केदारनाथ मंदिराला सोन्याने मढवण्यात येणार पण पुरोहित विरोध करत आहेत कारण…
तिरुपती असो की सोमनाथ भारतातील अनेक हिंदू मंदिरं ही आपल्या सुवर्णजडित भिंती आणि कळसांमुळे अतिशय श्रीमंत आणि वैभवशाली दिसतात. देवी-देवतांना आणि मंदिरांना सोन्या-चांदीने मढवण्याची परंपरा हिंदू धर्मात पूर्वीपासूनच आहे.
श्रद्धेपोटी भक्ताकडून देवाला किंवा मंदिराला सोनं-नाणं अर्पण केलं जात असेल तर मंदिर समिती त्याचं स्वागतच करते. परंतु केदारनाथ मंदिराचे काही पुरोहीत मात्र अशा गोष्टीला विरोध करत आहेत. एवढंच नाही तर यासाठी मंदिरासमोर योगासने करून आंदोलन सुद्धा केलं जातंय.
पण इतर हिंदू मंदिरांवर सोनं-नाणं चढवलं जात असतांना केदारनाथच्या पुरोहितांचा गट याला विरोध का करत आहेत?
तर यामागे दोन कारणं सांगितली जात आहेत. पहिलं कारण असं सांगण्यात येतंय की, भिंतींवर सोनं चढवल्यामुळे भिंतींच्या बांधकामाला धक्का बसेल आणि त्याचं नुकसान होईल. तर दुसरं कारण असं की, केदारनाथ मंदिर वैभवाचं प्रदर्शन करण्याचं स्थान नसून मुक्तीचं स्थान आहे, त्यामुळे या मंदिरावर सोनं चढवणे योग्य नाही.
पण पुरोहितांचा एक गट जरी याला विरोध करत असला तरी दुसरा गट आणि मंदिराची विश्वस्त समिती मात्र मंदिराला सोन्याने मढवण्याचं समर्थन करतेय.
समर्थकांचं म्हणणं असं आहे की, हिंदू मंदिरांना सोन्याने मढवण्याची परंपरा चालत आलेली आहे. कालानुरूप मंदिरांमध्ये बदल केले जातात. पूर्वी केदारनाथ मंदिराचं छत लाकडं आणि गवतापासून बनवलं जात होतं. मात्र आता लाकुड आणि तांब्यापासून बनवलंय. त्यामुळे होणाऱ्या कामाला विरोध करणं चुकीचं आहे. दोन पक्षात चाललेल्या या वादामध्ये कुणाचं कितपत योग्य आहे हे समजून घेण्यासाठी मंदिराचा इतिहास आणि बनावट समजून घ्यावी लागेल.
या केदारनाथ मंदिराचं बांधकाम कत्युरी शैलीमध्ये करण्यात आलंय.
पण या मंदिराच्या बांधकाम वर्षाची निश्चित नोंद नाही. पण इ. स. ७०० ते १०५० च्या दरम्यान असलेल्या कत्युरी राजवटीच्या काळामध्ये आठव्या शतकात आदी शंकराचार्यांनी या मंदिराची निर्मिती केली असं सांगितलं जातं.
तर दुसऱ्या नोंदीनुसार ग्वाल्हेरच्या एका शिलालेखाच्या आधारावर १०७६ ते १०९९ या काळात राजा भोज यांनी या मंदिराची निर्मिती केलीय असं सांगितलं जातं. तर प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ राहुल सांस्कृत्यायन यांनी या मंदिराची निर्मिती १२ ते १३ व्या शतकात करण्यात आली होती असं सांगितलं होतं.
या नोंदींमध्ये मतभेद असले तरी मंदिर साधारणपणे ७०० ते १२०० वर्ष जुनं आहे.
