जाऊंगा कहा, रहूंगा यही ..किसी किवाड पर, हाथ के निशाण की तरह पडा रहूंगा- केदारनाथ सिंग

जाऊंगा कहा..रहूंगा यही ..किसी किवाड पर..हाथ के निशाण की तरह पडा रहूंगा असं म्हणताना जमिनीशी असणारी आपली नाळ सांगणारे हिंदीतील प्रख्यात कवी केदारनाथ सिंग यांनी काल जगाचा निरोप घेतला. दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये वयाच्या ८३ व्या वर्षी त्याचं निधन झालं. त्यांच्या जाण्यानं हिंदी कवितेतील एका युगाचा अस्त झालाय.

जाणून घेऊयात डॉ.केदारनाथ सिंग यांच्याबद्दल –

  • केदारनाथ सिंग यांचा जन्म १९३४ मध्ये उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील चकिया गावात झाला. त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून हिंदी साहित्यात पीएचडी केली. त्यानंतर दिल्लीतील जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये भारतीय भाषा केंद्राचे प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर ते निवृत्त झाले.
हिंदी कविता कोश
  • महान कवी असण्याबरोबरच ते एक विद्यार्थीप्रिय शिक्षक देखील होते. ‘राम की शक्तीपूजा’ ही निरालाची प्रसिद्ध कविता अतिशय सोप्या शब्दात समजावून सांगण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांच्याइतकी ताकदीने ही कविता समजावून सांगणं कुणालाच जमलेलं नाही, असं त्यांचे विद्यार्थी सांगतात.

 

  • ‘हिंदी कवितेतील एक पिढी घडवणारा कवी’ म्हणून हिंदी साहित्यात त्यांच्याकडे अतिशय आदरानं बघितलं जात असे. हिंदीतील अनेक नवोदित कवींवर त्याच्या कवितेची छाप बघायला मिळते.

 

  • आपल्या कवितेतून आधुनिकतेला स्पर्श करताना ग्रामीण जीवनाशी असलेली त्यांची नाळ कधीच तुटली नाही. त्यांच्या अनेक कवितांमध्ये ग्रामीण जीवनाचं प्रतिबिंब पडलेलं बघायला मिळतं. परंपरा आणि नाविण्य या दोन्हीही बाजू आपल्या काव्यातून अतिशय सक्षमपणे हाताळू शकलेल्या मोजक्याच कवींमध्ये त्यांचा समावेश होतो.
हिंदी कविता कोश
  • शैक्षणिक जीवनातील बराचसा काळ त्यांनी बनारसमध्ये घालवला. त्यामुळे त्यांच्या साहित्यिक कारकीर्दीवर बनारस शहराचा मोठा प्रभाव बघायला मिळतो. ‘बनारस’ ही त्यांची कविता खूप लोकप्रिय ठरली. ‘बाघ’ ही त्यांची दिर्घकविता तर हिंदी कवितेतील मैलाचा दगड मानली जाते.

 

  • ‘अभी बिलकुल अभी’ हा त्यांचा नवगीत संग्रह खूप गाजला. त्यानंतर आलेल्या ‘जमीन पक रही है’ या काव्यसंग्रहातून आधुनिकतेची कास धरू पाहणारी त्यांची कविता वाचकांना भेटली. ‘बाघ’ ‘उत्तर कबीर’ हे देखील त्यांचे महत्वाचे काव्यसंग्रह. २०१४ साली आलेला ‘सृष्टी पर पहरा’ हा त्यांचा शेवटचा काव्यसंग्रह ठरला. त्यांच्या अनेक कवितांचा अनुवाद इंग्रजी, जर्मन, स्पॅनिश, रशियन इ. भाषांमध्ये झालेला आहे.
हिंदी कविता कोश

 

  • त्यांच्या १९८८ साली प्रकाशित झालेल्या ‘अकाल में सारस’ या काव्यसंग्रहाला १९८९ साली ‘साहित्य अकादमी’ आणि २०१३ साली साहित्यातील सर्वोच्च समजला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. त्यावेळी ते हिंदीतले ज्ञानपीठ प्राप्त दहावे कवी ठरले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.