मुस्लिम देशाला सेक्युलर बनवणारा हुकूमशहा

पहिल्या महायुद्धानंतर युरोपची भूमी बेचिराख झाली होती. तुर्कस्तानच्या जनतेला त्याची नाहक झळ बसली. तेव्हा तिथे इस्लामचा खलिफा राज्य करत होता. अरबस्तानापासून ही परंपरा चालत आली होती. ब्रिटिशांनी इस्तंबूलचा ताबा घेतला होता. तुर्कीचा सुलतान हा ब्रिटिशांचा कळसूत्री बाहुला बनला होता.

पण तुर्कांच्यात एक महान नेता मुस्तफा केमाल पाशा उदयास आला आणि त्यानं आपल्या जनतेला वाचवलं. एखाद्या नायकाला शोभेल असं कर्तृत्व त्यानं गाजवलं आणि आज तुर्कीचा सुलतान आणि खिलाफत इतिहासजमा झाली आहेत. पवित्र इस्तंबूलची रोमन गादी आणि खिलाफत दोन्हींना खाली करून आज ती तुर्कांची राजधानीसुद्धा राहिली नाही, एवढे बदल त्याने केले.

तुर्कस्तानला ताब्यात घेऊन आपलं अखंड साम्राज्य बनवण्याचा ब्रिटिशांचा प्लॅन त्यानं हाणून पाडला. दोस्त राष्ट्रांच्या जबड्यातून तुर्कस्तान बाहेर ओढण्याचं काम त्यानं केलं. आणि एका महान राष्ट्राची पायाभरणी केली.

जेव्हा गांधीजी आणि इतर नेते खिलाफत चळवळीला पाठिंबा देत होते त्या काळात नेहरूंनी लिहिलेली ही वाक्ये मुस्तफा केमाल पाशाचा तत्कालीन जगातला प्रभाव सांगून जातात.

तुर्कस्तान आजही जगात ज्याच्या नावाने कुंकू लावतो तो माणूस म्हणजे केमाल पाशा. १९२४ साली त्यानं खलिफाला म्हणजे मुस्लिम जगाचा सत्ताधीश मानल्या जाणाऱ्या राजाला सिंहासनावरून खाली ओढलं. मागासलेल्या तुर्कस्तानात प्रजासत्ताक राज्याची स्थापना केली.

याला जेव्हा खलिफाकडून विरोध झाला तेव्हा या माणसानं त्याला निधड्या छातीनं सांगितलं –

“तुझा कारभार, तुझी खिलाफत म्हणजे फक्त इतिहासाचा अवशेष आहे. त्याच्या अस्तित्वाला कुठलाच अर्थ नाही.”

इथून पुढं तुझा उद्धटपणा माझ्यासमोर नाही माझ्या सचिवांसमोर दाखव, माझ्यासमोर नाही असं त्यानं एका पत्रात खलिफाला लिहून पाठवलं होतं.

तुर्कस्तानात जनता अडाणी आणि दरिद्री होती. म्हणून धर्माची सत्ता संपवून विज्ञाननिष्ठ, आधुनिक समाजनिर्मितीच्या कार्यक्रमाला त्यानं सुरुवात केली.

सरकारमध्ये धर्मखाते तयार करून लग्न आणि घटस्फोटच्या केसेस धर्म न्यायालयाकडून धर्मखात्याच्या मंत्र्याकडे सोपवले. ताईत, गंडेदोरे बंद केले. सामाजिक सुधारणा करताना त्याने लोकांचे पोशाखही बदलले. पुरुषांना फेज टोपी आणि लांब पैरह्णच्या जागी डोक्यावर जर्मन हॅट आणि पँट शर्ट घालणं बंधनकारक केले. लांबलचक दाढी ठेवण्यावर बंदी आणली.

त्याने स्त्रियांच्या सहभागासाठी आश्चर्यकारक वाटतील इतके पुरोगामी कायदे बनवले. स्त्री-स्वातंत्र्याची मोहीम राबवताना इस्लामचा बहुपत्नीकत्व कायदा रद्द केला. स्त्रियांनी बुरखा घेण्याची सक्तीही रद्द केली. त्याकाळी मुस्लीम स्त्रियांवर प्रचंड कौटुंबिक आणि सामाजिक बंधने होती. नवऱ्यासह बाहेर जाताना बायका थोडे लांब उभे राहून चालत. (महाराष्ट्रातही अशीच पद्धत होती.)

इतर पुरुषांबरोबर बोलणे म्हणजे गुन्हाच. केमालने हा ट्रेंड बदलायला घरातून सुरुवात केली. स्त्रियांच्या अशा रूढी बदलण्यासाठी त्यानं आपल्या बायकोला आधुनिक बनवलं. तिला युरोपियन स्कर्ट किंवा पँट शर्ट घालून इस्तंबूलमधील अनेक कार्यक्रमांत आपल्याबरोबर नेलं.

स्त्रियांना राजकारणातही सहभागी करून घेतलं. १९३५ साली सतरा स्त्रिया तुर्कस्तानच्या लोकसभेच्या निवडून आल्या हि त्याचंही कमाल होती.

