चंदीगडमध्ये भाजप आणि काँग्रेसच्या भांडणाचा फायदा ‘आप’नं घेतलाय

“दोघांच्या भांडणात तिसऱ्याच लाभ” ही गोष्ट तर तुम्ही ऐकली असेलच. तीच ज्यात एक गवळी गावागावात जाऊन लोणी विकायचा. एकदा चालून दमला म्हणून जंगलात झाडाखाली झोपला. याचाचं फायदा घेतला जंगलातल्या माकडांनी. दोन माकडांनी त्या गवळ्याकड लोण्याचं मडक पळवलं.

आता मडकं नेलं खरं पण दोघांमध्ये ते लोणी  मी खाणार का, तू खाणार यावरून भांडण झालं. ही भांडण तिथला एक बोका बारीक नजर ठेवून बघत होता. तो माकडांकडं गेला आणि म्हणाला, भांडू नका मी तुम्हाला त्या लोण्याचे दोन भाग करून देतो. त्यानं तराजू आणला आणि लोण्याच्या वाटण्या करायला बसला. 

पण त्या शहाण्या बोक्यानं ह्या पारड्यातलं लोणी जास्त, त्या पारड्यातलं लोणी जास्त असं करून दोन्ही पारड्यातलं लोणी स्वतःच खल्लास केलं आणि त्या दोन्ही माकडांना येड्यात काढलं. याच गोष्टीच तात्पर्य म्हणजे ‘दोघांच्या भांडणात तिसऱ्याच लाभ.’

आता तुम्ही म्हणाल ही गोष्ट आणि कशाला सांगताय. तर भिडू असचं काहीस पंजाबमध्ये सुरु झालंय. दोन्ही राष्ट्रीय स्तरावरच्या बड्या पक्षांचा म्हणजेचं भाजप आणि काँग्रेसच्या भांडणाचा फायदा. केरीवालांच्या आप’नं घेतला आणि निवडणुकीत चांगलीच बाजी मारलीये. 

म्हणजे झालं काय येत्या काही महिन्यांमध्ये पंजाबमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. ज्यासाठी सगळ्याचं पक्षांनी चांगली कंबर कसलीये. काहींनी तर पार आपले उमेदवार जाहीर करून प्रचाराचा गुलाल उधळलाय. एकापेक्षा एक आव्हानं, योजना जाहीर करत, आपण समोरच्या पेक्षा किती भारी हे दाखवून देण्याच्या मागं लागलाय.

आता ही विधानसभेची निवडणूक तर फायनल आहे, पण त्याआधी राज्यात सेमीफायनल झाली. म्हणजे पंजाबची राजधानी असलेल्या चंदीगडमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या. ज्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने खूप महत्वाच्या होत्या.

महानगरपालिकेच्या एकूण ३५ जागांसाठी २०३ उमेदवार रिंगणात होते. गेल्या २४ डिसेंबरला या निवडणुकांसाठी मतदान झालं. ज्याचे निकाल सगळ्यांनाच हँग पाडणारे आहेत. या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांचा पक्ष सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर आलाय. ज्याने राज्यातील सत्ताधारी  काँग्रेस आणि केंद्रातल्या भाजपला चांगलीच मात दिलीये.

चंदीगड महानगरपालिकेच्या या ३५ जागांपैकी आप पक्षानं १४ जागा जिंकल्यात, भाजपनं १२, काँग्रेसने फक्त ८ आणि अकाली दलाला एकचं जागा जिंकता आलीये. 

आता तसं पाहिलं तर या चंदीगड महानगरपालिकेवर भाजपची सत्ता होती.  भाजपचे रविकांत हे महापौर होते. पण आपने भाजपच्या महापौरांना सुद्धा घरी बसवलं. रविकांत १७ नंबरच्या वॉर्डमधून लढले, पण तिथं आपच्या  उमेदवाराने त्यांना ८२८ मतांनी पाडलं. एवढंच नाही तर चंदीगड भाजपचे अध्यक्ष अरुण सूद यांना सुद्धा आपली जागा गमवावी लागलीये. 

भाजपचं या चित्रामागे शेतकरी आंदोलनाचा मोठा हात असल्याचं बोललं जातंय. कारण केंद्रानं आणलेल्या तीन कृषी कायद्याचा सर्वात मोठा विरोधक गट हा पंजाब भागातलाचं होता.  त्यामुळे पक्षावर नाराजीचं हे उत्तर अपेक्षितचं होत.

त्यात काँगेसचे अवस्था तर त्याहून बेक्कार आहे. काँग्रेसला फक्त ८ जागा जिंकता आल्या. पण पक्षाने आपली ही अवस्था स्वतः करून घेतल्याचं बोललं जातंय. कारण जेव्हापासून निवडणुकांचं बिगुल वाजलय. काँग्रेसची भांडण अजूनसुद्धा संपायचं नाव घेत नाहीये. या भांडापायी काँग्रेस हायकमांडला पार आपला मुख्यमंत्री बदलावा लागला.

नवा मुख्यमंत्री येऊनही बाकीच्या पक्षांच्या आरोपांसोबतच पक्षातल्या नेत्यांचंच आपापसात पटत नाहीये. त्यामुळे जनतेने ह्यावेळी काँग्रेसकडे कानाडोळा करत नवीन पक्षाला संधी दिली.  आणि हाच नवीन पक्ष म्हणजे आम आदमी पार्टी. फक्त दिल्लीपुरती मर्यादित असलेला हा पक्ष पंजाबमध्ये दोन्ही बड्या पक्षांचा फायदा घेऊन मोठा होतोय एवढं मात्र स्पष्ट होतंय. 

पण इथं सुद्धा एक घोळ झालाय, म्हणजे आपने सगळ्यात जास्त जागा जिंकून पहिला नंबर तर गाठला, पण महानगरपालिकेत आपला महापौर पदासाठी आवश्यक असलेलं १८ नागरसेवकांचं संख्याबळ पक्षाला मिळालेलं नाही. त्यामुळे पालिकेवर सत्ता गाजवण्यासाठी आपला दुसऱ्या पक्षासोबत  हात मिळवणी करण्याशिवाय ऑप्शन नाहीये. आणि हा ऑप्शन काँग्रेसशिवाय दुसरं कोणीच नाही. 

पण या निवडणुकीवरून एवढं तर क्लियर होतंय कि, विधानसभेच्या आधीची सेमीफायनल आप’ने जिंकलीये. त्यामुळे फायनलमध्ये सुद्धा असचं काहीस चित्र पाहायला मिळू शकणार असा अंदाज तज्ज्ञ मंडळी बांधतायेत. 

हे हि वाच भिडू : 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.