केनेडी यांचा एक निर्णय, आणि जग तिसऱ्या महायुद्धापासून वाचलं..

काळ कधीकधी एखाद्या नेत्याची अशी परिक्षा घेतो की त्याच्या एका निर्णयावर एक सबंध देशाच्या लाखो करोडो निष्पाप जिवांचे भवितव्य अवलंबुन असते. जो नेता अशा संकटसमयी त्या विरुद्ध पाय रोवून उभा राहतो, डोळ्यात डोळे घालून त्याचा सामना करतो आणि विजयी होवून बाहेर पडतो. तोच खरा लोहपुरूष.

जॉन एफ केनेडी यांच्या अशाच एका निर्णयाबद्दल अमेरिका देशच नव्हे तर संपुर्ण जग त्यांचे उपकृत आहे.

दुसऱ्या महायुद्धानंतर जग दोन ध्रुवात विभागले गेले. एकीकडे अमेरिका आणि तिचे सहकारी देश तर दुसरीकडे सोव्हिएत रशिया आणि तिचे सहकारी कम्युनिस्ट देश. अशा वेळी प्रत्येक नवस्वतंत्र देशाला आपल्या गोटात ओढून घेण्याचा तो काळ होता.

१९५९ साली फिडेल कॅस्ट्रोच्या नेतृत्वाखाली क्रांन्ती होवून क्युबामध्ये कॅस्ट्रो सरकार आलं आणि ते सोव्हिएत गटात सामिल झाले. अमेरिकेपासून फक्त १८० किमीवर असणाऱ्या क्युबात सोव्हिएत धार्जिणे सरकार आल्याने अमेरिकन सरकार त्रस्त होते.

ज्या कम्युनिझमला ते गावाबाहेर संपवू पहात होते,तो कम्युनिझम आत्ता त्यांच्या दारात येवून ठेपला होता.

शीतयुद्धाचा भडका उडण्याची सर्व लक्षण दिसत होती. 

त्यातच अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएने क्युबातील क्रॅस्टो सरकार उधळून लावण्यासाठी ‘बे ऑफ पिग्ज’ ची योजना आखली. जी सपशेल फसली. त्यामुळे सीआयएची, अमेरीकेची खूप नाचक्की झाली. अखेर राष्ट्राध्यक्ष केनेडींना या प्रकरणाची पुर्ण जबाबदारी घ्यावी लागली. पण क्युबा आणखीनच चिथावला गेला. सोव्हिएत रशियाला शीतयुद्धाचा गियर बदलण्यासाठी एक कारण मिळाले.

क्युबाची सुरक्षितता आणि अमेरिकन कारवायांवर वचक ठेवण्यासाठी कॅस्टो आणि निकीता ख्रुश्चेव यांच्यात एक करार झाला, या करारान्वये फिडल कॅस्टोनी सोव्हिएत रशियाला क्युबामध्ये आण्विक हल्लांची क्षमता असलेल्या मिसाईलचा तळ उभारण्याची परवानगी दिली.

सोव्हिएत देखरेखीखाली असा तळ उभारण्याचे काम चालूदेखील झाले. एकदा हा तळ पुर्ण झाला की अमेरिकेतील बरीच मोठ्ठी शहरे सोव्हिएत रशियाच्या क्षेपणास्त्राच्या माराच्या टप्यात येणार होती.  अमेरिकेने इटली व तुर्की येथे उभारलेल्या क्षेपणास्त्राच्या तळांना ते प्रत्युतर ठरणार होते.

१४ ऑक्टोबर १९६२ रोजी क्युबावरुन घिरट्या घालणाऱ्या अमेरिकन हेरगिरी पथकाला या हालचाली समजल्या त्यांनी सरकारला खबर दिली.

अमेरिकेच्या पुढच्या पिढ्यांनी भितीच्या छायेत जगणं केनेडींना मान्य नव्हतं जे होतय ते बघत बसणाऱ्यांपैकी ते नव्हते. त्यांनी धडाधड पाऊले उचलून रशियाला भिडण्याचा निर्णय घेतला. अशा काही हालचाली आपण केल्या नसल्याचा दावा सोव्हिएत युनियनने केला. पण गोष्टी स्पष्ट होत्या.

केनेडींनी रेडियो आणि टिव्हीवरुन राष्ट्राला उद्देशून एक भाषण केले आणि स्पष्ट धमकी दिली,

“पश्चिम गोलार्धात कुठल्याही देशावर क्युबाने आण्विक हल्ला केल्यास तो हल्ला अमेरिकेवरचा हल्ला मानला जाईल. आणि त्याचा बदला अमेरिका सोव्हिएत युनियवर प्रतिहल्ला करुन घेईल.”

याचा स्पष्ट अर्थ असा  की सोव्हिएत युनियन कितीही नाही म्हणो क्युबाच्या सर्व कृतीला तेच जबाबदार धरले जातील.

फक्त धमकी देवून ते थांबले नाहीत. त्यांनी क्युबाच्या भोवती एक रिंगण तयार केले. क्युबाकडे जाणारे प्रत्येक जहाज अमेरिकेच्या ‘नजरेखालून’ जावू लागले. वेळ पडताच अमेरिका क्युबावर लष्करी हल्ला करण्याचा पर्यायही केनडींनी खुला ठेवला होता.

अखेर या डोळ्यात डोळे घालण्याच्या खेळात ख्रुश्चेवनी पापणी हालवली.

त्यांनी क्युबामधील सर्व क्षेपणास्त्रे हलवून माघारी आणण्याचा निर्णय घेतला. जागतिक शांततेसाठी हा फार महत्वाचा निर्णय होता. या प्रासंगिक युद्धात जरी ख्रुश्चेव पराभूत झाले असले तरी त्यांच्या या माघारीच्या निर्णयासाठी इतिहास त्यांना नक्कीच लक्षात ठेवेल.

John Kennedy Nikita Khrushchev 1961
ख्रुश्चेव आणि केनेडी , स्त्रोत: wikipedia

केनडींचा निर्णय उलटा पडला असता तर ? केनडींच्या चिथावणीने जर खरोखरच आण्विक हल्ला झाला असता तर?  हे आज जरी जर तर चे प्रश्न असले तरी तेव्हा ते जीवनमृत्यूचे प्रश्न होते. अशा बिकट प्रसंगी भित्रेपणा उपयोगाचा नव्हता. त्यासाठी कणखरता हवी होती. केनडींचा निर्णय हा त्या देशाच्या स्वाभीमानातून आला होता.

असे महान नेते अशा कठिण निर्णयातून उदयाला येतात आणि हे महान नेते जिथे जन्माला येतात ती राष्ट्र ‘महासत्ता’ होतात. जॉन केनडींच्या हत्येला  ५५ वर्ष पुर्ण झाली पण त्यांनी ज्या कठिण प्रसंगातून जगाला बाहेर काढलं तिथून आजचे जग खूप लांब आलय. तो धोका कधीचा टळलाय.

  •  रणजीत यादव.

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Devendra says

    chan ranjit…

Leave A Reply

Your email address will not be published.