावर  ऋषिकेश रेल्वे स्टेशन आहे. शिवाय हरिद्वार हे सर्वात जवळचं आणि मोठ्ठ रेल्वे स्टेशन आहे, जे इथून २२५ किलोमीटरवर पडतं.

हरिद्वारपासून गौरिकुंडचा रस्ता हा बारा तासांचा आहे. पर्वतीय भाग असल्याने एकसलग हा प्रवास करता येत नाही. आणि त्यामुळेच श्रीनगर किंवा देवप्रयाग इथे एक मुक्काम करुन दुसऱ्या दिवशी गौरीकुंडला पोहचण्याचा सल्ला दिला जातो.

या प्रवासात हरिद्वार ते ऋषिकेश २४ किलोमीटर, ऋषिकेश ते देवप्रयाग ७१ किलोमीटर, देवप्रयाग ते श्रीनगर ३५ किलोमीटर, श्रीनगर ते रुद्रप्रयाग ३२ किलोमीटर, रुद्रप्रयाग ते गुप्तकाशी ४५ किलोमीटर, गुप्तकाशी ते सोनप्रयाग ३१ किलोमीटर आणि सोनप्रयाग ते गौरिकुंड ५ किलोमीटरचा प्रवास घडतो. 

या प्रवासात पाहण्यासारखी अनेक ठिकाणं तर आहेतच शिवाय हॉटेल्सची, जेवण्याची सोय सुविधाही उपलब्ध आहे.

शेवटच्या गौरिकुंड ठिकाणापासून १६ किलोमीटरचा केदारनाथ मंदिराचा पायी मार्ग सुरू होतो.  १६ किलोमीटरवर असणाऱ्या केदारनाथ मंदिराच्या ह्या मार्गावरून चालत जाण्यासाठी संपूर्ण दिवस जातो. साधारण व्यक्तीला हा रस्ता पार करण्यासाठी १२ तास लागतात. तुम्हाला जर चालणं अवघड पडत असेल तर, गौरिकुडंपासून पायी मार्ग सुरू होतानाच तुम्ही खेचर घेवू शकता. 

केदारनाथ यात्रेचा हा मार्ग सर्वात खडतर मार्ग मानला जातो. गौरिकुंडमध्ये लॉकरची सुविधा असल्याने जड सामान तुम्ही खालीच लॉकरमध्ये ठेवून एक दिवसाच्या मुक्कामासाठी आवश्यक असेल तितकंच सामान घेवून जावू शकता.

पण या सामानामध्ये प्राथमिक औषध उपचारांच्या वस्तू, पाणी, बॅटरी असणं आवश्यक असतं. पायी प्रवासात स्पोर्ट शूज् आणि गरज भासल्यास रेनकोटही जवळ असणं गरजेचं असतं कारण इथे अचानक आणि कधीही पाऊस पडू शकतो.

सोबतच पहाटे आणि रात्रीच्या वेळी तापमान कमी होत असल्याने स्वेटरही सोबत ठेवणं गरजेच असतं. 

जर १६ किलोमीटरच्या ह्या पायी मार्गावरून चालत जाणं शक्य नसेल तर गुप्तकाशी पासून केदारनाथपर्यन्त हेलिकॉप्टर सेवा देखील आहे. साधारण ७७५० रुपये तिकीट देवून तुम्ही केदारनाथचं दर्शन घेवून परत येवू शकता.

चालत गेल्यास तुम्हाला केदारनाथ मंदिरापर्यन्त पोहचण्यासाठी दुपार किंवा संध्याकाळ होते. तिथे गेल्यानंतर परतीचा मार्ग लगेच पकडणं शक्य नसतं. आणि शिवाय तिथलं वातावरणही मुक्काम करण्यासारखच आहे.

तिथे आश्रमशाळा, धर्मशाळा आहेत. पुरेशा संख्येत आश्रमशाळा असल्याने मुक्कामाचा प्रश्न उद्भवत नाही. केदारनाथ इथे मुक्काम करून दुसऱ्या दिवशी तुम्ही पुन्हा खाली गौरिकुंडच्या दिशेने येवू शकता. 

गौरिकुंड, गुप्तकाशी इथे हॉटेल्सची सुविधा उत्तम आहे. एकंदरित केदारनाथची ही यात्रा तुम्हाला निसर्गाचा आणि अध्यात्माचा चांगला अनुभव देवू शकते. तुम्ही जर या यात्रेला गेला असाल तर तुमचे अनुभव नक्की कमेंट करुन सांगा. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.