सोलापूर जिल्ह्यातल्या एका छोट्या गावाने कुंकवाचा “ब्रॅण्ड” करुन दाखवला..

सोलापूर जिल्ह्याची ओळख पूर्वापार दुष्काळी भाग अशीच आहे. बेभरवश्याचा पाऊस, अस्मानी सुलतानी संकट यामुळे इथला शेतकरी कायम पिचलेला राहिला. आताशा कुठे उजनी धरणामुळे इथलं चित्र पालटलं  पण यापूर्वी फक्त शेतीवर अवलंबून राहण्यापेक्षा इतर जोड धंद्यातुन उदरनिर्वाह केला जात असे.

असच एक गाव आपल्या जोडधंद्यातून जगाच्या नकाशावर जाऊन पोहचलं.

करमाळा तालुक्यातील केम.

नागराज मंजुळेंच्या फॅन्ड्री आणि सैराटमुळे या गावाला तरुणाईत नवीन ओळख मिळाली. आजही अनेक पर्यटक फक्त सैराटचं शूटिंग लोकेशन शोधण्यासाठी कर्मलातालुका पालथा घालत असतात. या सिनेमात पण उल्लेख केलाय तसं केमची हलगी आणि इथलं कुंकू याचा नाद अख्ख्या महाराष्ट्रात कोणी करत नाही.

केमचा इतिहास मात्र अनेक वर्षे जुना आहे.

पुरातनकाळात क्षेम नावाच्या राजाने स्थापन केलेली नगरी म्हणून या गावाच नाव केम असं म्हणतात. इथल्या उत्तरेश्वर मंदिराचा इतिहास तरी असच सांगतो.

पण या गावाचं आणि कुंकवाचं नातं सुरु झालं दोनशे वर्षांपूर्वी.

कुंकू म्हणजे सुवासीनींसाठी सौभाग्याचं लेणं. आजकाल टिकलीची फॅशन आली असली तरी एकेकाळी कुंकू महिलावर्गासाठी मस्ट होतं. माहेरी आलेल्या लेकी बाळींचे स्वागत हळदी कुंकू लावून केलं जायचं. देवा धर्माच कोणतंही कार्य कुंकवाशिवाय अपूर्णच. अगदी रामायण महाभारताच्या पूर्वीपासून कुंकवाची हिस्ट्री सांगता येईल.

आजही महाराष्ट्राच्या कोणत्याही देवळाच्या बाहेर बघितलं तर स्टॉलमध्ये मोठमोठे हळदी कुंकवाचे ढिगारे दिसतात. चौकशी केली तर दुकानदार म्हणतो,

“कुंकू साधं नाही केमचं आहे !!”

मग अशा वेळी प्रश्न पडतो की केमच्या कुंकूवात असं स्पेशल काय आहे?

तर केमच्या कुंकवाचं सिक्रेट इन्ग्रिडिएंट आहे हळद. सांगलीच्या बाजारातून खास हळकुंडे आणली जाते. ही हळद टाकणखार आणि लिंबाचा रस यांच्या मिश्रणातून कुंकू बनवले जाते. पूर्वी घराघरात भल्या मोठ्या बैलजात्याने हळद दळली जात असे. जात्यावरची गाणी म्हणत दोन बैलांच्या साहाय्याने हे दळण चालायचं. दळलेली हळद इतर मिश्रणाबरोबर मिक्स करून ती वाळत घालावी लागायची.  

धूळ, पाऊस यांपासून ओल्या कुंकवाला जपावे लागायचे म्हणूनच विशेषतः पावसाळ्याचे दिवस सोडून हे कुंकू बनवण्याचं काम चालायचं. पावसाळ्यात आपापल्या शेतीच कामे सांभाळून सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये कुंकू बनवण्याचं काम सुरु व्हायचं.

केमचे वातावरण तिथल्या लोकांनी २०० वर्षे जपून ठेवलेली क्वालिटी यामुळे इथलं कुंकू आजही स्पेशल समजलं जातं.

केमने कुंकवाचादेखील ब्रँड असू शकतो हे जगाला दाखवून दिलं.

मध्यंतरी साठच्या दशकात केमच्या कुंकवाची मागणी अचानक घटली. हळदीचे वाढते भाव यामुळे कुंकवाचे ही दर वाढले होते. यातून केम करानी हळद सोडून इतर प्रकारे कुंकू बनवण्याचं तंत्र हस्तगत केलं. यातूनच चिंचोकेची पावडर बनवून त्याचं कुंकू बनू लागलं.

आज केम मध्ये पंचवीस प्रकारचं कुंकू बनतं. फक्त हळदच नाही तर विविध रंगांची रांगोळी, गुलाल, बुक्का, अष्टगंध आदी निर्मितीही गावातून होते.

यात नवं तंत्रज्ञान देखील आणण्यात आलंय. जवळपास पंचवीस कारखाने कुंकवाची निर्मिती करतात. रोज चाळीस ते पन्नास टन कुंकू या गावातून निर्यात होते. आज गाव उजनीच्या पाण्यामुळे उसाच्या शेतीने हिरवंगार बनलंय पण इथल्या गावकऱ्यांनी आपला जोड धंदा सोडला नाही. उलट गावाबाहेर जाऊन टेम्भूर्णी, पंढरपूर पुणे येथे देखील कारखाने सुरु केले आहेत. शासनाने देखील केमच्या कुंकवाच्या उद्योगाला लघु उद्योगाचा दर्जा दिलाय.

आज तुळजापूर, पंढरपूर, जेजुरी, भगवानगड इथं पासून ते वाराणसी, केदारनाथपर्यंत सगळीकडे केमचं कुंकूच लागतं. इतकंच काय तर आता इंडोनेशिया, इंग्लंड, अमेरिका, दक्षिण आफ्रिकेपर्यँत केम्च्या कुंकवाची निर्यात होते.

गेली दोनशे वर्ष केमने कधी बेरोजगारी पाहिलीच नाही. या कष्टाळू लोकांची मेहनत आहे म्हणूनच जगभरातल्या सुवाष्णीं केमचं कुंकू अभिमानाने लावतात.

सन्दर्भ- रवींद्र गोळे साप्ताहिक विवेक 

हे ही वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.