सहा फूट उंच चौथऱ्यावर बांधण्यात आलेल्या या मंदिराचं बांधकाम हिमालयातल्या राखाडी दगडापासून करण्यात आलंय. या मंदिराचे गर्भगृह, मध्यभाग आणि सभामंडप असे तीन भाग आहे. यावर लाकूड, तांबा आणि लोखंडी पत्र्यांची छत आहे. सोबतच कळसावर सोन्याचा मुलामा चढवण्यात आला आहे.
यापूर्वी मंदिराच्या आतील भिंतींना ८ मिमी जाडीचे तांब्याचे पत्रे लावून सुशोभित करण्यात आलं होतं. मात्र २००४-०५ मध्ये ते तांब्याचे पत्रे काढून त्याजागी २६० किलो चांदीचे पत्रे लावण्यात आले होते.
पण आता महाराष्ट्रातील एका भक्ताने या चांदीच्या सजावटीऐवजी सोन्याच्या पत्र्यांनी सजावट करण्याची इच्छा व्यक्त केलीय.
त्यामुळे पूर्वीचे चांदीचे पत्रे काढून सजावटीचे काम सुरु करण्यात आलेय. या कामात ड्रिलिंग मशीनचा वापर केला जात आहे. या तिसऱ्या वेळेच्या कामात भिंतींना धक्के बसल्याने मनादिराच्या भिंतींना तडे जाण्याची शक्यता आहे. तसेच मूळ दगडी बांधकाम ज्या सुरेख पद्धतीने करण्यात आलंय त्याला भगदाडं पडल्यामुळे ते विद्रुप होण्याची शक्यता आहे.
हे थांबवण्यासाठी नवीन पत्र्यांच्या कामाला विरोध होतोय. तर केदारनाथ मंदिरावर श्रद्धा असलेले श्रद्धाळू याच्या पावित्र्याबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. ते सांगतात की,
‘भगवान शिव हे मुक्तिदाते आहेत. सांसारिक भावनांपासून मुक्त होणाऱ्या लोकांना ते मुक्ती प्रदान करतात. महादेव हे कधीही वैभवाच्या गोष्टींमध्ये रमले नाहीत ते वैरागी होते आणि हेच वैराग्य आणि मुक्ती प्राप्त करण्यासाठी भाविक केदारनाथला येतात. यावरच मंदिराच्या परंपरा अवलंबून आहेत त्यामुळे मंदिराला सोन्याचा मुलामा दिल्याने या परंपरा खंडित होतील.’ असं श्रद्धाळू सांगतात.
ते पुढे सांगतात की, ‘जेव्हा या मंदिराला सोन्याचा मुलामा नव्हता तेव्हा सुद्धा भाविक मंदिरात येत होते. त्यावरून हे सिद्ध होतं की भाविक सोनं चांदी बघायला नाही तर भक्तीपोटी देवाचे दर्शन करायला इथे येतात. त्यामुळे सोनं चांदी मंदिरावर चढवण्याची गरज नाही.’ असं ते सांगतात.
यासाठीच मंदिराचे पुरोहित संतोष त्रिवेदी, केदार सभेचे अध्यक्ष विनोद शुक्ला, अंकुर शुक्ला आणि भाविकांनी याला विरोध करण्यासाठी आंदोलन सुरु केले आहे. यासाठी ते सकाळी मंदिराच्या समोर गोळा होऊन योगासने करतात. तर रात्री चोरून लपून काम केलं जाऊ नये यासाठी मंदिराच्या दरवाज्यावर पहारा सुद्धा देत आहेत.
हे ही वाच भिडू
- मोदींच्या केदारनाथ दौऱ्याला तिथला पुरोहित वर्गच मोठा विरोध करत आहे..
- कोणतंही शुभ काम असो अंबानी नाथद्वाराच्या मंदिरात पोहचतात, त्याला मोठ्ठा इतिहास लाभलाय
- शिवाजी महाराज आग्र्याहून सुटले म्हणून बिथरलेल्या औरंगजेबाने काशी-मथुरेची मंदिरं पाडली..?