मोदींना नडून नडून राहूल गांधीचं वय वाढलं मग केजरीवालांना कुठलं चेटूक सापडलय

आज पाच राज्यांच्या निवडणूकीचा निकाल लागतोय. तसं २०१४ नंतरच्या कोणत्याही निवडणूकीत अनपेक्षित अस काहीच घडत नाही. म्हणजे निकाल लागणार. कॉंग्रेस संपली, EVM मशीनमध्ये घोळ, कितीही आपटा येणार तर मोदीच वगैरे वगैरे चर्चा आत्ता कॉमन झाल्यात.

साहजिक अनपेक्षित काही झालं की जरा वेगळ वाटत. आजच्या निकालाचं वेगळंपण सांगायचं तर आम आदमी पार्टी पंजाबमध्ये सत्तास्थापनेच्या जवळ पोहचलाय. ११७ जागांपैकी ८८ हून अधिक जागांवर आप ने बाजी मारलेय. 

आत्ता मोदींच्या समोर भलेभले पक्ष गारद होत असताना “आप” च्या हातात अस कोणतं चेटूक घावलय की ते भाजपला थेट नडतायत याची चर्चा झाली पाहीजे. म्हणजे सहज सोप्या पद्धतीने ५ मुद्दे बघायला पाहीजेत जे आपला छोट्या छोट्या राज्यांत टकाटक पद्धतीने एस्टॅब्लिश करत आहेत.

पहिला मुद्दा मध्यमवर्ग समाज 

हे बघ भिडू मध्यमवर्ग समाजात पण दोन गट येतात. पहिला गट असतो तो शहरी मध्यमवर्गीय आणि दूसरा गट असतो ग्रामीण मध्यमवर्गीय. आप या दोन्ही फॅक्टरवर फोकस करताना दिसत. म्हणजे या मध्यमवर्ग समाजाचा सगळ्यात मोठ्ठा अडथळा असतो तो म्हणजे आपण मध्येच का अडकलोय.

गरिब आपली गरिबी झेलत असतो आणि श्रीमंत आपल्या श्रीमंतीत लोळत असतो. टेन्शनमध्ये असतो तो मध्यमवर्ग. आणि हा मध्यमवर्ग समाज प्रत्येक गोष्टीला व्यवस्थेला दोष देतो. प्रत्येक गोष्टीचं उत्तर भ्रष्ट्राचार आहे अस त्याचं ठाम मत असतं.

साहजिक अगदी जनलोकपाल आंदोलनापासून मध्यमवर्गीय समाज जोडून घेण्यात आप यशस्वी ठरला आहे. जगलोकपाल आंदोलनाच भूत लोकं विसरली असली तरी पक्षाची बेसिक आयटेंटिटि अजूनही आपने सोडलेली नाही.

दूसरा मुद्दा आहे शिक्षणाचा

विरोधक असो किंवा समर्थक. आप पक्षाने दिल्लीत शाळांच्या बाबतीत खरच चांगल काम केलय. हा फॅक्टर लय महत्वाचा आहे. शहरांमध्ये असणारं प्रायव्हेट स्कूलचं फॅड आत्ता गावखेड्यात पण पोहचलय. शहरातल्या मध्यमवर्गीय माणसाला सुद्धा आपल्या मुलांना प्रायव्हेट स्कूलमध्ये शिकवता येत नाही. अशा वेळी आप ने उभारलेलं मॉडेल कौतुक करणार ठरतं.

तिसरा मुद्दा येतो तो हॉस्पीटलचा.. 

समजा तुम्ही उच्चवर्गात आहात, तुम्ही मध्यमवर्गात आहात किंवा तुम्ही गरीब आहात तर हॉस्पीटल ही अशी एकमेव गोष्ट आहे जी तुम्हाला सरकन एक स्टेप खाली घेवून जाते. आपल्याकडे अजूनही “दवाखाना” मागं लागला की माणूस संपतो अस सांगितलं जातं.

आप पक्षाने आरोग्यावर भर दिला. मोहल्ला क्लिनिक ही संकल्पना २०१५ साली सुरू करण्यात आली. तस पहायला गेलं तर मोहल्ला क्लिनिक हे प्राथमिक आरोग्य केंद्रच. पण आपने या मोहल्ला क्लिनिकचं मार्केटिंग चांगल केलं. दिल्लीत जागांची कमतरता आहे. यावर उपाय म्हणून खूप मोठ्ठ हॉस्पीटल काढावं अशा गोष्टींवर भर न देता त्यांनी मोहल्ला क्लिनिक छोट्या छोट्या जागांवर कमी खर्चात उभारले. पंजाबमध्ये देखील सत्तेत आल्यानंतर १६ हजार मोहल्ला क्लिनिक उभारण्याच आश्वासन आपने दिलय.

आत्ता चौथा मुद्दा तो म्हणजे राशन, वीज आणि पाणी.. 

आप पक्षाची अवहेलना करताना फुकट खाणारे “आप” ला मत देतात अशी टिका विरोधकांकडून केली जाते. पण वीजेचा प्रश्न किती महत्वाचा आहे ते महाराष्ट्राला माहिताय. दिल्लीत सध्या ३०० युनिट वीज मोफत दिली जाते. दिल्ली प्रमाणे पंजाबमध्ये देखील मोफत वीज देण्यात येईल अस आश्वासन आप ने दिलं आहे. शिवाय मोफत राशन, शेतीसाठी वीज, किमान हमीभाव असे मुद्दे देखील अजेंडा घेवून मांडले आहेत..

पाचवा आणि शेवटचा मुद्दा केजरीवाल यांची अचूक क्षणी हातोटा मारायची स्ट्रॅटेजी 

जनलोकपाल आंदोलन झालं. गवगवा झाला. अण्णा परत राळेगणसिद्धीला आले. किरण बेदी राज्यपाल झाल्या. योगेंद्र यादव परत संपादकीय पानाच्या मागेपुढे लिहू लागले. कुमार विश्वास परत कविता गाजवू लागले. पण केजरीवालांनी डाव साधला. केजरीवालांनी योग्य क्षणी पक्षाची स्थापना केली.

केजरीवाल यांच्याकडे अचूक टायमिंग आहे. पंजाबमध्ये पण त्यांनी हे टायमिंग पकडलेलं. एकतर  पंजाबमध्ये भाजप पहिल्यापासून असून नसल्यासारखी आहे. त्यात केंद्र सरकारविरोधात कृषी कायद्यावरून राडे सुरू झाल्यानंतर लोकांनी भाजप बद्दल नकारघंटा सुरू केलेलीच होती. अशात कॉंग्रेस पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी आपल्या स्वभावधर्माप्रमाणे हागून दरबार भरवण्यास सुरवात केली. साहजिक आप ने हेच अचूक टायमिंग साधलं. गोव्यामध्ये देखील आप याच तयारीत होती.

साहजिक “आप” छोटी राज्य, शहरी भाग इथून विस्तारत जाताना दिसतोय. मोठ्या राज्यात आपचा कस लागणार असला तरी टिपीकल मध्यमवर्ग समाज आप ला पुर्णपणे टाळणार नाही अस देखील या निकालावरून स्पष्टपणे दिसतय.

हे ही वाच भिडू

 

Leave A Reply

Your email address will not be published.