संत तुकाराम महाराजांच्या पहिल्या चरित्रग्रंथाची गोष्ट..

तो काळ फार वैभवशाली होता, जेव्हा बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या राजश्रयाखाली मराठी भाषेत अनेक ग्रंथांची निर्मिती होत होती. स्वतः सयाजीरावांनी जगप्रसिद्ध 12 ग्रंथांचे भाषांतर करायचे ठरवले. याकामी अनेक महान इतिहासकार, लेखक आणि मराठी भाषेचे अभ्यासक त्यांनी बडोद्यास बोलावून घेतले.

तेव्हा बडोदा संस्थानचे दिवाण रामचंद्र धामणसकर यांनी एका तरुण लेखकाची शिफारस सायजीरावांकडे केली.

सयाजीरावांनी ‘त्या’ तरुणाला मुंबईस बोलावून घेतले. आधी त्याची खडसून तपासणी केली. तरुणाच्या हुशारीवर प्रसन्न झालेल्या महाराजांनी काही इंग्रजी ग्रंथांचे मराठीत भाषांतर करण्याचे काम त्या होतकरू, हुशार तरुणाकडे सोपवले. फ्रान्सच्या इतिहासावरील अनुवाद सयाजीरावांना एवढा आवडला की बडोद्याच्या बारा राष्ट्रकथामालेत त्या पुस्तकाचा समावेश करण्यात आला.

त्या पुस्तकाचे नाव होते ‘फ्रान्सचा जुना इतिहास’ आणि लेखक होते गुरुवर्य ‘कृष्णाजी अर्जुन केळुसकर’..

कृ. अ. केळुसकर हे महान इतिहासकार. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांवर मराठी भाषेत संशोधनात्मकरित्या पहिला ग्रंथ लिहिण्याचे काम केलेला इतिहास तपस्वी. त्यांच्यातील लेखकाला जागे केले, सयाजीरावांनी. सन 1883 साली प्रकाशित झालेल्या त्यांच्या पुस्तकामुळे केळुसकरांना नवीन ओळख मिळाली. तिथून पूढे गुरुजींच्या हातून अनेक मोठमोठे ग्रंथ लिहून झाले.

लोकमान्य टिळकांनी ‘गीतारहस्य’ लिहिण्याआधी केळुसकरांनी गीतेवर तब्बल ‘950’ पानांचा टिकाग्रंथ तयार केला होता. पण त्यांचे दुर्दैव पहा, हा एवढा मोठा ग्रंथ 22 वर्षे प्रकाशकाविना पडून राहीला. जर हाच ग्रंथ वेळेत प्रकाशित झाला असता, तर कदाचित लोकमान्यांच्या गीतारहस्य पेक्षाही जास्त लोकप्रिय ठरला असता. पण इतिहासात जर तर ला महत्व नसते. असो.

या गीतेवर लिखाण करत असताना केळुसकर पर्यायाने तुकाराम महाराजांच्या अभंगाकडे वळले.

तुकाराम महाराज म्हणजे सतराव्या शतकात होऊन गेलेले महान संत. सर्वसामान्य लोकांना समजेल अशी शिकवण देणाऱ्या या विद्रोही समाजसुधारकाकडून गीतेवर नक्कीच काहीतरी वाचायला मिळेल, या आशेने केळुसकरांनी तुकाराम महाराजांच्या अभंगांचा धांडोळा घेतला. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरचा काळ.

कवी महिपतीने लिहिलेले ओवीबद्ध चरित्र सोडले तर तुकाराम महाराजांवर कसलेही लिखाण झालेले नव्हते. एका इंग्रज अधिकाऱ्याने थोडक्यात का होईना पण तुकाराम महाराजांवर लेख लिहिलेला. एवढी दोन साधने सोडली तर तुकोबांच्या आयुष्याचा कोणताही धागदोरा हाताशी लागला नाही.

गुरुवर्य केळुसकरांनी तुकाराम महाराजांवर लिखाण प्रकाशित करायचे ठरवले.

सुरुवातीला ‘लक्ष्मण नागवेकर’ यांच्या ‘अध्यात्मिक ज्ञानरत्नावली’ मध्ये तुकाराम महाराजांवर 10 पाने आणि गीतेवरील टीका असलेली 40 पाने असे लिखाण प्रसिद्ध करायला सुरुवात केली. या लिखाणाला आधार होता तुकाराम तात्या पडवळ यांनी प्रकाशित केलेल्या ‘तुकारामबाबांच्या अभंगांची गाथा’. पुढे याच लिखाणाला नागवेकर यांनी एक स्वरूप द्यायचे ठरवले. केळुसकरांच्या या लिखाणाला एकत्र केले आणि सण 1896 साली तुकाराम महाराजांचे पहिले चरित्र प्रकाशित करण्यात आले.

मराठी भाषेत तुकाराम महाराजांच्या चरित्रावर आधारित पहिले पुस्तक गुरुवर्य केळुसकरांनी लिहीले. हे चरित्र होते तब्बल 208 पानांचे आणि किंमत होती सव्वा रुपया.

या पुस्तकाला सर्वोत्तम अभिप्राय न्यायमूर्ती रानडे यांचा आला आणि दक्षिणा प्राईज कमिटीने चरित्रग्रंथास पहिले बक्षीस सुद्धा देऊ केले. पुढे हे चरित्र मात्र सव्वाशे वर्षे दुर्लक्षित होते. जर सयाजीराव गायकवाडांच्या काळात लेखकांना प्रोत्साहन मिळाले नसते, तर कदाचित तुकाराम महाराजांच्या चरित्राची निर्मिती होण्यास अजून किती वर्षे वाट पाहावी लागली असती, सांगता येत नाही.

  • केतन पुरी

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. पै राकेश ससाणे says

    जय जगतगुरु संतश्री तुकाराम महाराज विनम्र अभिवादन 🙏

    धन्यवाद श्री राजे सयाजीराव गायकवाड तुमच्या दुरदृष्टी विचार मुळे हे चरित्र घडले.
    धन्यवाद केळुसकर सर .
    जगतगुरु तुकाराम महाराज यांच्या विचार हे लोककल्याणकारी व जागृती निर्माण करणे होते व हे मनुवादी ब्राम्हणी चोरांच्या धंदा बंद करण्यात आल्या मुळे त्यांचा ओव्या व ग्रंथ नष्ट करण्यात आल्या

Leave A Reply

Your email address will not be published.