एकेकाळी जिगरी असलेले मित्र आज जानी दुश्मन झालेत

नुकतंच राष्ट्रीय राजकारणात अरविंद केजरीवाल यांचं नाव बरच गाजलं. तसं तर त्यांचं नाव नेहमीच चर्चेत असतं मात्र यंदाचं वैशिष्ट्य हे होतं की यावेळी त्यांच्या एका जुन्या मित्रामुळे केजरीवाल यांना बरेच ट्रोल केल्या गेलं. त्यांचा हा मित्र म्हणजेच कवी विश्वास कुमार. विश्वास यांनी अरविंद केजरीवाल यांचं एक वाक्य सांगितलं ज्यामुळे मोठा गदारोळ माजला. अरविंद केजरीवाल यांना खलिस्तानी समर्थक म्हणून संबोधलं जाऊ लागलं.

एके दिवशी अरविंद यांनी मला सांगितलं की ते एकतर पंजाबचे मुख्यमंत्री बनतील किंवा स्वतंत्र राष्ट्राचे पहिले पंतप्रधान होतील, असं कुमार विश्वास यांनी सांगितलं. यानंतर सगळ्याच पार्टीचे लोक अरविंद केजरीवाल यांच्यावर तुटून पडले. सोशल मीडियावर त्यांच्या चर्चा होऊ लागल्या. अरविंद केजरीवाल यांनी देखील कुमार विश्वास यांच्यावर पलटवार केला. मात्र एकमेकावर शिरजोर होणारे हे दोन व्यक्ती एकेकाळी घट्ट मित्र होते. तेव्हा त्यांची मैत्रीण आज इतक्या कट्टर दुष्मनीत कशी बदली हा मोठा प्रश्न आहे.

या दोघांच्या मैत्रीचा दाखला २०११ मध्ये दिल्लीच्या रामलीला मैदानावर झालेल्या अण्णांच्या आंदोलनातून आपल्याला मिळतो. याच आंदोलनातून आम आदमी पक्ष अस्तित्वात आला आणि आज प्रत्येक निवडणुकीत हा पक्ष इतर राजकीय पक्षांसमोर आव्हान बनुन उभा आहे.

कुमार विश्वास आणि अरविंद केजरीवाल यांची मैत्री म्हणजे आज आपल्या भाषेत ‘ब्रदर्स फ्रॉम अनादर मदर’ अशी होती. 

अरविंद अनेकदा कुमार विश्वास यांना त्यांचा लहान भाऊ म्हणत. तर कुमार विश्वास यांनी देखील जेव्हा अरविंद निवडणुकीत उभे राहिले होते तेव्हा त्यांचा मनापासून प्रचार केला होता. त्याचे फोटो आजही सापडतात. मात्र त्यांच्या अशा दोस्तीत फूट पडली ती राज्यसभेच्या निवडणुकीपासून, जेव्हा राज्यसभेतील सीट कुमार विश्वास यांना मिळाली नाही.

दिल्लीच्या राज्यसभेत तीन जागा होत्या. २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने जवळपास ६७ जागा जिंकल्या होत्या. तेव्हा या तिन्ही जागांवर त्यांना आपले उमेदवार विजयी करता येत होते. त्यात कुमार विश्वास यांचं नाव गृहीत धरलं गेलं होतं. त्यांच्या मैत्रीमुळे निश्चितच त्यांना पद मिळणार असं सर्वांना वाटत होतं. मात्र जेव्हा तिकीट जाहीर झालं तेव्हा खेळ बदललेला होता. सुशील कुमार यांना उमेदवारी दिली गेली नव्हती. 

त्यातही इतर तीन नावांपैकी दोन नावांवर कुमार विश्वास संतुष्ट नव्हते. तेव्हा माध्यमांमध्ये अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात ते पहिल्यांदा बोलते झाले. तसं अगोदरही अनेकदा त्यांना पार्टीचे निर्णय आवडत नसले तरी ते बोलायचे नाही. मात्र पहिल्यांदा त्यांनी केजरीवाल यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला होता.

कुमार विश्वास यावरच थांबले नाही. या घटनेनंतर त्यांनी पक्ष देखील सोडून दिला. राज्यसभेची जागा न मिळणं हे एकमेव कारण नव्हतं. तर असं सांगितल्या जातं कुमार विश्वास नेहमीच स्वतःला अरविंद केजरीवाल यांच्या बरोबरीचे समजायचे. त्यामुळे जेव्हा अरविंद केजरीवाल यांनी मोदी विरोधात वाराणसी मधून निवडणूक लढवण्याचं ठरवलं तेव्हा कुमार विश्वास यांनी सुद्धा राहुल गांधी यांच्या विरोधात अमेठीमधून निवडणूक लढवण्याचा जाहीर केलं. अनेकदा कुमार विश्वास एकतर्फी विधान करतानाही दिसले.

सर्व राजकीय विश्लेषकांच्या मते, अरविंद केजरीवाल २०१५ मध्ये पूर्ण बहुमताने मुख्यमंत्री झाल्यानंतर पक्षाच्या संयोजकाच्या भूमिकेबद्दल कुमार विश्वास असहमत असल्याचंही म्हटलं जात होतं. 

त्यांच्या या ओढाताणीत एक मुद्दा म्हणजे पंजाब निवडणुका २०१७.

कुमार विश्वास अमेठीतून निवडणूक हरले होते. तेव्हा कुमार विश्वास यांच्याही मनात एक गुंता होता की वाराणसीमध्ये पक्षाची संपूर्ण संसाधनं आणि कार्यकर्ते अरविंदसोबत गुंतले होते. तर पंजाब विधानसभा निवडणुकीत देखील ही नाराजी उघडपणे दिसून आली. या निवडणुकीत कुमार विश्वास यांना स्टार प्रचारक बनवण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी भिद्रनवाले यांच्या विरोधात कठोर शब्दांचा वापर केलेला एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता.

ज्यामुळे संवेदनशील असलेल्या पंजाबच्या निवडणुकीत पार्टीला नुकसान होऊ शकतं, या शंकेनं पक्षाने कुमार विश्वास यांना प्रचारातून काढून टाकलं. यावेळी देखील ते नाराज झाले.

तेव्हापासून कुमार विश्वास यांच्याबद्दल काही ना काही तरी वाईट बोलत असतात. तर याला राजकीय बाजू देखील आहे. निवडणुकांच्या आधीच कुमार विश्वास त्यांच्याविरोधात असे वक्तव्य करतात. इतकंच नाही तर याचे पडसाद अरविंद केजरीवाल आणि कुमार विश्वास यांची मैत्री करून देणाऱ्या मनीष सिसोदिया यांच्या बाबतीतही उमटताना दिसत आहे.

अरविंद केजरीवाल आणि कुमार विश्वास यांची ही मैत्री मनीष सिसोदिया यांच्यामुळे झाली होती आणि आता कुमार विश्वास यांचे मनीष सिसोदिया यांच्याशी असलेले कौटुंबिक नातेही संपुष्टात आले असल्याचं सांगितल्या जातंय.

एकेकाळी जिगरी असलेले मित्र आज इतके कट्टर दुष्मनी निभावत आहेत की कधी-कधी टीकेच्या शब्दांच्या मर्यादाही विसरतात. मात्र राजकारण काहीसं असंच असतं असं बोलल्या जातं. मित्र कधी शत्रू बनतील सांगता येत नाही बॉस!

 हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.