तुर्कस्तानमध्ये तब्बल ९८ टक्के लोक मुस्लिम आहेत. केमाल पाशा १९२७ च्या तुर्की लोकसभेची निवडणुक जिंकला आणि नंतर दुसऱ्यांदा अध्यक्ष म्हणून नियुक्त झाला. यावेळी त्याने १९२८ साली घटनेत दुरुस्ती केली. ऑटोमन काळापासून तुर्कस्तानचा राजधर्म म्हणून इस्लामला मान्यता होती. केमालने इस्लाम हा तुर्की प्रजासत्ताकाचा धर्म असल्याचे कलम तुर्कस्तानच्या घटनेतून काढून टाकले.

५ फेब्रुवारी १९३७ ला घटनात्मक रित्या त्याने तुर्कस्तान धर्मनिरपेक्ष देश असल्याचे जाहीर करून टाकले.

जगातल्या अनेक प्रतिगामी शक्तींना हा धक्का होता. मुस्लिम जगातून त्याची कठोर निंदा करण्यात आली. तो ज्यू असून हि बाब लपवत असल्याचे आरोप झाले.

इतर सामाजिक सुधारणा करताना केमालने धर्मातरबंदीचा कायदा केला. शुक्रवार हा सरकारी कर्मचाऱ्यांचा सुट्टीचा दिवस बदलून तो रविवार केला. आजही अनेक ठिकाणी शुक्रवारचा नमाज पढण्यावरून कामाच्या जागी वाद होताना दिसतात. केमाल पाशाने शुक्रवारचा नमाज ज्याने त्याने त्याचे आपापले कामकाज सांभाळून पढावा असे सुचवले. एका मुस्लिमबहुल देशांत ही मोठी बाब होती.

त्यानं आपल्या देशात टर्की भाषेत बोलणे बंधनकारक केले होते. अरेबिक लिपी बदलून रोमन लिपीचा स्वीकार केला.

एकदा तिकडे सुफिया मशिदीवरून वाद सुरु झाला होता. इस्तंबूलमध्ये ६ व्या शतकात सेंट सोफिया हे चर्च उभारलं गेलं होतं. बायझंटाईन काळात इसवी सन 360 पासून ते  १२०४ पर्यन्त ते बायझंटाईन कॅथेड्रल म्हणून कार्यरत होतं. १२०४ मध्ये रोमन कॅथलिक लोकांनी त्याचा ताबा मिळवला आणि त्याला रोमन चर्चच्या रूपात आणलं. १२६१ पर्यंत त्याचं हे रूप कायम राहिलं. पुन्हा बायझंटाईन लोकांनी उचल खाल्ली आणि त्याच बायझंटाईन कॅथेड्रलमध्ये रूपांतर झालं. १४५३ सालापर्यंत हे चाललं.

तेव्हा ऑटोमन तुर्कांनी हे शहर जिंकलं. सुलतान मेहमद याने शहरात प्रवेश केला आणि आपली शुक्रवारची नमाज त्या चर्चमध्ये पढली. तेव्हापासून या चर्चची मशीद हजिया सुफिया झाली. १९३१ पर्यंत ही मशीद म्हणूनच कार्यरत होती.

केमाल पाशाने १९३५ मध्ये सत्तेवर येताच या मशिदीत असणारं प्लॅस्टर काढून टाकलं.  तिथल्या फरश्या आणि कारपेट काढून टाकली. त्यामागे लपलेली जुनी शिल्पे उघड झाली. युरोपातील अनेक लोक केमाल पाशावर खुश झाले. तो आता येथे पून्हा चर्च उभारेल असा त्यांचा अंदाज होता. मुस्लिम लोकांना एवढ्या जुन्या मशिदीला केमाल हात लावणार नाही असं वाटत होतं.

केमाल पाशाने दोघांना फाट्यावर मारलं आणि चर्च-मशीद भांडणं बंद करून तिथं प्रचंड मोठं संग्रहालय सुरु केलं. त्याने या इमारतीला म्यूजियममध्ये बदलून टाकलं. तेव्हा भारतात सुरु असणाऱ्या वादाचं उदाहरण देऊन यासाठी नेहरूंनी केमाल पाशाचं कौतुक केलं आहे.

तारुण्याच्या काळात त्याने अनेक जागतिक नेत्यांना प्रभावित केलं होतं. नेहरूंनी त्यांच्या व्यक्तिमत्त्व आणि कामाच्या उमदेपणाचा आपल्यावर प्रचंड प्रभाव असल्याचं मान्य केलं होतं. तेव्हाचा इराणचा राजा रजा पहेलवी, त्यानिशीयाचा अध्यक्ष हबीब बौर्गीबा, इजिप्तचे अध्यक्ष अन्वर सादात हे त्याच्या आदर्शाने प्रभावित झालेले नेते होते. मुस्तफाच्या बातम्या पेपरात वाचून त्यांनी आपली विचारधारा बनवली होती.

त्याच्या मृत्यूनंतर देशाने त्याच्या स्मरणार्थ मोठं स्मारक उभारलं आहे. आता लोकं त्याला अतातुर्क म्हणून ओळखतात. म्हणजे तुर्क लोकांचा पिता. १९८१ हे त्याचं जन्मशताब्दी वर्ष युनेस्कोने “अतातुर्क इयर” म्हणून साजरं केलं होतं. साम्राज्यवादाविरुद्ध लढणारा जगातला पहिला नेता म्हणून त्याचा सन्मान केला जातो.

त्याच्या लढ्यानेच अनेक देशांना स्वातंत्र्याची प्रेरणा मिळाली.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.